प्राजक्ता जोशी, आरेगांव
पत्रकारितेच्या तत्त्वांप्रमाणे बापुजींबद्दलच्या दोन ओळी 12 मे रोजीच गुहागर न्यूजमध्ये येणे आवश्यक होते. परंतु राजस्थानपर्यंत पसरलेल्या मर्दा परिवाराला बापुजींच्या निधनाची वार्ता गुहागर न्यूजद्वारे पोचणे आम्हाला प्रशस्त वाटले नाही. म्हणून आधी कोणी लिहिलं या स्पर्धेत न उतरता, संयमाने आम्ही आजचा लेख प्रसिद्ध करत आहोत. दिलगिरीबद्दल क्षमस्व.
गुहागर बाजारपेठेतील खूप पूर्वीपासूनचे एकेक दुकान म्हणजे चालता बोलता इतिहास आहे. प्रत्येक दुकानाची स्थापना, ते नावारूपास आणण्यासाठी दुकान मालकाने केलेले कष्ट, घेतलेली अपार मेहनत, ग्राहक जोडून ठेवण्याची हातोटी, आणि दुकान मालकाचा स्वभाव व सामाजिक संबंध या गोष्टींचा त्यात अंतर्भाव होतो. व्यापाराची यशस्वी वाटचाल जपणारी गेल्या काही पिढ्या सुरू असणारी दुकाने आहेत त्यात एक महत्त्वाचे नाव आहे , बी.जी.मर्दा. आणि या दुकानाचे सर्वोसर्वा होते जसुभाई मर्दा. अर्थात आमचे बापुजी. होते म्हणताना खूप वाईट वाटतंय कारण आज ते आपल्यात नाहीत, नुकतीच त्यांच्या निधनाची धक्कादायक बातमी ऐकून पूर्ण तालुका हळहळला आहे.
बापुजींचे वडील घाशीराम मर्दा हे राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील राणिगांवमधुन कुंदनलालजी मर्दा यांच्यासोबत महाराष्ट्रात आले. काही काळ दापोलीत नोकरीही केली. त्यानंतर दाभोळ येथे दुकान सुरू केले होते व नंतर काही काळाने ते गुहागरला आले व इथे त्यांनी किराणा मालाचे दुकान सुरू केले. इथे बस्तान ठीक बसलं असं वाटू लागल्यावर घाशीराम मर्दा यांनी आपल्या तीनही मुलांना (श्रीकिशन, जसकरण आणि चतुर्भुज) गुहागरला आणले. त्रिमूर्ती असलेल्या श्रीकिशन, जसकरण आणि चतुर्भुज या तिन्ही भावंडांचे शिक्षण आपल्या गुहागरच्या श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरात झाले. आणीबाणीच्या दरम्यान घाशीराम मर्दा यांनी आपले किराणा व्यापार बंद करून कापड व्यापार्याला सुरवात केली. धंद्याचे बाळकडू अंगात असल्याने हुशारी असून देखील या भावंडांनी पुढील शिक्षण घेण्याऐवजी आपला पिढीजात धंदा सांभाळणे पसंत केले व तो मनापासून सांभाळत वाढवला देखील.
बापुजींबद्दल बोलायचे म्हटले तर अतिशय उमदे व प्रसन्न व्यक्तिमत्त्व. रोज सकाळी आन्हिके आटपून दुकान उघडण्याआधी नियमित व्याडेश्वर दर्शन कधी चुकले नाही. साधारण साडे सात पावणे आठच्या दरम्यान देवदर्शन करून आठला दुकान उघडले जात असे. अतिशय शिस्तप्रिय असल्याने घरी व दुकानात अनेक गोष्टी त्यांनी आखून दिल्याप्रमाणे होत असत. प्रत्येक गिर्हाइकाशी अत्यंत गोड बोलणे असे. ग्राहकांप्रमाणे बापुजींची संवादशैली देखील बदलती असे. खारवी समाजातील माणसाशी त्याच्या भाषेत. आसपासच्या गावातून आलेल्या माणसांशी त्यांच्या लयीमध्ये बोलून बापुजी आस्थेने चौकशी करायचे. अशी आपुलकी दाखवत असल्याने आलेले गिर्हाईक कधी खरेदी न करता परत जात नसे. उलट अनेकदा न ठरवलेली वस्तू पण विकत घेऊन लोक बाहेर पडत असत. अरे हे नवीन आणलंय बघ, बघायला पैसे थोडीच लागतात,असे म्हणत दुकानात आणलेली एखादी नवीन वस्तू दाखवत असत. ती घेणे का गरजेचे आहे हे पटवून देत काही क्षणात ती गिर्हाइकाला विकत देखील असत. मार्केटिंग मध्ये कोणतीही MBA किंवा MMM ची पदवी घेतलेल्या सेल्स एक्झिक्युटिव्ह ला पण लाजवेल असे त्यांचे मार्केटिंगचे कौशल्य होते.
