शीर गावात जल्लोष, आमदार जाधवांनी दिली सर्व सहकाऱ्यांना पदे
गुहागर, ता. 12 : गुहागर पंचायत समितीच्या उपसभापती पदाची निवडणूक सोमवारी पार पडली. उपसभापतीपदी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रसच्या तिकिटावर वेळणेश्वर पंचायत समिती गणातून निवडून आलेले सदस्य सिताराम ठोंबरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सीताराम ठोंबरे यांना संधी मिळाल्याने आमदार भास्कर जाधव यांनी त्याच्या सोबत काम केलेल्या सर्व पंचायत समिती सदस्यांना सभापती किंवा उपसभापतीचे काम करण्याची संधी दिली आहे.
(Sitaram Tombre is elected as Panchyayat Samiti Deputy Chairman i.e. Upsabhapati. MLA Bhaskar Jadhav has given the post of Panchayat Samiti Chairman and Deputy Chairman to all his colleagues.)
सीताराम ठोंबरे हे तालुक्यातील शीर गावचे रहिवासी आहेत. गावातील सामाजिक कार्यात सहभागी असणाऱ्या शेतकरी कुटुंबातील सीताराम ठोंबरे यांना आमदार भास्कर जाधव यांनी पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी दिली. वेळणेश्र्वर पंचायत समिती गणातून निवडून आल्याने सीताराम ठोंबरेंच्या रुपाने शीर गावाला हक्काचा पंचायत समिती सदस्य मिळाला. आता त्यांच्या रुपाने शीरला उपसभापती पदाचा बहुमान मिळाला आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ही गोड भेट शीर गावाला मिळाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. उपसभापती सीतारा ठोंबरे यांचे शीरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.
फेब्रुवारी 2017मध्ये झालेल्या गुहागरच्या पंचायत समितीच्या निवडणुकीत आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्त्वामध्ये सीताराम ठोंबरे, पांडुरंग कापले, सौ. पुनम पाष्टे, सौ. विभावरी मुळे, सुनील पवार हे चार सदस्य निवडून आले होते. गुहागर पंचायत समितीचे सभापती पद महिलेसाठी आरक्षित असल्याने सौ. पुनम पाष्टे व सौ. विभावरी मुळे (दोन वेळा) सभापती पदाची संधी आमदार जाधव यांनी दिली. तर पांडुरंग कापले, सुनील पवार व सीताराम ठोंबरे यांना उपसभापती पदाची संधी आमदार जाधव यांनी दिली.
आज उपसभापती पदासाठी सीताराम ठोंबरे यांची निवड झाल्यावर सभापती सौ. पूर्वी निमुणकर, माजी सभापती सौ. विभावरी मुळे, सौ. पुनम पाष्टे, माजी उपसभापती सुनील पवार, पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य प्रवीण ओक. शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत, विनायक मुळे यांनी अभिनंदन केले.