परगावी रहाणाऱ्या ग्रामस्थांनी शिधापत्रिका शोध मोहिमेत सहभागी व्हावे
गुहागर, ता. 17 : शिधा पत्रिका शोधमोहिमेचे कालावधी 12 एप्रिल पर्यंत वाढविण्यात आला आहे. तसेच शिधा पत्रिकाधारकांचे उत्पन्नाचे दाखले घेण्यात यावेत सरसकट उत्पन्नाचे दाखले घेण्यात येवू नयेत.असे आदेश गुहागरच्या तहसीलदारांनी दिले आहेत. या दोन्ही मुद्द्यांबाबत भाजपचे गुहागर तालुकाध्यक्षांनी तहसीलदार व धान्य पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. ही मागणी मान्य केल्याबद्दल नीलेश सुर्वे यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. (shidha patrika shodh mohim)
राज्यात सर्वत्र शिधापत्रिका शोध मोहिम सुरु आहे. या मोहिमेचा कालावधी 20 मार्चला संपणार होता. या कालावधीत सर्व शिधापत्रिकांची तपासणी करणे शक्य नसल्याने मोहिमेची मुदत वाढवावी. शिधा पत्रिकेसोबत जोडावयाचा उत्पन्नाचा दाखला प्रशासनाकडून कमी कालावधीत मिळणे शक्य नाही. तसेच मार्च महिन्यात काढलेला उत्पन्नाचा दाखला 31 मार्चनंतर उपयोगी पडत नाही. त्यामुळे उत्पन्नाच्या दाखल्याची अट शिथील करावी. असे निवेदन भाजपचे गुहागर तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी 9 मार्चला तहसीलदार व धान्य पुरवठा अधिकाऱ्यांना दिले होते. (BJP Taluka President thanked Government)
15 मार्च ला गुहागरच्या तहसीलदारांनी निर्गमित केलेल्या आदेशामध्ये मोहिमेचा कालावधी 12 एप्रिलपर्यंत वाढविला आहे. तसेच उत्पन्नाच्या दाखल्यांची सरसकट मागणी करु नये. असा ठळक उल्लेख केला आहे. त्यामुळे सुर्वे यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. तसेच तालुकावासीयांना आवाहन केले आहे की प्रत्येक शिधापत्रिकाधारकाने सरकारमान्य रास्त दराच्या दुकानावर जावून शोध मोहिमेचे अर्ज भरुन द्यावेत. हे अर्ज भरताना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे नावे व त्याचे सध्याचे वय, प्रत्येक व्यक्तीचा व्यवसाय व वार्षिक उत्पन्नाची खरी नोंद करावी. या अर्जासोबत कुटुंबप्रमुखाचा फोटो, रेशन कार्डची झेरॉक्स, मोबाईल नंबर, रेशनकार्डवर नावे असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आधारकार्डची झेरॉक्स, आणि रहीवासी असल्याचा पुरावा, द्यायचा आहे. हा पुरावा देण्यासाठी भाडेपावती, बँक पासबुक, ड्रायव्हिंग लायन्सस, गॅस जोडणी क्रमांक, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, वीजबिल, टेलिफोन/मोबाईल बिल, घराच्या मालकीचा पुरावा (घरपट्टी किंवा घरपत्रक, असेसमेंट उतारा), शासकीय ओळखपत्र या पैकी एका पुराव्याची झेरॉक्स ही कागदपत्रे जोडायची आहेत. आपल्या गावात शिधापत्रिकेत नोंद आहे मात्र सध्या ते ग्रामस्थ बाहेरगावी रहात असतील तर त्यांनाही या मोहिमेची माहिती देवून प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगावी. असे आवाहन नीलेश सुर्वे यांनी केले आहे.
दरम्यान तहसीलदारांच्या आदेशानंतरही काही रेशन दुकानदार, ग्रामसेवक आणि तलाठी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी सरसकट आग्रह करताना दिसत आहेत. त्यांना योग्य त्या सूचना शासनाने द्याव्यात. अन्यथा भाजप कार्यकर्ते नावासह त्यांची तक्रार करतील. असा इशारा भाजप सरचिटणीस सचिन ओक यांनी दिला आहे.