आपल्या भागात कोणत्या गोष्टींची गरज आहे, कोणत्या वस्तूंचा खप चांगला होईल याची खूप चांगली जाण बापुजींना होती. त्यानुसार प्रत्येक हंगामाप्रमाणे ते दुकानात माल उपलब्ध करून देत. पावसाळापूर्वी छत्र्या, प्लास्टिक खोळी, प्लास्टिक ताडपत्री, वह्या पुस्तके, गाईड्स चटया, मकरसंक्रात जवळ आली की, महिलांना लुटण्यासाठी आवश्यक असणार्या वस्तू, लग्नसराईत बस्त्यासाठी लागणारे कापड, साड्या. डिस्काऊंट कशावर द्यायचा, किती टक्के मार्जिन ठेवून धंदा करायचा, हे सगळे आराखडे त्यांचे तोंडपाठ होते. जुन्या गोष्टींना चिकटून न राहता सतत काळानुसार बदलत, आवश्यक ते बदल त्यांनी दुकानात केले. तयार कपडे, साड्या, लहान मुलांचे कपडे, अशा प्रकारानुसार दुकानाच्या आतील भागात त्याप्रमाणे विभाग तयार केले. आज त्यांच्या व्यवसायाचे जे स्वरूप दिसते त्यामागे बापुजींचे व्यावसायिक व्यवस्थापन कौशल्य आहे. सुरेश आणि सुरेंद्र हे देखील बापुजींनी आखून दिलेल्या व्यावसायिक चौकटी आणि व्यावहारिक मूल्यांची जपणूक करत हा व्यवसाय वाढवत आहेत.
त्यांनी गुहागरात एस.टी. स्टॅण्ड समोरची जमीन खरेदी करून मानस लॉज उभा केला. रानवीच्या माळावर आंब्याची बाग लावली. बी. जी. मर्दा या कापड दुकाननंतर तळीमध्ये मर्दा लाहो उभं केलं. एकूण काय तर धंदा कोणता व कसा करावा, तो कसा वाढवावा आणि यशस्वी कसे व्हावे हे शिकायचे असेल तर ज्यांचे उदाहरण अभ्यासावे अशी व्यक्ती म्हणजे बापुजी…..!!!
बापुजी अजातशत्रू होते. वडिलांसोबत गुहागरमध्ये आल्यानंतर हे मर्दा कुटुंब इथल्या मातीशी सहज एकरूप झालं. व्यापारी म्हणून कधीही भपकेबाजपणा या कुटुंबाने दाखविला नाही. की प्रतिष्ठेपोटी सभासमारंभात मिरवलं नाही. पण बापुजींकडे देवधर्माच्या कामासाठी आलेला माणूस कधी रित्या हाताने गेला नाही. तालुक्यातील अनेक मंदिरांच्या बांधकामांसाठी देणग्या दिल्या. गावातील सार्वजनिक कामांसाठी मदत केली. अनेक लोकांच्या अडीअडचणीला आर्थिक मदतही केली. गुहागरातील शाळेची सहल इचलकरंजीला जाणार असले तर सहलीमधील मुलांसह शिक्षकांची सर्व व्यवस्था बापुजींच्या शब्दावर होत असे. कधी गुहागरला माणूस इचलकरंजीला जाणार असेल तर आवर्जून त्याचा पाहुणचार करण्याची व्यवस्था बापुजी करत असतं. अशाप्रकारे अतिशय उत्तम रित्या त्यांनी सामाजिक बांधीलकी जपली होती.
बापुजींना माहेश्वरी समाजात देखील खूप मान होता. माहेश्वरी समाजाच्या मंडळाचे जिल्हा अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले होते. असे हे अतिशय हुशार, व्यवसाय निपुण, हरहुन्नरी, गोडबोले असे यशस्वी व्यापारी व्यक्तिमत्त्व अचानकपणे काळाच्या पडद्याआड गेले.
बांधून तयार होत असलेली मर्दा बंधूंच्या दुकानाची नवीन इमारत पुढे आकाशाला गवसणी घालेलच. पण तिचा यशस्वी पाया रचणारे, विस्ताराच्या भिंती उभ्या करणारे, व्यवसायाचा भार पेलवणारे आधारस्तंभ असे बापुजी, याची देही याची डोळा सजलेले दुकान पहाण्यापूर्वी सोडून गेले. गुहागर बाजारपेठेच्या इतिहासात मात्र त्यांच्या पाऊलखुणा व त्यांचे नाव त्यांच्या गुणवैशिष्ट्यांसह कायम कोरलेले राहील.