कै. प्र. ल.मयेकरांच्या ७५ व्या जन्मदिनी प्रसारण
गुहागर, ता. 31 : मराठी रंगभूमीला अजरामर संहिता देणारे, १९८० च्या दशकात मराठी रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ नाटककार कै. प्र. ल. मयेकर यांच्या ७५ व्या जन्मदिनी त्यांच्या रंगभूमीवरील ऐतिहासिक कार्याला उजाळा मिळणार आहे. रत्नागिरीच्या समर्थ रंगभूमीने कै. प्र. ल. मयेकर यांच्या नाट्यविषयक कारकिर्दीवर तयार केलेला माहितीपट रविवार दि. ४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
कोकणातील प्रतिभासंपन्न नाट्यलेखक प्र. ल. मयेकर यांनी अग्निपंख, दीपस्तंभ, रातराणी, गंध निशिगंधाचा, पांडगो इलो रे बा इलो, अथ मनुस जगन हं , तक्षकयाग, डॅडी आय लव्ह यू, काळोखाच्या सावल्या ही नाटके लिहिली. या नाटकांनी रंगभूमी गाजवली. नाटकं, पुत्रवती, जोडीदार हे लोकप्रिय चित्रपट हा देखील प्र.ल. मयेकरांचा ठेवा. रक्तप्रपात, रोपट्रिक, अतिथी, आय कन्फेस सारख्या अजरामर एकांकिका त्यांनी मराठी रंगभूमीला दिल्या. रंगभूमी समृध्द करणारे नाटककार अशी त्यांची ओळख आहे.
प्र.ल.मयेकर यांचा जन्म ४ एप्रिल १९४६ रोजी आडिवरेतील कोंभेवाडीत झाला. प्रतिभासंपन्न नाटककार कै. प्र. ल. मयेकर यांचा ४ एप्रिल रोजी ७५ वा जन्मदिवस. त्यानिमित्ताने १९८० च्या दशकातील मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळाला उजाळा मिळणार आहे. समर्थ रंगभूमी निर्मित प्र. ल. हा माहितीपट रविवार सकाळी १० वाजता सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. प्र. ल. माहितीपटाची संकल्पना आणि लेखन दुर्गेश आखाडे यांनी केले असून निवेदन अभिनेता अविनाश नारकर, प्रमोद पवार आणि अभिनेत्री मयुरा जोशी यांनी केले आहे. छायाचित्रण अजय बाष्टे, संकलन धीरज पार्सेकर, ध्वनीमुद्रण उदयराज सावंत, पार्श्वसंगीत योगेश मांडवकर यांचे असून माहितीपटाचे दिग्दर्शन श्रीकांत पाटील आणि दुर्गेश आखाडे यांचे आहे. देवीलाल इंगळे यांचे निर्मिती सहाय्य लाभले आहे. कोकणाने मराठी रंगभुमीला दिलेल्या प्रतिभावान कलाकाराची ओळख होण्यासाठी निर्मिती केलेला प्र. ल. या माहितीपट सर्वांनी पहावा. असे आवाहन समर्थ रंगभूमीने केले आहे.
माहितीपटातून ‘प्र.ल.’ भेटतात
प्र. ल. मराठी रंगभूमीवरचं ब्रॅण्डनेम… प्र. ल. या माहितीपटातून रसिकप्रेक्षकांना प्र. ल. मयेकर भेटतातच. पण त्याचबरोबर प्र. ल.मयेकरांसोबत काम करणारे दिग्गज आपले अनुभव आणि किस्से सांगतात. त्यातूनच मराठी रंगभूमीवरचा प्रलमय प्रवास अधिक उलगडतो.
या माहितीपटाचा प्रोमो (एक झलक) इथे पहा…..