गुहागर विजापूर महामार्ग : संयुक्त मोजणीनंतरचे काम रखडलेले
गुहागर, ता. 9 : विजापुर महामार्गाच्या आरंभ बिंदुपासून गुहागर शहरातील भू संपादनाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. मात्र मोडकाआगर पुलावर स्लॅब पडल्यानंतर गुहागर ते मोडकाआगर रस्त्याच्या कामाला सुरवात करण्याचे नियोजन सध्या मनिषा कन्स्ट्रक्शनद्वारे सुरु आहे. त्यामुळे भुसंपादनाबाबत प्रत्यक्ष कार्यवाही कधी सुरु होणार असा प्रश्र्न येथील जागा मालकांना पडला आहे.
Land Acquisition Process is not completed in Guhagar City for Guhagar Vijapur National Highway. Thereafter Contractor is planning to start the work from 0 KM.
गुहागर विजापुर महामार्गाचा आरंभ बिंदु गुहागर शहरातील बाजारपेठ नाका येथे आहे. बाजारपेठ नाका ते गुहागर बसस्थानकापर्यंतचा मार्ग अरुंद असुन त्याच्या दोन्ही बाजुला गेली अनेक वर्ष दुकाने आहेत. बस स्थानकानंतरच्या मार्गावर काही ठिकाणी स्थानिकांची घरे आहेत. भूमि अभिलेख कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार महामार्गाच्या आरंभ बिंदुपासून ते खरे ढेरे महाविद्यालयापर्यंतच्या परिसरात रस्त्यासाठी नव्या रस्त्याच्या मध्यबिंदुपासून 12 मिटर ते 30 मिटर भुसंपादन केले जाणार आहे. प्रत्यक्षात यापैकी महामार्गासाठी आवश्यक तेवढीच जागा यावेळी घेतली जाणार आहे. ज्या जमीनमालकांच्या जागा जाणार आहेत. त्यांना संयुक्त मोजणीनंतर एक नोटीसही आली आहे. मात्र त्यानंतर कोणतीच कार्यवाही भुसंपादन कार्यालयाकडून झालेली नाही. सर्वसाधारणपणे संयुक्त मोजणीनंतर भुसंपादन अधिकारी एक नोटीस काढुन जमीन मालकांना आपली जागा घेणार असल्याचे सुचित करतात. त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर येवून शासन आपल्याला लागणारी जागा चिन्हांकित करते. त्याचा आदेश प्रसिध्द करुन त्यावर हरकती मागिविल्या जातात. त्यानंतर अवॉर्ड प्रसिध्द होते. जागा मालकाकडून कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर शासनाच्या नियमांप्रमाणे जागामालकाला मोबदला देण्याची प्रक्रिया सुरु होते. मात्र संयुक्त मोजणी नंतर एका सूचनापत्राशिवाय अन्य कोणतीही कार्यवाही भुसंपादन अधिकाऱ्यांकडून आजतागायत झालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष भुसंपादन केव्हा होणार, आम्हाला आमची किती जागा संपादित केली जाणार आहे याची माहिती केव्हा मिळणार. असे अनेक प्रश्र्न रस्त्याशेजारील जागा मालकांना पडले आहेत.
दरम्यान मोडकाआगर येथील पुलावर स्लॅब टाकण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. गुढीपाडव्यापर्यंत मोडकाआगरच्या नव्या पुलाचे काम पूर्ण होणार आहे. या पुलाला दोन्ही बाजुने जोडणाऱ्या रस्त्याचे काम एप्रिल अखेर सुरु होईल. या कामाबरोबरच गुहागरच्या आरंभ बिंदुपासून महामार्गाचे काम सुरु करण्याचे नियोजन ठेकेदार मनिषा कन्स्ट्रक्शनचे अभियंत करत आहेत.