लेखिका : सौ. सुनीला गोंधळेकर, पुणे
“तमिसु तमिसु इकडे ये बरं.” बाबांनी सुमितला बोलावलं. तर सुमित सोफ्यावर झोपून आपलेच तळवे बघण्यात गर्क. बाबांनी परत हाक मारली तरी सुमितच लक्ष नव्हतंच बाबाकडे. जवळजवळ पायाची बोटं नाकापर्यंत आणून सुमित एकचित्तानी तळवे पाहात होता. बाबा हाक मारणार तोवर अअउस आलेच. (अजेय,अभि, उर्मी आणि सई) मग बाबाला बोलायला संधीच नव्हती. नंतर पाहू असं म्हणत बाबा आत निघून गेला. मुलं बाहेर खेळत होती. दंगामस्ती, गप्पा चालू झाल्या. खेळ बाहेर निघाले. कोंडाळं झालं. तासभर कसा गेला कोणालाच कळाल नाही.
पण थोड्याच वेळात मुलांची गडबड बंद झाली. अअउससु घरात असून आवाज कसा अजिबात येत नाही म्हणून घाबरून आई हॉलमधे आली. नेहमी सारखा खेळण्याचा पसारा पडला होता, पण खेळण्यांभोवती मुलं दिसत नव्हती. कारण मुलं जमिनीवर झोपली होती आणि पाय उंचावून आपापल्या नाकापाशी आणण्याचा प्रयत्न चालू होता. मग डोकंही उचलून पुढे नेत जवळ जवळ नाक आणि पायाचा अंगठा टेकायला लागला. मग अभि आणि सई पायाचा अंगठा एकचित्ताने पाहात होते. अजेय आणि सुमित हवेतच दोन्ही पाय दुमडून, डोकं उचलून, बहुतेक गुडघ्यांना डोकं टेकवत असावेत. ह्या कसरतींमधे मुलांचा आवाज गप्प झाला होता.
“हे काय चाललंय तुमचं. असे लोळताय का तुम्ही? ” आईने या करामती पाहात विचारलं.
अजेय म्हणाला, “काकू, तुम्हाला माहित्येय का गुडघ्यांवर खूप गोल गोल असतात. आणि हाताला कडक कडक असं काहीतरी लागतं. आणि त्याच्या मधे एक खड्डा असतो? ”
सई – “आणि काकू अहो नखाच्या आत एक गोल, मऊ मऊ अंगठा आहे माझ्या पायाला. आणि त्याच्यावर खालच्या बाजूनी हातासारख्याच छान नक्षीदार रेषा आहेत. मला माहितच नव्हतं पायावर पण छान मेंदी असते ते. ” “मेंदी? ” “अहो काकू, आपण नाहीका मेंदीनी नक्षी काढत तशी मस्त नक्षी आहे ना तळपायावर. म्हणजे मेंदीच की.”
“हे मेंदी म्हणजे काय असतो हो काकू? त्याचा असा रंग का येतो या सईटीलीच्या हातावर?” अजेयचा प्रश्न.
सई – “अरे मेंदीचं झाड असतं.” “मेंदीचं झाड? व्वा काय मज्जा आहे. काकू मेंदीचं झाड लावू या ना आपण म्हणजे कोन आणून मेंदी काढायलाच नको. आपण झाडावरून मेंदीची नक्षी घ्यायची आणि हातावर ठेवायची.
“अग सई वेडाबाई, मेंदीचं झाड म्हणजे मेंदीच्या नक्षीचं झाडं नसतं. मेंदीची पान असतात ना ती वाळवून त्याची पूड केली की कोरडी मेंदी तयार होते. मेंदीची डिझाईन झाडाला लागत नाहीत काही.” सुमित म्हणाला.
“आम्हाला मेंदीचं झाड पहायचं आहे.” “हो हो आम्हाला पण.” सगळ्यांनीच सूर लावला. “हो जाऊ या की बघायला. पण मी आधी झाड कुठे आहे ते जरा बघून ठेवते. मग जाऊ या.”
