लेखिका : सौ. सुनीला गोंधळेकर, पुणे
मुलं आपापल्या घरी जाण्याची बाबा वाटच पाहात होता. तळपाय, गुडघे बघून झाल्यावर आता तरी सुमित आपल्याशी बोलायला येईल का असा विचार चालू असतानाच सुमित स्वतःच बाबाकडे आला.
“बॉब तू मला बोलावत होतास ना मगाशी?” “अरे वा ऐकलं होतं का मगाशी मी हाक मारत होते ते?” “हो.” “मग हो नाही म्हणालास?” “बॉब, मी तेव्हा कामात होतो ना म्हणून बोललो नाही तुझ्यासारखा. तू कसा ऑफिसचं काम करत असलास की आमच्याकडे पाहात नाहीत तसा. पण आता काम झालंय ना म्हणून विचारतो की, काय काम होतं.” “खूपच महत्त्वाचं काम होतं तमिसु. मग आता तरी तमिसुला बाबाशी बोलायला वेळ आहे का?” “हो बॉब.” “तर काय आहे तमिसु राजेशबाबानी खूप विचार केला आहे तमिसुच्या प्रश्नाचा.”
“तमिसुचा प्रश्न. हो हो. बरोबर. पण कोणता प्रश्न?”
“तोच की तमिसुला त्याच्या मनासारखे विषय टीचर का देत नाहीत.” “पण कशाला?” “कशाला म्हणजे काय निबंध लिहायला.” “ ते होय. पण जाऊ दे बाबा. टीचरनी काय विषय दिला हे माहित नाही. मी मला पाहिजे ते लिहितो ना.” “अरे सुमित असं करून कसं चालेल? टीचर देतात त्या विषयावरच निबंध लिहावा लागतो.” “पण असं का बाबा?” “अरे त्यांनी दिलेल्या विषयावर निबंध लिहिला ना की मग त्या छानपैकी मार्क देतात.” “मार्क? मार्क म्हणजे काय रे बाबा ? ” “अरे मार्क म्हणजे……. म्हणजे……. म्हणेज …….नाही का वन, टू, टेन, हंड्रेड असे गुण.” “पण गुण म्हणजे काय?” “चांगले मार्क रे. तुला छान छान मार्क मिळायला नकोत का? नाहीतर तुला पुढे शिकता येणार नाही. मोठया कॉलेजात जाता येणार नाही ना. त्यासाठी मोठे मोठे मार्क मिळवायला लागतात.” “हो का. बरं.” सुमितच्या या उत्तराने बाबाने सुस्कारा सोडला. कळलं तर त्याला. सोपं आहे. मुलांना लगेच समजतं. नीट सांगायला लागतं फक्त – बाबाने आपले मत सगळ्यांपुढे मांडले.
थोडयाच वेळात सुमित परत आला आणि त्यानी विचारलं “आई, मला मार्क कशाला मिळायला पाहिजेत?”
“ते बाबानी मगाशी सांगितलं नाही का तुला?”
“पण मला एक प्रश्न पडलाय. (आणखी एक प्रश्न? ? ? ? – आईला वाटलं) ईआ मला विचारायच आहे की तुला, बाबाला, आजी-आजोबांना, शेजारच्या मोत्याला मिळतात का मार्क?” “नाही. आम्हाला कशाला हवेत मार्क?”
“तेच ना ईआ, कशाला हवेत हे मार्क? तुम्हाला मिळत नसतील तर मला एकटयाला काही नकोत बुवा मार्कबिर्क” “अरे तुला तो निबंध लिहायचा…..” “हो. ना मला फक्त माझ्या मनातलं तेवढं लिहायचंय होतं ना. मला मार्क वगैरे नकोत.” आईला वाटलं हो की मूळ प्रश्न तसाच राहिलाय अजून. शाळेत मार्क मिळायला हवेत आणि सुमितला त्याला लिहावसं वाटतं ते लिहिता यायला हवं. हे कसं काय जमणार?
शेवटी बाबाला एक तोडगा सुचला. त्याने सुचवलं “अरे सुमित, आपण असं करू या. तुला जे लिहावंस वाटतं ना, तुझ्या मनातलं ते तू घरीच लिही.”
“पण मग ते वाचणार कोण?” अरेच्या, हे बरोबर आहे. घरीच लिहिलेलं वाचणार कोण ?
आजी पटकन म्हणाली “आम्ही सगळे. ” आईनी त्यावर सुचवलं “ आपण असं करू या. घरातल्या टाचणबोर्डवर ते लावू म्हणजे घरातल्या सगळ्यांना आणि मुख्य म्हणजे सुमितला पाहिजे तेव्हा ते वाचता येईल. त्याच्या मित्रांनापण वाचता येईल. ” ही कल्पना सुमितला आवडली. आणि शाळेत मात्र टीचर सांगतील त्याच विषयावर आणि टीचर सांगतील ते ऐकून तसा निबंध सुमित लिहिणार हे ठरलं.
हे सगळं ठरल्याचं घरात सगळ्यांनाच हुश्श झालं. तोवर सुमित परत आला आणि म्हणाला “बॉब, हे सगळं ठरलं पण……” (पुन्हा सगळ्यांच्या मनात चिंता डोकावली – सुमितचा काही नवीन महत्त्वाचा प्रश्न तर नाही ना.) “पण काय?” आई आणि बाबानी एकदमच विचारलं. “आता ठरलं म्हणून मी लगेच काही लिहिणार नाही हं. मला वाटेल तेव्हाच मी लिहिणार. उद्यापासून मागे लागू नका सुमित लिही म्हणून.”