शृंगारतळीत पोलीसांची वाहनचालकांवर कडक कारवाई
गुहागर, ता. 10 : आज राज्यात विकेंड लॉकडाऊन पाळला जात आहे. त्याला गुहागर तालुक्यातील व्यापाऱ्यांनी पाठींबा देत दुकाने बंद ठेवली. त्यामुळे शृंगारतळीसह आबलोली, गुहागर, तळवली, पालशेत, आदी तालुक्यातील सर्व बाजारपेठा बंद होत्या. शृंगारतळीत दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनांवर गुहागर पोलीसांनी कारवाई केली. या बंदमुळे गेल्यावर्षीच्या लॉकडाऊनची आठवण पुन्हा एकदा सर्वांना झाली आहे.
In Guhagar Taluka Shops, Hotels, Public Transport etc Closed on Weekend Lokdown. This Lockdown refreshed the memories of March 2020 Lockdown. In Shringartali Police actioned on private vehicles movement. Overl all Weekend Lockdown Successful in Guhagar Taluka.


गुहागर तालुक्यात वैद्यकीय सेवा व औषधांची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद होती. शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरु होती. मात्र या कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांखेरीज अन्य कोणीही उपस्थित नव्हते. विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर गुहागर आगाराने ग्रामीण भागातील एस.टी.च्या सर्व फेऱ्या बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे बसस्थानवर एकही प्रवासी नव्हता. नेहमी वर्दळ असलेल्या बँका, पोस्ट कार्यालयातही शुकशुकाट होता.


व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून विकेंड लॉकडाऊन 100 टक्के यशस्वी केला. तरीही गुहागर आणि शृंगारतळीमध्ये तुरळक वाहनांची ये जा सुरु होती. श्रृंगारतळीत हे प्रमाण अधिक होते.


सुरवातीला पोलीस सूचना देवून वाहनचालकांना सोडत होते. मात्र तरीही वाहनांची वर्दळ वाढू लागल्याने अखेर पोलीसांनी कारवाईला सुरवात केली. विनामास्कच्या वाहनचालकांकडून दंड वसुली केली. वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करणे. ती अपूर्ण असल्यास मोटार वाहन कायद्याप्रमाणे दंडात्मक कारवाई करणे. विनाकारण फिरणाऱ्यांना शिक्षा करणे. अशा कारवाईला पोलीसांनी सुरवात केल्यावर मात्र वाहनांची वर्दळ कमी झाली.




तालुक्यातील आबलोली येथेही व्यापाऱ्यांनी विकेंड लॉकडाऊनला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. बाजारपेठेतील दुकाने बंद होती. शिवाय वहातूकही पूर्णपणे बंद होती. त्यामुळे कायम गजबजलेल्या आबलोली बाजारपेठतही आज शुकशुकाट होता.



