पोलीस अधिक्षक गर्ग यांनी गौरविले, कोविड बंदोबस्तात केली होती मदत
गुहागर, ता. 13 : कोविड महामारीच्या काळात जाहीर झालेल्या टाळेबंदीत जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेवर बंदोबस्ताची मोठी जबाबदारी होती. त्यावेळी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तरुण कार्यकर्ते, शिक्षक आदी अनेक मंडळी पोलीसांना मदत करत होती. यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी आणि पोलीस मित्राचा गौरव नुकताच पोलीस अधिक्षक कार्यालय रत्नागिरी येथे पार पडला. त्यामध्ये दाभोळ मधील 13 पोलीस मित्रांचा समावेश होता.
कोरोना महामारीमुळे केंद्र सरकारने मार्च 2020 ते मे 2020 पर्यंत देशात टाळेबंदी जाहीर केली होती. या टाळेबंदीच्या काळात कोरोनाचा प्रसार होवू नये म्हणून आरोग्य यंत्रणा कार्यान्वित झाली होती. त्याचवेळी टाळेबंदीमध्ये कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडु नये याची संपूर्ण जबाबदारी पोलीस खात्यावर होती. ही जबाबदारी पार पाडताना पोलीसांना एकाचवेळी अनेक आघाड्यांवर लढावे लागत होते. कोरोनाच्या रुग्णाला रुग्णालयात नेताना नातेवाईक गोंधळ घालायचे. अशा वेळी पोलीसांची मदत घेतली जात असे. काही ठिकाणी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांना संपर्कातील व्यक्ती शोधण्यामध्ये लोक अडचणी उभ्या करायचे. त्याठिकाणीही पोलीसांना या कर्मचाऱ्यांचे संरक्षण करावे लागत असे. बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांची तपासणीही पोलीसच करायचे. गावाअंतर्गत, तालुक्यांतर्गत होणारी ये जा याकडे ही लक्ष ठेवावे लागत होते. टाळेबंदीतून काही नियमांमध्ये शिथिलता निर्माण केल्यावर मास्क, सामाजिक अंतर आदी गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचेही काम पोलीसच करत होते.
या सर्व कामांसाठी आवश्यक मनुष्यबळ पोलीसांकडे नव्हते. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलीसांना मदत करण्यासाठी स्थानिक तरुण हिरीरीने पुढे आले. दाभोळ येथील दिलीप तवसाळकर, सचिन कुडाळकर, सागर चव्हाण, दिलदार वणकर, इम्तियाज मूगाये , महमद सारंग, रमजान सोलकर, गुलजार बालाभाई, इम्रान मांडलेकर, राजेश राजवाडकर, प्रसाद देपोलकर (दहामोडी) तसेच उसगांवला रहाणारे सुयोग वैद्य व प्रकाश सावरकर या तरुणांनी पोलीस मित्र बनुन पोलीसांसोबत काम केले. त्याच्या या कामाची दखल रत्नागिरीतील पोलीस अधिक्षक कार्यालयाने घेतली. पोलीसांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कोविड योध्द्यांचा सत्कार पोलीस अधिक्षक मोहितकुमार गर्ग यांनी केला. त्यावेळी या 13 पोलीस मित्रांचाही सत्कार मोहितकुमार गर्ग यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक कार्यालय रत्नागिरी येथे करण्यात आला.