गाज रिसॉर्टतर्फे दिवाळीनिमित्त स्वरसंध्या संगीत मैफिल, खयाल, ठुमरी, अभंग, नाट्यसंगीताचा सुरेल नजराणा
गुहागर, ता. 20 : तालुक्यातील पालशेत येथील सागरीकिनारी गाज रिसाँर्टतर्फे आयोजित केलेली स्वरसंध्या गाज संगीत मैफिल सुप्रसिध्द गायिका विदुषी सौ. मंजुषा पाटील यांनी गाजवली. अस्ताला जाणारा सागरी किनारचा सूर्य, साद घालणारी सागराची गाज, पक्ष्यांचे गुंजन, किलबिलाट अशा सायंकाळच्या नयनरम्य भारलेल्या वातावरणात मंजुषा पाटील यांच्या सुरांची गाज रसिकांना अनुभवायला मिळाली. Mellow tunes “Gaaz” by the sea in Palshet
पालशेत येथील दिवाळीनिमित्त गाज स्वरगंध स्वर संध्या कार्यक्रम प्रमुख रसिक निमंत्रितांच्या उपस्थितीत आयोजित केला होता. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराजाच्या मूर्तीचे पूजन करुन या संगीत मैफिलीला सुरुवात झाली. यावेळी पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक व गाज रिसॉर्टचे मालक जितेंद्र जोशी व त्यांची पत्नी सारिका जोशी यांनी सांगितले की, रिसॉर्टमध्ये या कार्यक्रमाचे यावर्षीचे तिसरे पुष्प असून येथील पर्यटक व प्रेक्षकांना येथील कोकणी संस्कृती कला संगीताचे माहिती व्हावी यासाठी अशा पद्धतीचे दरवर्षी कार्यक्रम होत राहतील. Mellow tunes “Gaaz” by the sea in Palshet
मंजुषा पाटील यांनी खयाल, ठुमरी भजन, अभंग, नाट्यसंगीत आदी विविध धाटणीची मराठी गाणी गात पर्यटक व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव केदार राग आळवत त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. यानंतर ”कट्यार काळजात घुसली” मधील ठुमरी तालीचे ”लागे कलेजवा”, बालगंधर्व यांचे ”वद जाऊ कुणाला शरण” व ययाती- देवयानी मधील हे ”सुरांनो चंद्र व्हा” ही नाट्यसंगीते गायली. संत मीराबाई यांचे प्रभू रामाला साद घालणारे ”म्हारे घर आओजी” हे वेगळ्या चालीचे गीत गायल्यानंतर कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात वारीमधील ”अवघे गरजे पंढरपुर”, ”अबीर गुलाल”, ”श्रीरंगा कमलाकांता” हे गीते गाऊन ”जोहार मायबाप जोहार” या भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली. Mellow tunes “Gaaz” by the sea in Palshet
कार्यक्रमाचे निवेदन चिपळूणचे प्रसिध्द निवेदक धनंजय चितळे यांनी केले. प्रास्ताविक सौ. श्रीया सोमण यांनी केले. तबलासाथ प्रशांत पांडव, पखवाज प्रथमेश तारळकर, हार्मोनियम अभिनय लवंडे, साईड रिदम सुश्रुत चितळे यांनी साथ दिली. या कार्यक्रमाला रत्नागिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभली होती. यावेळी उद्योजक राजन दळी, डॉ. कैलास वैद्य, गोविंद बेडेकर, शशिकांत जोशी, डॉ. चंद्रकांत पवार, डॉ. राहुल मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. Mellow tunes “Gaaz” by the sea in Palshet