ग्रामदेवस्थानांची मागणी, प्रांतांकडून परवानगी आणण्यात वेळ व पैसा खर्च
गुहागर, ता. 18 : शिमगोत्सवातील पालखीचे वेळी ग्रामस्थ वर्ष राखणेपोटी एक निश्चित रक्कम ग्राममंदिराला देतात. त्यातून गुरुवांचे मानधन, वर्षभरातील अन्य सण यांचा खर्च चालतो. गेल्यावर्षी पालख्या गावभोवनी पूर्ण न होता परतल्या. त्यामुळे मुळात ग्रामदेवस्थाने आधीच अडचणीत आहेत. यावर्षी गावभोवनी झाली नाही तर ग्राममंदिराचा खर्च भागविण्याचे संकट उभे रहाणार आहे. त्यामुळे घरोघरी पालखी नेण्यात येवू नये ही अट जिल्हाधिकाऱ्यांनी शिथिल करावी. अशी मागणी विविध गावातील देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
जिल्हा प्रशासनाने 10 मार्च रोजी काढलेल्या आदेशांमध्ये बदल करुन उपविभागीय दंडाधिकारी (प्रांत) यांच्या परवानगीने 25 जणांच्या उपस्थित पालखी घरोघरी फिरवता येणार आहे. मात्र उपदंडाधिकारी यांची परवानगी घ्यायची असेल तर प्रथम गुहागर पोलीस ठाण्यात अर्ज करावा लागतो. त्याची पोच घेवून चिपळूणच्या प्रांत कार्यालयात जावून तेथे पुन्हा विहित नमुन्यात अर्ज करावा लागतो. गुहागर पोलीस ठाण्याने अंतर्गत व्यवस्थेतून प्रांत कार्यालयात ना हरकत दाखला दिल्या नंतर प्रांत कार्यालयात परवानगीचे कागद तयार होतात. त्यावर प्रांताची सही झाल्यावर ही परवानगी मिळते. या प्रक्रियेमध्ये गुहागर तालुक्यातील ग्रामस्थांना आपल्या गावातून गुहागरला यावे लागते. तेथून चिपळूण गाठावे लागते. परवानगी हातात पडेपर्यंत दिवसभराचा वेळ जातो. शिवाय प्रवासासाठी पैसे खर्च होतात. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ही अटच शिथिल करावी. 25 माणसांच्या उपस्थित गावभोवनीचा कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी देवस्थान पदाधिकारी करत आहेत.अशी मागणी तालुकावासीय जनता करत आहे.
(To get Permission form Sub Divisional Officer, chiplun is Expensive in the matter of time and Cost. Therefore, Hon. District Collector should relax the condition of GAVBHOVANI. The Trusty’s demand is give direct permission to Gavbhovani with obligatory all conditions related with Corona. )
पालखीच्या उत्पन्नातून ग्रामदैवतांचे आर्थिक चक्र
कोकणातील ग्राममंदिराचे व्यवस्थापन गावकरी, मानकरी पहातात. गेल्या काही वर्षात अनेक मंदिरांनी व्यवस्थापन समिती बनवली आहे. ही देवस्थाने मंदिर जीर्णोध्दारासारखा मोठा खर्च असेल तरच देणगी गोळा करतात. अन्यथा देवस्थानचा खर्च परंपरेने संपूर्ण गाव चालवत असतो. संपूर्ण गावातून निधी जमा करण्याचा सण म्हणजे शिमगोत्सव. बहुतांशी गावांमध्ये शिमगोत्सावपूर्वी चतु:सिमेची सभा होते. या सभेत गावभोवनी करता जाणाऱ्या पालखीचे वेळी प्रत्येक घरातून देवस्थानसाठी किती पैसे घ्यायचे त्याची निश्चिती होते. त्याला वर्षराखण किंवा वर्षासन असे म्हटले जाते. या निधीतून गावदेवीच्या मंदिरात होणाऱ्या वर्षभरातील सणांसाठीचा खर्च केला जातो. त्यामध्ये रक्षाबंधनाचे दिवशी रुपे लावणे, दिपावलीचा दिवा फिरवणे, देवांना जंगलात नेणे, देवांना आणणे, वर्षाची राखण देणे, पुजारी मानधन, दिवाबत्ती, वीजबील आदी खर्चांचा समावेश असतो.
ग्राममंदिरांसमोर आर्थिक अडचण
गेल्यावर्षी शिमगोत्सवातच टाळेबंदी जाहीर झाली. त्यामुळे अनेक गावांच्या पालख्या गावभोवनी होण्यापूर्वीच देवळात गेल्या. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत वर्षराखण जमा झाली नाही. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे पालखी घरोघरी फिरवू नये. असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. परिणामी यावर्षीही वर्षराखणेचा निधी गोळा करणे अवघड आहे. मग वर्षभराचे हिशोब कसे भागवणार असा प्रश्र्न व्यवस्थापन समितीसमोर उभा आहे.
गुहागरच्या देवस्थानने चतु:सिमेतील घरांमध्ये पालखी नेण्यासाठी प्रांतांकडे परवानगी मागितली होती. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनांना अधिन राहून गावभोवनीला परवानगी दिली आहे.
सिध्दीविनायक जाधव, कार्यकर्ता, श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थान, गुहागर
प्रांतांकडून काही देवस्थानांनी गावभोवनीला परवानगी मिळवली आहे. त्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांनी घरोघरी पालखी न नेण्याची अट आदेशातून काढून टाकली तर खेडोपाड्यातील जनतेचा खर्च आणि वेळ वाचेल.
श्रीकांत महाजन, सेक्रेटरी श्री व्याघ्रांबरी देवस्थान आरेगांव
जिल्हाधिकाऱ्यांनी शिमगोत्सवाबाबत 10 मार्च 2021 रोजी दिलेल्या सूचना वाचण्यासाठी इथे ***** क्लिक करा.