कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारचे आदेश
गुहागर, ता. 10 : गावागावात रेशन दुकानदारांमार्फत सुरु असलेली शिधापत्रिका शोध मोहिम तुर्तास थांबली आहे. बनावट व अपात्र शिधा पत्रिकांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना शिधापत्रिका शोध मोहिम अभियान राबविण्याच्या सूचना फेब्रुवारी महिन्यात दिल्या होत्या. मार्च महिन्यात या अभियानाला 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने या मोहिमेला तात्पुरती स्थगित दिली आहे. त्यामुळे बनावट शिधापत्रिकांची शोध मोहीम काही काळ थांबणार आहे. (Ration Card Search Operation Postponed)
बनावट किंवा अपात्र शिधापत्रिकाधारकांचा शोध घेऊन त्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्याचे आदेश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत. त्यानुसार राज्यात १ फेब्रुवारीपासून मोहीम राबवण्यास सुरवात झाली. या मोहिमेमध्ये बी.पी.एल., अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, पांढरे आणि आस्थापना कार्ड या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी सुरू करण्यात आली होती. प्रत्येक शिधापत्रिकाधारकाकडून अर्ज भरून घेण्यात येत होता. यासोबत उत्पन्नाचा दाखला, रहिवासी असल्याचा दाखला, शिधा पत्रिकेवर नमुद केलेल्या सर्व व्यक्तिंची आधारकार्ड आदी कागदपत्रे जोडायची आहेत. या कागदपत्रांची छाननी पुरवठा विभागाचे अधिकारी करणार असून त्यामध्ये ज्या शिधापत्रिका अपात्र, बनावट, खोट्या असल्याचे समोर येईल त्या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच शिधापत्रिका शोध मोहिमेत जे शिधापत्रिकाधारक अर्ज सादर करणार नाहीत. त्यांच्याही शिधापत्रिका रद्द होणार आहेत. या आदेशांप्रमाणे शिक्षापत्रिका शोध मोहिमेतील अनेक शिधापत्रिका रद्दही करण्यात आल्या.
मात्र आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून ही मोहिम सध्या स्थगित करण्याचे आदेश राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी राज्य सरकारला मनुष्यबळ हवे आहे. शिधापत्रिका शोध मोहिमेचे प्रत्यक्ष काम रेशन दुकानदार करत असले तरी दाखले देणे, कागनपत्रांची तपासणी करणे आदी कामे तलाठी व ग्रामसेवक यांच्यामार्फत होत होती. त्यांना कोरोना संसर्गसंदर्भातील कामे करता यावीत. हा देखील या मोहिमेला स्थगिती देण्यामागचा उद्देश आहे.