भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे : मोहिम योग्य मुदतवाढ द्यावी
गुहागर : शासनाकडुन तहसील कार्यालयामार्फत चालु करण्यात आलेली शिधापत्रिका तपासणी मोहीम अतिशय योग्य आहे. यामुळे रेशनकार्डधारकांची सत्यता समोर येणार असून धान्य वाटपात समानता येणार आहे. मात्र ही तपासणी मोहीम राबविताना काही निकषात परीस्थीतीजन्य बदल करणे अत्यावश्यक असल्याची सूचना भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी गुहागर पुरवठा विभागाला निवेदनाद्वारे केली आहे.
गुहागर तालुक्यात ७२ रास्तदराची धान्य दुकाने असुन अंदाजे ३६ हजार रेशनकार्डधारक आहेत. शिधापत्रिका तपासणी मोहीमेची दिलेली २० मार्च २०२१ पर्यंतची मुदत फारच कमी कालावधीची आहे. या मर्यादित कालावधीत ही तपासणी मोहीम अशक्यप्राय आहे. तसेच ज्यांच्या नावे रेशनकार्ड आहे असे अनेक तालुकावासीय कोरोना कालावधीनंतर नुकतेच रोजगारासाठी तालुक्याबाहेर गेले आहेत. तर कोरोना प्रतीबंधीत नवीन निकषामुळे त्याना कोरोना चाचणीशिवाय पुन्हा तालुक्यात येण शक्य नाही. शिधापत्रिका तपासणी मोहीमेत उत्पन्नाचा दाखला अनिवार्य करण्यात आहे. तालुक्यातील ३६ हजार रेशनकार्डधारकना २० मार्चपर्यंत उत्पन्नाचा दाखला काढणे व तो शासकीय यंत्रणेकडुन तयार करून मिळणे अशक्यप्राय आहे. तसेच या कामी होणारा आर्थीक भुर्दंड कोरोना कालावधी नंतर सावरणा-या तालुक्यातील गोरगरीब जनतेला परवडणारा नाही. तालुक्याच्या ठीकाणी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी होणारी ३६ हजार रेशनकार्डधारकंची गर्दी कोरोना संक्रमणाला आमंत्रण ठरु शकते. तसेच ३१ मार्च २०२१ रोजी आर्थीक वर्ष संपत असल्याने तो दाखला ११ दिवसानी निरुपयोगी होणार आहे. त्यामुळे उत्पन्नाच्या दाखल्या ऐवजी रास्तधान्य दुकानाच्या ठीकाणीच संबधित सजेच्या तलाठ्यांच्या समक्ष शिधापत्रिका तपासणी अर्ज भरुन घेण्यात यावा. निवासासंबधीचा पुरावा म्हणुन अर्जाप्रमाणे १ ते १० मधील किमान एक पुरावा असला तरी तो ग्राह्य धरण्यात यावा. अशी मागणी भारतीय जनता पार्टी गुहागर यांच्यावतीने गुहागर तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, याआधी झालेली दारीद्र्यरेषेखालील प्राधान्यक्रमातील लाभार्थी यादी सदोष असल्याकारणाने अनेक खरे लाभार्थी या योजनांपासुन वंचीत राहीले आहेत. त्यामुळे आता होणारी शिधापत्रिका तपासणी मोहीम ही रेशन दुकान चालक, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, तंटामुक्त समीती अध्यक्ष, पोलीस पाटील, ग्राम पंचायत सदस्य या सर्वांसमोर होण्याची मागणी तालुक्यातुन जोर धरत आहे. तरच रेशनकार्डधारकांचे सत्य बाहेर पडणार असुन ख-याखु-या लाभार्थ्याना शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे.