गोपनियता इतकी की रविवार सायंकाळपर्यंत पोलीस प्रशासनाही होते अंधारात
गुहागर, ता. 14 : शहरानजिकच्या एका गावात शनिवारी (ता. 13) रात्री धाड पडली. सदर घरात संशयास्पद काहीच मिळाले नाही. म्हणून त्या कुटुंबियांच्या गावातील घरातही शोधाशोध झाली. तेथेही हाती काहीच न लागल्याने अखेर धाड टाकणाऱ्या अधिकाऱ्यांनी 45 वर्षीय व्यक्तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सदर व्यक्तिला रविवारी सायंकाळपर्यंत घरी पाठवतो. तो पर्यंत कोणाजवळही काहीही बोलायचे नाही अशा सूचना कुटुंबियांना देण्यात आल्या होत्या. स्थानिक पोलीस प्रशासनालाही या धाडीबाबत कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती.
रविवारची सकाळ उजाडली ती एका धाडीच्या बातमीने. सुरवातील सर्वांनाच ही बातमी अफवा असल्याचे वाटत होते. या घटनेबद्दल अर्धवट माहिती असल्याने अफवांचे पेव फुटले. कोणी म्हणत होते मुंबईतील एका गुन्ह्याच्या शोधात सीबीआय, सीआयडी आले होते. कोणी म्हणत होते कोल्हापुरतील नार्कोटिक्स विभागाने धाड टाकली. कोणाला वाटले की, २ किलो गांजा जप्त केला. परंतु नेमकी माहिती कुठूनच मिळत नव्हती. गुहागरातील पत्रकार ही विविध मार्गांनी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत होते. कोल्हापूर, मुंबई, पुणे अशा विविध ठिकाणी संपर्क करुन या धाडीविषयी काही कळते का याची माहिती घेण्याचे प्रयत्न सुरु होते. गुहागरच्या पोलीस ठाण्यातही दुपारपर्यंत अधिकृत माहितच नव्हती. त्यामुळे पोलीस अधिकारी देखील या विषयाचा शोधात होते. हाती काही लागत नसल्याने अखेर पत्रकारांनी थेट ज्या घरात धाड पडली ते घर गाठले. त्याचवेळी पोलीसही माहिती घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.
पत्रकार, पोलीस अधिकारी आणि पोलीस पाटील जेव्हा सदर घरात पोचले. तेव्हा या घरातील दोन महिला, दोन मुले तणावाखाली असल्याचे लक्षात आले. त्यापैकी एकीने शनिवारी रात्रीच्या घटनेची माहिती दिली. रात्री 11 ते 11.30 च्या सुमारास सदर घराचा दरवाजा ठोठवण्यात आला. बेल वाजली. इतक्या रात्री दार ठोठवण्याने हा दरोड्याचा तर प्रकार नाही ना. म्हणून कोणीही दरवाजा उघडत नव्हते. त्यामुळे बाहेर उभ्या असलेल्या मंडळींनी दरवाजा जोरात लोटायला सुरवात केली. घरातील कर्ता पुरुषाने गच्चीत जावून दरवाज्यात उभ्या असलेल्या माणसांवर नजर टाकली. आलेली माणसे चोर नाहीत याची खात्री केल्यानंतर घराचा दरवाजा उघडला. चार, पाच माणसे घरात शिरली आणि प्रश्र्नांची सरबत्ती सुरु झाली. नेमकं काय घडतयं हे कोणालाच समजत नव्हते. त्यामुळे घरातील एका महिलेचा रक्तदाब कमी झाला. एका महिलेला उलट्या सुरु झाल्या. मात्र आलेल्या साध्या वेषातील व्यक्तिंनी या सर्वांकडे दुर्लक्ष करुन घराची झडती घेण्यास सुरवात केली. घरातील एका पोत्यात कोंबडीचे खाद्य होते. ते पोते तपासले. पुदिनाची सुकलेली पानांचा वास घेतला. परंतु धाड टाकण्यासाठी आलेल्या मंडळींना आक्षेपार्ह काहीच मिळाले नाही. मग तुमचे नातेवाईक कुठे रहातात. गावात अन्यत्र घर आहे का. अशी चौकशी सुरु झाली. त्यामध्ये त्याच गावात नातेवाईक रहातात. मात्र सध्या ते बाहेरगावी आहेत. असे कुटुंबियांनी उत्तर दिले. या उत्तराने समाधान न झालेल्या मंडळींनी रात्री त्या घराचीही झडती घेतली. अखेर सदर घरातील 45 वर्षीय व्यक्तिला ताब्यात घेतले. तुम्ही घाबरुन जाऊ नका. आम्ही यांना रविवारी सायंकाळपर्यंत घरी सोडतो. तोपर्यंत कोणाजवळही काहीही वाच्यता करायची नाही. अशा सूचना देण्यात आल्या होत्या. या सगळ्या प्रकाराने घरातील मंडळी इतकी भेदरली होती की त्यांनी आपल्या घरात पडलेल्या धाडीविषयी कोणालाच काही सांगितले नाही. गावचे पोलीस पाटील परिचयातील असून त्यांच्याजवळही या संदर्भात वाच्यता केली नाही.
वेगवेगळ्या विषयात तपास करणाऱ्या संस्थांना कोठेही, कधीही धाड टाकण्याचे अधिकार असतात. अशी धाड टाकण्यापूर्वी सदर खाते सदर कारवाईबाबत गुप्तता बाळगते. मात्र धाडसत्र संपल्यावर केलेल्या कारवाईची माहिती साधारणपणे स्थानिक पोलीसांना देण्यात येते. त्यावेळी अधिकच्या सूचनाही देण्यात येतात. अनेकवेळा दुसऱ्या जिल्ह्यातील अधिकारी धाड टाकणार असतील तर त्याच्या सूचना सदर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या जातात. मात्र शनिवारी रात्री पडलेल्या धाडीबाबत कोणतीच कल्पना गुहागर पोलीस ठाण्यात देण्यात आली नव्हती.
सदर घरातील सर्व माहिती कळल्यानंतर पोलीसांनी सदर प्रकरणाची अधिक चौकशी केली. त्यावेळी ताब्यात घेतलेल्या व्यक्तिला घरी पाठवण्यात आल्याचा निरोपही त्यांना मिळाला. पोलीसांनी हा निरोप कुटुंबाला दिला. तेव्हा या कुटुंबाने खऱ्या अर्थाने मोकळा श्र्वास घेतला. पत्रकार मात्र अजुनही हा सर्व प्रकार कोणत्या खात्याने केला याबाबत अनभिज्ञ होते. अखेर घरातून मिळालेली माहिती. पोलीसांकडून मिळालेली माहिती यावरुन सदर धाड कस्टम विभागाने टाकली असेल. असा तर्क लावून पत्रकारांनी त्या दिशेने चौकशी करण्यास सुरवात केली. रविवार असल्याने गुहागरचे कस्टम कार्यालय बंद होते. चिपळूणच्या कस्टम कार्यालयाचा क्रमांक मिळत नव्हता. अखेर पत्रकार विविध मार्गाने थेट कस्टमच्या कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यापर्यंत पोचले. सदर धाड कस्टम चिपळूण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार टाकली होती. असे कस्टमचे तपासी अंमलदार मुकेश कुमार यांनी सांगितले. मात्र आजही या धाडीबद्दल अधिकृतरित्या सविस्तर माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. ही कारवाई अधिक चौकशीचा भाग होता. त्याठिकाणी काहीही मिळुन आलेले नाही. अधिक काही मिळून आले तर तुम्हाला कळवतो. इतकेच मुकेश कुमार यांनी सांगितले.