आमदार भास्कर जाधव :तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी तयार रहा
गुहागर, ता. 18 : कोरोनाच्या पहिल्या लाटेत 60 वर्षांवरील अनेकांना फटका बसला. दुसऱ्या लाटेत अनेक तरुण मुलांना आपण गमावले. आता तिसऱ्या लाटेत किती भिषण असेल सांगता येत नाही. त्या लाटेशी मुकाबला करण्यासाठी आपण तयार राहीले पाहिजे. असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी केले. ते रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प व कोकण एलएनजी या दोन कंपन्यांनी सुरु केलेल्या कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
(Ratnagiri Gas and Power Project and Konkan LNG Limited have jointly started a 15-bed Covid Care Center. The Covid Care Center is housed in the Government Industrial Training Institute building at Ranvi. The Covid Care Center was inaugurated on Tuesday, May 18 by MLA Bhaskar Jadhav, Zilla Parishad President Vikrant Jadhav and RGPPL Managing Director Asim Kumar Samanta.)
गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प (RGPPL) व कोकण एलएनजी (KLNG) या कंपन्यांनी किमान 50 बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करावे. अशा सूचना जिल्हाधिकारी, चिपळूणचे उपविभागीय अधिकारी प्रविण पवार, गुहागरच्या तहसीलदार सौ. लता धोत्रे यांनी केल्या होत्या. मात्र आरोग्य आणि वैद्यकीय विभागाशी कंपनी निगडीत नसल्याचे कारण पुढे करत कोविड सेंटरचा विषय दोन्ही कंपन्या टाळत होत्या. अखेर जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी वरिष्ठ पातळीवरुन सुत्रे हलविल्यानंतर दोन्ही कंपन्यांनी कोविड केअर सेंटर सुरु केले. हे कोविड केअर सेंटर कंपनी परिसरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीत आहे. येथे सध्या 15 खाटांची उपलब्धता आहे. या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन मंगळवारी (ता. 18) आमदार जाधव यांनी केले.
त्यावेळी बोलताना आमदार जाधव म्हणाले की, कोरोना साथरोग आला तेव्हा त्याच्यावरील उपचारपध्दती कोणालाच माहिती नव्हती. देशातील गावागावापर्यंत कोरोनापासून वाचण्यासाठी घ्यायची काळजी, निश्चित केलेली उपचारपध्दती पोचण्यात काही महिने गेले. त्यानंतर एक काळ असा होता की, कोरोना संपला असा समज शासनकर्ते, प्रशासन आणि जनता यांनी करुन घेतला. त्यामुळे आपण निष्काळजी झालो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने सामाजिक अंतराचे भान, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर याविषयी सातत्याने सांगत होते. त्याकडे दुर्लक्ष केल्याने घात झाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उग्र रुप धारण केले. अनेक तरुण कार्यकर्ते, संसार सुरु करुन तीन चार महिने झालेल्या तरुण पिढीतील मंडळी आपण गमावत आहोत. आता तिसऱ्या लाटेत कोरोना मुलांनाही होणार अशी चर्चा आहे. ती लाट किती भिषण असेल हे सांगता येत नाही. मात्र त्याचा मुकाबला करायचा असेल तर अशी कोविड केअर सेंटर, कोविड रुग्णालयांची संख्या वाढली पाहिजे.
रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पाचे महाव्यवस्थापक असीमकुमार सामंता म्हणाले की, प्राणवायुची किंमत आपल्याला आज कोरोनामुळे कळली आहे. येथे निर्माण केलेली व्यवस्था रुग्णांना साह्यभूत ठरेलच. मात्र आपले आरोग्य चांगले रहाण्यासाठी निसर्ग उत्तम राहीला पाहिजे. प्राणवायु देणाऱ्या झाडांची लागवड करणे हे आपले कर्तव्य आहे. आज रुग्णांना मिळणारा प्राणवायु हवेतूनच घेतला जातो. हे समजून निसर्गाचे संवर्धन करणे ही धरतीमातेची सेवा केली पाहिजे.
उद्घाटनानंतर आमदार भास्कर जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, आरजीपीपीएलचे व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार सामंता, कोकण एलएनजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. मोवार, आरजीपीपीएलच्या मनुष्यबळ विभागाचे उप महाव्यवस्थापक जॉन फिलीप आणि व्यवस्थापक अमित शर्मा, युपीएलचे निवासी व्यवस्थापक दिनेश चौधरी, जिल्हा परिषद रत्नागिरीचे माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर, पंचायत समितीच्या सभापती सौ. पुर्वी निमुणकर, उपसभापती सिताराम ठोंबरे, उपविभागीय अधिकारी प्रविण प्रवार, गटविकास अधिकारी डॉ. अमोल भोसले आदींनी कोविड केअर सेंटरची पहाणी केली. तेथील व्यवस्था आणि प्रसन्न वातावरण पाहून सर्वांनीच समाधान व्यक्त केले.