गुहागर तालुक्याला प्रथमच अध्यक्ष पद, उपाध्यक्ष पदी उदय बने
गुहागर, ता. 22 : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विक्रांत भास्करराव जाधव यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे विक्रांत जाधव याच्या रुपाने प्रथमच गुहागर तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्ष हे पद मिळाले आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदी ज्येष्ठ जिल्हा परिषद उदय बने यांचीही निवड बिनविरोध झाली आहे. या निवडीसोबत सहा सभापतींची निवडही आज रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सभागृहात करण्यात आली. (Vikrant Jadhav Elected as Ratnagiri Z.P. President, Vice President is Senior Shivsena Leader Uday Bane)
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी विक्रांत जाधव यांच्या नावावर रविवारीच शिक्कामोर्तब झाले होते. सोमवारी (ता. 22) सकाळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, यांनी आमदार राजन साळवी, जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या उपस्थितीत या नावाची औपचारिक घोषणा केली.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने, रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेना बहुमतात असल्याने ही निवड बिनविरोध होणार हे देखील निश्चित होते. शिवसेनेने नांव निश्चित केल्यावर उमेदवारी अर्ज भरणे आणि औपचारीक घोषणा होणे तेवढे बाकी होते. त्याप्रमाणे दुपारी विक्रांत जाधव यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
आमदार भास्कर जाधव यांच्या सोबत राहुन राजकारणे धडे गिरवणाऱ्या विक्रांत जाधव यांनी युवानेता म्हणून आपली प्रतिमा तयार केली. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाचे काम करताना महाराष्ट्रातही संघटनात्मक कामांसाठी प्रवास केला. आमदार जाधव यांनी जोडलेल्या हजारो ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा विनम्रतेने आदर देणारा युवानेता म्हणूनही त्यांना ओळखले जाते. केवळ वडिल राजकारणात आहेत म्हणून विक्रांत जाधव राजकारणात आले असे नाही. तर त्यांनी स्व मेहनतीने राजकारणामध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. वडिलांचा मतदारसंघ असला तरीही सातत्याने अंजनवेल जिल्हा परिषद गटातील जनतेच्याही संपर्कात ते असतात. अनेक विकासकामांना त्यांनी निधी आणला आहे. त्यांच्या रुपाने गुहागर तालुक्याला प्रथम जिल्हा परिषद अध्यक्ष हे पद मिळाले आहे.
आज जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदासाठीही निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उदय बने हे देखील बिनविरोध निवडून आले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या अधिकारात येणारा कृषी व पशु संवर्धन विभाग स्वतंत्र करण्यात आला. त्याबरोबर अन्य विभागांच्या सभापतींची आणि स्थायि समितीच्या सदस्यांची निवडही यावेळी करण्यात आली. त्याचा तपशील पुढील प्रमाणे :
कृषी व पशु संवर्धन विभाग सभापती : रेश्मा झगडे, दापोली
शिक्षण सभापती : चंद्रकांत मंचेकर, लांजा
महिला व बालकल्याण समिती सभापती : भारती सरवणकर, राजापूर
समाज कल्याण विभाग सभापती : परशुराम कदम, रत्नागिरी
स्थायि समिती सदस्य : रोहन बने, महेश उर्फ बाबू म्हाप, अण्णा कदम व स्वप्नाली पाटणे