गुहागर वरचापाटमधील युवकांचा उपक्रम
गुहागर, ता. 30 : वरचापाटमधील काही घरांमधुन वापरात नसलेली जळावू लाकडे संकलीत करुन ती स्मशानभुमीत ठेवण्याचे काम 12 युवकांनी केले. त्यामुळे कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गुहागर नगरपंचायतीला लाकडे उपलब्ध झाली आहेत. गुहागर शहरवासीयांनी या उपक्रमाबद्दल युवकांचे कौतुक केले आहे.
गुहागर वरचापाट ब्राह्मणवाडीमधील 10 -12 युवकांमध्ये कोरोनाच्या काळात काहीतरी काम करावे असे होते. गुहागर नगरपंचायतीला सध्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. या कामी मदत करण्याची तयारीही त्यांनी दाखवली होती. मात्र तशी संधी त्यांना मिळाली नाही. त्याचवेळी चर्चेमध्ये ब्राह्मणवाडीमधील लाकडांचे संकलन करुन ती स्मशानभुमीत ठेवण्याचा विचार या युवकांनी ठरवले. त्याप्रमाणे वाडीतील घरांमध्ये निरोप दिले. अरुणा दामले, सौ. अनुराधा दामले, अनिल वैद्य या ग्रामस्थांनी त्यांच्याकडील लाकडे देण्याची तयारी दाखवली. शनिवारी सकाळी एक टेम्पो बोलावून या तीन घरांच्या खोपडीमधील लाकडे भरली. नगरसेवक समीर घाणेकर यांच्यामार्फत नगरपंचायतीला लाकडे ताब्यात घेण्यासाठी बोलावले. नगरपंचायतीचे कर्मचारी सुनील नवजेकर आणि ओंकार लोखंडे यांनी स्मशानातील जागा दाखवली. त्याठिकाणी टेम्पोमधील लाकडे उतरवली.
या उपक्रमामध्ये रोहित मावळंकर, प्रथमेश परांजपे, मंदार वैद्य, सुशांत दीक्षित, अथर्व घाणेकर, अमोघ खरे, चैतन्य ओक, सोहम वैद्य, सुमित आठवले, अखिलेश खरे, यश फडके व रोहन फडके हे युवक सहभागी झाले होते.