डॉ. जांगीड : ग्रामीण भागातील जनतेच्या कोविड तपासणीसाठी सुविधा
गुहागर, ता. 03 : निर्बंधाच्या काळात रिक्षा, वडाप बंद असल्याने कोविड तपासणीसाठी आरोग्य केंद्रापर्यंत येणे देखील ग्रामीण भागातील जनतेला अडचणीचे ठरत होते. आरोग्य विभागाने ही अडचण आता दूर केली आहे. गुहागर तालुक्यासाठी फिरते कोरोना तपासणी पथकाची (Mobile Testing Van) सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. बुधवारी (ता. 2 जून) गुहागरच्या सभापती सौ. पूर्वी निमुणकर यांनी वाहनाला हिरवा झेंडा दाखवून या सुविधेचे औपचारीक उद्घाटन केले.
(Mobile Testing Van Facility is now available in Guhagar Taluka. Sabhapati Purvi Nimunkar inaugurate the facility on 2nd June. Due to this facility, it is easy to checkup Corona through Antigen or RTPCR Test in Rural Area.)
दुसऱ्या लाटेत प्रथम रत्नागिरी आणि चिपळूण, त्यानंतर खेड या नगरपालीका क्षेत्रात फिरते तपासणी पथकाची सुविधा प्राधान्याने सुरु झाली. त्याला मिळणारे यश लक्षात घेवून गुहागरमधील आरोग्य विभागाने तालुक्यासाठी फिरते कोरोना तपासणी पथकाची सुविधा निर्माण केली आहे. या पथकाचे उद्घाटन गुहागर पंचायत समितीच्या सभापती सौ. पूर्वी निमुणकर, उपसभापती सीताराम ठोंबरे, तहसीलदार सौ. लता धोत्रे, गटविकास अधिकारी डॉ. अमोल भोसले आणि प्रभारी तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. जांगीड यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या सुविधेची माहिती देताना डॉ. जांगीड म्हणाले की, दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागाला बसला. याचा अभ्यास करताना लक्षात आले की, अनेकवेळा वाहनांची सुविधा नसल्याने ग्रामीण भागातील लोक कोरोना तपासणी करता प्राथमिक आरोग्य केंद्रात येत नव्हते. अशा परिस्थिती आरोग्य विभागाने तालुक्यातील काही ठिकाणी तात्पुरती स्वतंत्र तपासणी यंत्रणा उभी केली. मात्र त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ नसल्याने त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर झाला. म्हणून आता तालुक्याकरीता स्वतंत्र फिरते कोरोना तपासणी पथक (Mobile Testing Van) आम्ही सुरु केले आहे. हे वाहन ग्रामीण भागातील प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत पोचू शकते. त्यामुळे तेथील जनतेला विनासायास कोरोनाची तपासणी करुन घेणे शक्य आहे. या वाहनाचे नियोजन प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे करण्यात येणार आहे. सुरवातीला कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील तपासणीला प्राधान्य दिले जाणार आहे. पावसाळा सुरु झाल्याने या पुढच्या काळात सर्दी, ताप, खोकला यांचे रुग्ण वाढतील. हे लक्षात घेवून अशा रुग्णांची सूचना आरोग्य विभागाला द्यावी. जेणेकरुन त्यांची कोरोना तपासणी करुन घेणे शक्य होईल. अशी विनंती खासगी वैद्यकिय व्यावसायिकांनाही आम्ही केली आहे.
आरटीपीसीआर तपासणीही होणार
फिरत्या पथकाकडे आरटीपीसीआर तपासणीची सुविधाही उपलब्ध आहे. पथकासोबत असलेल्या डॉक्टरांना आवश्यकता भासली तर आरटीपीसीआरसाठी स्वॅब घेतला जाईल. या वाहनातच तपासणी कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. तपासणीमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास त्याची व्यवस्था आरोग्य विभागामार्फत कोविड केअर सेंटरमध्ये केली जाणार आहे.