गुहागर तालुक्यातील नरवण येथील घटना, जाधव वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष
गुहागर, ता. 17 : वंचित आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर 17 तारखेला दुपारी 1.15 च्या दरम्याने प्राणघातक हल्ला (Attack on Anna Jadhav) झाला. गुहागर तालुक्यातील नरवण गावातील सावली हॉटेलजवळ ही घटना घडली. सध्या त्यांच्यावर गुहागरच्या ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी तातडीने गुहागरमध्ये दाखल झाले आहेत.
Attack on Anna Jadhav
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, वंचित आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास तथा अण्णा जाधव हे त्यांच्या पत्नी आणि कार्यकर्त्यांसह दोडवलीत चालले होते. दुपारी नरवण येथील सावली हॉटेलमध्ये जेवण्यासाठी ते थांबले होते. अण्णांना दूरध्वनी आला म्हणून ते हॉटेलबाहेर आपल्या गाडीजवळ येवून भ्रमणध्वनीवरुन संभाषण करत होते. याचवेळी एका दुचाकीवरुन तिघेजण त्याच्याजवळ पोचले. त्यांच्यामध्ये मिनिटाभराचे संभाषण झाले. त्यानंतर अण्णांच्या गाडीवर दगड मारुन, अण्णांवर चाकु हल्ला करण्यात आला. अण्णांनी मानेवर होणारा वार उजव्या हाताने अडवला आणि आरडाओरडा सुरु केला. त्यामुळे हॉटेलमध्ये बसलेली त्याची पत्नी व कार्यकर्ते अण्णांच्या दिशेने धावले. हे पहाताच हल्लेखोरांपैकी एकाने पिस्तुल काढले. परंतु ते न चालवताच आलेल्या दुचाकीस्वारांनी तेथून पलायन केले. दोन कार्यकर्त्यांनी हातात दगड घेवून दुचाकीने त्यांचा पाठलाग केला. मात्र हल्लेखोर पसार होण्यात यशस्वी झाले.
अण्णांची प्रकृती स्थिर
तातडीने अण्णांना दुसऱ्या वाहनातून पत्नी आणि कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालय गुहागरमध्ये उपचारासाठी दाखल केले. अण्णाच्या उजव्या हातावर धारदार चाकूने खोल जखम झाली आहे. मात्र त्याची प्रकृती आता स्थिर आहे.या प्राणघातक हल्ल्यामुळे अण्णा, त्यांची पत्नी आणि त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते सध्या दडपणाखाली आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी ग्रामीण रुग्णालयात येवून अण्णाची भेट घेतली. पाठोपाठ उपविभागीय पोलीस अधिकारी राजमाने हे देखील दाखल झाले. त्यानंतर घटना समजून घेणे, अण्णाचा व त्यांच्या पत्नीचा जबाब घेण्याचे काम सुरु होते. Attack on Anna Jadhav
या घटनेची माहिती मिळताच भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, शिवसेनेचे अमरदिप परचुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांच्यासह महायुतीच्या अनेक कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. दुपारी 3 वाजच्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत पोलीस अधिकारी आणि अण्णा जाधव पत्रकारांशी, कार्यकर्त्यांशी संवाद साधतील अशी अपेक्षा होती. मात्र अण्णा जाधव, त्यांच्या पत्नी आणि पोलीसांनी सायंकाळी 6 वाजेपर्यंत या घटनेची अधिक माहिती दिलेली नाही. Attack on Anna Jadhav
आज सायंकाळी गुहागरमध्ये महायुतीची रॅली आहे तर पाटपन्हाळे येथे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर जाधव यांची पाटपन्हाळे येथे प्रचार सभा आहे. त्यामुळे हे दोन राजकीय कार्यक्रम पूर्ण होत नाहीत तोपर्यंत अण्णा जाधव यांना पोलीस संरक्षणातून हलविले जाणार नाही असा सर्वांचा अंदाज आहे. Attack on Anna Jadhav