राज्य उत्पादनच्या कारवाईत 1 लाख 19 हजाराचा मुद्देमाल जप्त
गुहागर ता. 31 : तालुक्यातील वेळणेश्वर येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून सुमारे 82 हजार रुपयांचा मुद्देमाल व शृंगारतळी – भातगाव रस्त्यावर देशी विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या इसमाला आबलोली येथे सापळा रचून मद्याचा सुमारे 37 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईने अवैद्य व्यवसाय करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
(The squad of The State Excise Department has raided and seized confiscated goods worth Rs. 1 lakh 19 thousand From Velenshwar and Abloli.)
वेळणेश्वर येथील जंगल परिसरात भागात गावठी दारू बनवत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादनच्या लांजा, रत्नागिरी ग्रामीण या दोन तालुक्यातील भरारी पथकाने वेळणेश्र्वरला हातभट्टीच्या अड्ड्यावर धाड टाकली. त्यावेळी गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे तब्बल 4 हजार लिटर रसायन त्यांना सापडले. तेथील अन्य साहित्य मिळून 82 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त भरारी पथकाने जप्त केला आहे.
भरारी पथकाला शृंगारतळी – भातगाव रस्त्यावर देशी विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. या माहितीनुसार भरारी पथकाने आबलोली येथे सापळा रचला. या सापळ्यात वैभव प्रकाश राऊत रा. कोळवली गुरववाडी हे अडकले. त्याच्यांकडे देशी विदेशी मद्याच्या सापडला. अवैधरित्या मद्याची वहातूक करत असल्याने भरारी पथकाने दुचाकी (क्र. एम. एच 08 एन. 4730) आणि देशी विदेशी मद्याच्या बाटल्या असा 37 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई करणाऱ्या भरारी पथकामध्ये राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक शरद जाधव, विक्रम मोरे, उपनिरीक्षक सुनील सावंत, सुधीर भागवत, किरण पाटील, सहाय्यक निरीक्षक विजय हातिसकर, जवान विशाल विचारे, सागर पवार, ओकार कांबळे, संदीप विटेकर, वैभव सोनवणे यांचा सहभाग होता. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या कालावधीत अवैद्य मद्य वाहतूक व विक्री होऊ नये म्हणून करडी नजर ठेवणार असल्याचे उप अधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांनी सांगितले.