लेखिका : सौ. सुनीला गोंधळेकर, पुणे
आज सकाळी सकाळी सुमित पाल झाला होता. म्हणजे पालीसारखा चार पायावर (म्हणजे सुमितचे दोन हात आणि दोन पाय) सरपटत स्वारी खोलीभर फिरत होती. मग पालीप्रमाणे भिंतीवर चढण्यासाठी सुमितनी दोन्ही हात भिंतीवर ठेवले. पाय मात्र भिंतीवर नेता येईनात. पालीसारखं आपल्याला भिंतीवर चढता येईल का या विचारांनी त्याला घेरलेलं असतानाच, माझा आवडता प्राणी या विषयावर सुमितनी लिहिलेल्या निबंधावर घरात घनघोर चर्चा सुरु झाली. (म्हणजे तुमच्या घरासारखंच की)
आई-बाबा, आजी-आजोबा यांची कमिटी तमिसुच्या “मग मी माझ्या मनातला निबंध कधी लिहिणार ? मला माझ्या सारखं का लिहू देत नाहीत? ” या उत्तरावर खूष होऊन, पण तरी याचं करायचं काय यावर चर्चा करायला बसली होती. थालीपीठाचा तुकडा खात खात बाजोआ तमिसुची बाजू घेत होते. “लहान आहे अजून. एवढं काय गंभीरपणे घ्यायचं. नाही का. अरे राजेश तू सुद्धा लहानपणी खोडकरच होतास.” थालीपीठावर तूप घालत घालत आजीनी आजोबांची री ओढत म्हटलं “हो ना. कधी झाडावर चढेल. कधी डबक्यातल्या साचलेल्या पाण्यात उडी मारेल, नाहीतर पलंगाखाली लपून राहील याचा काही नेम नव्हता. आम्ही तुझी काळजी केली का कधी? पण सगळं नीट झालंच ना.” आता यावर बोलायची पाळी अर्थातच तमिसुच्या बाबाची म्हणजे राजेशची होती.
“आई बाबा, प्रश्न मी लहानपणी काय करायचो हा नाही. आत्ता प्रश्न सुमितच्या मिसनी विचारलेला प्रश्न तो आहे. त्या आमच्याकडे बोट दाखवून म्हणतायत की आम्ही त्याच्या शिक्षणाबाबत गंभीर नाही.”
आता बाहेरच्या खोलीतून सुमित वाघ होऊन डरकाळ्या फोडत स्वैंपाक घरात आला होता. आणि खुर्ची-टेबलाच्या फटीतून वाघासारखा फिरत होता. डोळ्यात वाघाची ऐट होती आणि एक बेफिकीरीही होती. मधेच सावज शोधावं तसा इकडे तिकडे पहात होता.
आजोबा “तुम्ही गंभीर असून काय उपयोग ? गंभीर त्यानी व्हायला हवं आणि अरे मुलं होतात गंभीर. जरा वेळ द्यायला लागतो. ”
राजेश “आई, आता मी लहानपणी कसा गंभीर नव्हतो, नंतर झालो वगैरे पुराण सांगू नकोस. हे बघा. जग बदलतय. आता पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही. अॅडमिशन मिळणं किती कठीण झालंय. पुढे आयुष्यात काही तरी करायचं असेल तर त्याला आत्तापासून तयारी करायलाच हवी. उगाच लाड करून चालणार नाही. नाहीतर बाकीची मुलं जातील पुढे आणि हा मागेच राहील. ”
आई “पण करायचं काय मग आता. सुमितला रागावून तर काही उपयोग नाही. ”
सुमित हे सगळं ऐकत असणार कारण वाक्य संपताच स्वारी पुढे आली आणि लगेच म्हणाली “हो ना आई. रागावून काही उपयोग नसतो असं परवा त्या टि.व्ही वरच्या कार्यक्रमात सांगत होते. मुलांच्या मनाचा विचार करायला पाहिजे. म्हणजे झ्यामा. ”
“काय म्हणालास?”
“आजोबा माझ्या म्हणालो मी. माझ्या मनाचा विचार तुम्ही करायला हवा.” सुमितच्या या टिपण्णीवर चर्चा तिथेच थांबली.
बाबा हसत हसत सुमितला म्हणाला “चिरंजीव, तुमच्या मनाचा विचार करायचा म्हणून तर ही सभा भरवली आहे ना. या आता खुर्चीवर बसा आणि गरम थालीपीठ खा. ही आयडिया कशी आहे. तुमच्या मनाचा विचार करणारी आहे का नाही? ”
एवढया घनघोर चर्चेनंतर अजून मूळ प्रश्न तसाच होता. शाळेतल्या टीचरचं म्हणणंही बरोबर होतं. परीक्षेचा विचार केला तर दिलेल्या विषयावर निबंध लिहिता यायला पाहिजे. पण तमिसुचा मुद्दा त्यापेक्षाही जास्त बरोबर होता. मला माझ्या मनातलं सांगायचं आहे, शब्दबद्ध करायचं आहे ते मी कसं करणार? यावर तोडगा काढण्याची जबाबदारी बॉबनं म्हणजेच सुमितच्या बाबाने घेतली. तो म्हणाला “चार दिवस जाऊ दे. मी विचार करतो आणि बघू काही उपाय सापडतो का? ”
थालीपीठ खाताखाता आजोबा आणि नातवाच्या गप्पा रंगात आल्या. विषय होता चिमणीचे दात म्हणजे कसे दात? थालीपीठ पुढच्या दातांनी हळूहळू खाणाऱ्या सुमितला आजी म्हणाली होती की चिमणीच्या दातांनी खाऊ नकोस म्हणून. मग तमिसुचे प्रश्न सुरू झाले. आजी तू चिमणीचे दात पाहिले आहेस का ग? चिमणीला दात असतात का? किती असतात? ते पडतात का? पडताना माझे दात दुखतात तसे ते दुखतात का? मग चिमणीची आई तिला कडू औषध प्यायला देते का? या सरबत्तीला तोंड देता देता आजी आजोबांच्या नाकीनऊ आले. पण जबाकेडो तमिसुचे आआआ (आजी आणि आजोबा यासाठीचा तमिसुचा हा शॉर्टफॉर्म होता.) ते. ते त्याच्यापेक्षा सवाई. आजोबांनी दुसऱ्या दिवशी सकाळी चिमणीचे दात पहायला जवळच्या डोंगरावर जाण्याचा कार्यक्रम नक्की केला. मग काय चिमणीप्रमाणेच कबुतर, कावळा, मैना वगैरे पक्षांचेही दात मोजावे का काय अशी टूम निघाली. बाबानी लगेच जाहीर केलं. मला सकाळी वेळ नाही. दात मोजण्याचा कार्यक्रम आजोबा आणि नातवाचा आहे.