“पण सई, माझ्या नखात खूप घाण असणार नाहीतर असं काळ का दिसेल ना?” अजूनही पाठीवर झोपून पायाचं निरीक्षण करत असलेल्या अभिनी त्याच निरीक्षण नोंदवलं.
“हो. सारखं सारखं मातीत खेळलं ना की मग पायाच्या नखात घाण होते. ” “पण मग काय खेळायचंच नाही का काय ? पायात घाण होते म्हणून” अगदी कविता म्हटल्याच्या सूरात अभिनी विचारलं.
“खेळावं की मुलांनी मग पाय स्वच्छ धुवून” सईनी त्याच्याच आवाजात उत्तर दिलं.
“आई, झोपून नाकापाशी पायाची नखं आणता येतात पण नुसता घोटा नाही आणता येत बरंका. तू झोपून तसं करू नकोस काय. ” “पण काकू पाय वर घेऊन गुडघ्यापाशी डोकं नेता येतं. अशी मान वर करून डोकं गुडघ्यापाशी आणलं तर कपाळ मस्त टेकतं. कपाळाला गंमत वाटते. तसं करायला हरकत नाही तुम्ही.”
आता आईला भीती वाटली मुलं आपल्याला हे सगळं करायला लावतात की काय. पण नशीब अभिची आई त्याला बोलवायला आली.येताच त्यांनी मुलांना जमिनीवर आडवं पडलेलं पाहिलं.
अभिची आई : “इथे येऊनही हेच चालू का तुझं अभि?”
आईच्या या वाक्यावर अभि चांगलाच चिडला. “हेच चालू आहे का म्हणजे काय? माझं काय चालू आहे?”
अभिची आई – “मी काय सांगितलं होतं हे असं वेडयासारखं जमिनीवर लोळायचं नाही म्हणून. अग मीना तू तरी सांग त्यांना. अगदी वेडयासारखंच वागतो हा. काय म्हणतील लोक. असं दुसऱ्यांच्या घरी येऊन लोळतात का? मीना काकू रागावणारे आता.”
“अग श्वेता, रागावायचं कशाला. छान न भांडता, न रडता मस्त खेळतायत.”
“हे असं? ह्याला काय खेळ म्हणायचा?” –अभिची आई.
“अग श्वेता स्वतःचं शरीर समजून घ्यायची उत्सुकता आहे त्यांना. त्यांना पहायचंय त्यांचं शरीर कसं वाकतं, कसं दिसतं. बघू दे की त्यांना. नंतर मोठी झाली की आसन करा म्हणून मागे लागण्यापेक्षा आत्तापासूनच शरीराचे बाक, ताणे समजूदेत त्यांना. त्यांना त्यांचं शरीर आवडलं पाहिजे आणि त्यासाठी ते नीट समजलं देखील पाहिजे. पण अभि, आई सांगते ते बरोबर आहे हां. दुसऱ्यांच्या घरी जाऊन असं केलेलं चांगलं दिसत नाही.”
“पण आम्ही कुठे दुसऱ्यांच्या घरी करतोय? सुमितच्या तर घरी करतोय.” – अभि.
आता सईची आईही हाक मारत आलीच. “काय चाललंय? घरी यायचं की नाही. हे काय लोळतायत का सगळे?” – सईची आई
“काही नाही मीना म्हणत्येय की ते त्यांचं शरीर समजून घेतायत. चला पण जेवायची वेळ झाली. चला आता घरी.” – श्वेता
“सुमितच्या घरी खेळतात म्हणजे मुलं नक्कीच काहीतरी वेगळं करत असणार आणि त्यांना साथ द्यायला मीना काकू आहेच. बरं सई चल आता. आणि अजेय तू पण चल. आईनी बोलावलंय.”
मुलं घरी जायला निघाली खरी पण नाईलाजानेच. पायांचं निरीक्षण संपलं की मग पाठीचं निरीक्षण करायचं होतं ना. आपल्या पाठीचं निरीक्षण कसं करणार ही मुलं? हा तुम्हाला पडला तसा प्रश्न त्या सुअअसउ या पाचीजणांना पडलाच नाही. कारण ते एकमेकांच्या पाठीचं निरीक्षण करणार होते ना.