शृंगारतळीत अपघात, वाहनचालक निमशासकीय कर्मचारी
गुहागर, ता. 29 : शृंगारतळीत भरधाव वेगाने आलेली गाडी रस्त्याच्या कामासाठी आणलेल्या जनरेटरवर आपटली. सुदैवाने चारचाकीतील चौघांचा जीव वाचला. हा अपघात विनायका ऑटोमोबाईल या पेट्रोलपंपासमोर घडला. सदर गाडी परजिल्ह्यातील असून कारचालक निमशासकीय कार्यालयात सेवेत आहे. जनरेटमुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा शृंगारतळीत सुरु आहे.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, श्रृंगारतळीत वेळंब फाट्यापासून जवळपास जानवळे फाट्याच्या पुढपर्यंत रस्त्याचे क्रॉक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. या नव्या रस्त्यावरुन वहातूकही सुरु आहे. सोमवारी बाजारपेठ बंद आणि त्यात धुळवड असल्याने बँक ऑफ इंडिया, गुहागर बाजार या बाजुच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम वेगाने सुरु होते. सोमवारी रात्री 7.45 ते 8.00 च्या दरम्यान चिपळूणकडून एक कार (MH 12 FY 0563) गुहागरच्या दिशेने येत होती. जानवळे फाटा येथे ही कार नव्या रस्त्यावरुन भरधाव वेगाने जात होती. इतक्यात पेट्रोलपंप परिसरात समोरुन गुहागरकडून एक वाहन आले. त्याला जागा देण्यासाठी कारचालकाने आपली गाडी बाजुला घेतली. मात्र त्या बाजुला रस्ताच नसल्याने कार क्राँक्रिट रोडवरुन काम चालु असलेल्या रस्त्यावर आदळली. गाडी वेगात असल्याने चालकाचे गाडीवरली नियंत्रण सुटले. गाडी काही फुटांवर रस्त्यावर उभ्या केलेल्या जनरेटरवर जावून आदळली. ही धडक इतक्या वेगात बसली की जनरेटरवर आदळलेली गाडी दणका बसल्यावर क्षणार्धात पुन्हा १ फुट उंचीच्या काँक्रिट रस्त्यावर जावून अडकली. जोराने आवाज झाल्याने ग्रामस्थ घटनास्थळी धावले. नव्या रस्त्यावर अर्धवट चढलेली गाडी ग्रामस्थांनी ढकलुन काम चालु असलेल्या रस्त्यावर उभी केली. गाडीतल्या माणसांना बाहेर काढले. तेव्हा लक्षात आले की कारमधील चालकासह चौघांना साधी दुखापतही झाली नव्हती. फक्त दणका बसल्याने प्रवासी थोडे घाबरले होते. जनरेटरमुळे चौघेही थोडक्यात बचावले होते.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीप्रमाणे ही कार निमशासकीय कार्यालयात काम करणारा कर्मचारी चालवत होता. तो नशेत होता. या घटनेची नोंद अद्याप पोलीस ठाण्यात झालेली नाही. मात्र मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून नुकसान केल्याबद्दल गुन्हा नोंदविण्याची प्रकिया सुरु आहे. त्यामुळे या चौघांची नावे अजुन कळू शकलेली नाहीत.
जनरेटर नसता तर….
रस्त्याच्या कामासाठी आणलेला जनरेटर नसता तर ही कार थेट काँक्रिटीकरण करणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या यंत्रावर जावून आदळली असती. त्यामध्ये यंत्राचे नुकसान झाले असतेच शिवाय वाहनातील प्रवाश्यांना आणि रस्त्यावर काम करणाऱ्या माणसांना गंभीर दुखापत झाली असती. जनरेटरमुळे मोठा अपघात टळला.