लेखिका : सौ. सुनीला गोंधळेकर, पुणे
यावेळी कोरोनामुळे शाळा झालीच नाही. ही कोरोना सुट्टी फारच लांबली असं कंपूला वाटायलाच लागलं होतं. नेहमीचे पत्ते, कॅरम आणि व्हिडिओ गेम सगळ्याचा म्हणजे खरंच सगळ्याचा जाम म्हणजे जामच कंटाळा आला होता. आता काहीतरी वेगळं केलं पाहिजे – नेहमीप्रमाणे. पण तरी वेगळं, नेहमीहून वेगळं. काय बरं करावं? दुपारच्या आसनात (मिटिंगला आसन असं नवं नाव यावेळी अभिनी सुचवलं आणि ते सगळ्यांना मान्यही झालं होतं. सिंपल लॉजिक होतं की मिटिंगला मराठीत बैठक म्हणतात आणि बैठक आसनावर असते म्हणजे मिटिंग म्हणजे आसनच की.) मंडळी जमायला आणि नेमके तेव्हाच सुखात्मे आजोबा त्यांच्या घरातून बाहेर यायला एकच गाठ पडली.
“काय पोरांनो? आता काय विचार. कुणाच्या झोपा उडवण्याची तयारी चालू आहे?” “”
“नाही आजोबा. आम्ही ना आसनाच्या तयारीला लागलोय.” – सई.
“पोरांनो, योगासनं सकाळी करायची. उठल्या उठल्या. हे असं दुपारचं जेवण झालं की आसन करतात का कोणी? आजकालच्या मुलांना काही म्हणता काही समजतं नाही. जा आपापल्या घरी. आसनं करतायत. जा पळा.”
होकाराच्या माना डोलवत मुलं पळाली ती थेट अभिच्या घराच्या शेजारच्या गच्चीवर. तिथे वर छप्पर असल्यामुळे सावली तर होतीच पण मुख्य म्हणजे आतल्या बाजूला असलेली ती गच्ची पटकन कुणाच्या नजरेला पडण्यासारखी नव्हती. त्यामुळे गप्पा मारायला तर एकदम सेफ जागा म्हणून सुअअसउ कंपू हल्ली तिथेच येऊन बसतो. त्यामुळे आजचं आसनही तिथेच जमवलं होतं.
“ए, फार बोअर होतंय रे.”
“हो ना. काहीतरी करू या ना आपण.”
“मला तर कोरोनाचा कंटाळा आलाय.”
“पण मला आईसक्रिम खाण्याचा आलेला नाही.”
“तुला खाण्याचा कधीच कंटाळा येत नाही. नाहीतरी खादाडच आहेस तू.”
“हो. का ? मी खादाड आहे का ? मग तू कोण. महाखादाड. नाही. महाखादाडेश्वर. महाकंटाळेश्वर आणि महाआळशेश्वर.”
“आळशी. कोण मी. मी रोज सकाळी उठून सूर्यनमस्कार घालतो. ”
“इइइइइइइइ. सूर्यनमस्कार. ओल्ड फॅशन. मी ॲरोबिक्स करते.”
“फॅड नुसतं. ॲरोबिक्स म्हणे. त्यापेक्षा तू आमच्यासारखी………अं अं अं. हां कबड्डी खेळून दाखव.”
“कबड्डी आणि आमच्यासारखी? शहाण्या, तू तरी खेळलायस का कधी कबड्डी ? मला सांगतोय मोठा. तुमचं आपलं नेहमीचं ते क्रिकेट आणि क्रिकेट”
“आळशी असण्याचा इथे काय संबंध आहे ?”
“नाही ना मग खादाड असण्याचा तरी आजच्या आसनाशी काय संबंध आहे ”
कधी नव्हे ते अभिची आजी आज गच्चीत आली अचानक. चादरी वाळत घालायला आणि कंपूला पाहून एकदम दचकलीच. “काय रे पोरांनो काय करताय इथे?”
“आजी, अग जाम बोअर झालंय.”
“बोअर, म्हणजे काय रे बाळा? आजकालची तुम्ही मुलं सारखी बोअर कशी काय होता कोण जाणे. आम्ही बघ इतके वयस्कर झालो तरी आम्ही नाही होते ते बोअर.”
“ए आजी तुम्ही काय करायचात ग सुट्टीत. एवढी मोठ्ठ्ठी सुट्टी तुम्ही घालवायचा कशी?”
“सुट्टी घालवायला का लागते? ती तर जाते आपली आपली. छान सूरपारंब्या खेळायच्या. सागरगोटे खेळायचे. गवतावर लोळायचं. नदीत डुंबायचं. झाडावर चढायचं. कोलांटया मारायच्या. आणि दमलं की मगच घरी यायचं, व्यवस्थित जेवायचं आणि ताणून झोपायचं. मग कशाला येतोय कंटाळा.”
“हो की. हे आपल्याला का नाही सुचलं?” सुअअसउ कंपूला एकदमच वाटलं. मग काय आता डोक्यात नवीन काहीतरी खदखदणार हे नक्कीच. अहो वाट कशाला बघायची. खदखदायला लागलं सुद्धा. सोसायटीत नवीन स्पर्धा घेण्याची शक्कल लगेच मुलांच्या डोक्यात आलीच. मदतीला आजी येणार हे सुद्धा ठरवूनच टाकलं मुलांनी.
लगेच पंधराच दिवसानंतर स्पर्धा घ्यायचं ठरलं. हो तयारीला तेवढा तर वेळ हवाच ना. सोसायटीच्या आवारात सर्व मुलांची स्पर्धा आणि तयारीला सगळ्यांना चौदा दिवस. गट पाडले आणि स्पर्धा ठरली – आधी उलट पळा प्रत्येकानी आपल्या घरापासून ते जिन्यापर्यंत, मग उलट उभं राहा जिन्याकडे पाठ करून आणि खाली चढा. (चढतात वर मग हे खाली चढा काय आहे. हो कारण जिन्याकडे पाठ केली आणि उलटं उतरायला लागलं की जाणार खाली पण तोंड वरच्या बाजूला राहणार ना. म्हणून खाली चढा.) जिन्यावरून खाली पोहोचलं की चिखल तयारच ठेवलाय. मग काय बच्चेमंडळी चिखलात डुंबा, मग गेटच्या भिंतिपर्यंत कोलांटया मारा, एवढं करून दमलात की काय नाही ना. मग आता दोरीच्या किमान शंभर उडया मारा आणि तीच दोरी गटातल्या सगळ्या मुलांच्या कमरेला बांधून मुलांची मोळी बांधा. आता ही मोळी एकत्रच विजयस्तंभाकडे जाणार. जी मोळी सगळयात पहिली पोहोचली तिची फत्ते.
आता पंधरा वीस दिवस या स्पर्धेच्या तयारीत आणि नंतर स्पर्धेच्या गप्पा रंगवण्यात संपणार. मुले खुश होती. दोन दोनच्या जोड्या करुन सोसायटीतील इतर मुलांना स्पर्धेची माहिती देण्यासाठी सर्व मुले पळाली ती देखील रोजच्या आसनाची वेळ ठरवून….