गुहागर, ता. 31 : तालुक्यातील देवघर येथे रहाणारा अथर्व गोंधळेकर 31 मार्चला पहाटे बेपत्ता झाला आहे. सकाळी सायकल घेवून तो घरातून बाहेर पडला. परत न आल्याने गोंधळेकर कुटुंबियांनी शोधाशोध केली. सायंकाळपर्यंत तो घरी परतेल. अशी आशा सर्वांना होती. मात्र अथर्व परत न आल्याने कुटुंबियांनी अर्थव बेपत्ता झाल्याची तक्रार गुहागर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. (Atharva Gondhalekar missing)
देवघर भाग्यनगर येथे रहाणारे जीतेंद्र रामदास गोंधळेकर सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत. सध्या ते आरजीपीपीएल वसाहतीच्या सुरक्षा व्यवस्थेत अधिकारी म्हणून काम करतात. त्यांचा मुलगा अथर्व अभ्यास हुशार आहे. 31 मार्च 2021 ला सकाळी अर्थव सायकल घेवून घरातून बाहेर पडला. घरातील मंडळींना वाटले की, अथर्व फेरफटका मारुन पुन्हा घरी येईल. त्यामुळे तो काय घेवून जातोय याकडे कोणी लक्ष दिले नाही. मात्र सकाळी 10 वाजेपर्यंत अर्थव घरी आला नाही. स्वाभाविकपणे तो कोणा मित्राकडे गेलाय का, आजुबाजुच्या परिसरात कुठे रमलाय का, याची चौकशी सुरु झाली. परंतु अथर्वचा पत्ता लागला नाही. अथर्वसोबत घरातील कोणत्याच व्यक्तिचा वाद, भांडण झाले नव्हते. अभ्यासावरुनही त्याला कोणी रागावले नव्हते. त्यामुळे अथर्व काही वेडावाकडा विचार करेल असे कोणाच्याच मनात आले नाही.
अथर्व हा कृष्णभक्त आहे. लहानपणापासूनच त्याला जप करणे, धार्मिक ग्रंथ वाचणे याची ओढ आहे. त्याचे मन कायम कृष्णभक्तीतच रमते. अथर्वला निसर्गाच्या सानिध्यात जावून जप करण्याचीही आवड होती. दुपारपर्यंत अथर्व घरी आला नाही त्यामुळे घरच्या मंडळींनी त्यांची पोथी, जपाची माळ आदी गोष्टी घरात जागेवर आहेत ना हे तपासले. तेव्हा लक्षात आले की, अथर्व आपल्यासोबत या गोष्टी आणि घरातील काही पैसे घेवून घरातून बाहेर पडला आहे. आता त्याला शोधण्याची दिशा बदलली. तो नेहमी जावून बसतो असे मंदिर, जंगलातील जागा येथे शोध घेतला गेला. मात्र तेथेही अथर्व सापडला नाही. सायंकाळ पर्यंत अथर्व घरी परतला नाही. अखेर अथर्व बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी गुहागर पोलीस ठाण्यात केली आहे. (Missing complaint registered in Guhagar Police Station)
काही ज्योतिष तज्ज्ञांकडे जावून नातेवाईकांनी विचारणा केली त्यावेळी अथर्व दोन तीन दिवसांत परतेल. तो सध्या आहे त्या ठिकाणी सुखरुप आहे. असा आशावाद ज्योतिष तज्ञांनी वर्तवला आहे. मात्र अथर्वच्या बेपत्ता होण्याने गोंधळेकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
एखाद्या मठ मंदिरात, 12 वीत शिकणारा, सोबत सायकल असलेला, जपजाप्य करणारा अनोळखी मुलगा आला असेल तर जवळच्या पोलीस ठाण्यात त्याची माहिती द्यावी. असे आवाहन अथर्वचे वडिल जीतेंद्र रामदास गोंधळेकर यांनी केले आहे.