आमदार जाधव : गुहागरमध्ये एक गाव एक दिवस उपक्रमांचा शुभारंभ
गुहागर ता. 07 : मराठवाडा विदर्भची थकबाकी महाराष्ट्रातील अन्य विभागांपेक्षा दुप्पटीने आहे. त्या तुलनेत महावितरणची रत्नागिरी जिल्ह्यात थकबाकीच नाही. कोकणातील जनता शासनाची, बँकेची थकबाकी ठेवत नाही. त्यामुळे शासनाने कोकणाच्या विकासासाठी प्रोत्साहन निधी तरी द्यावा. अशी मागणी महावितरणने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्य सरकारकडे करावी. असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी गुहागरमध्ये केले. ते महावितरणच्या एक गाव एक दिवस उपक्रमांच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.
महावितरणच्या साताऱ्या जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी एक गाव एक दिवस हा उपक्रम सातारा जिल्ह्यात यशस्वी केला. त्यामुळे महावितरणने संपूर्ण राज्यात एक गाव एक दिवस हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम गुहागर तालुक्यात राबविण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ आमदार भास्कर जाधव यांनी केला. गुहागर पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात या उपक्रमांची माहिती महावितरणचे गणेश गलांडे यांनी दिली.
त्यानंतर आमदार भास्कर जाधव म्हणाले की, कोरोनाच्या संकटात थकबाकी वाढल्याने महावितरण कंपनी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. वीजमाफीचा निर्णय विधीमंडळाच्या सभागृहातच होवू शकतो. आज रत्नागिरी जिल्ह्याची 5 कोटीची थकबाकी वसुल झाली तर 33 टक्के रक्कम जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी महावितरणला मिळेल. असा दावा अधिकारी करत आहेत. मात्र या रक्कमेतून जिल्ह्यातील वीजेच्या समस्या महावितरण सोडवू शकत नाही. ही वस्तुस्थिती अधिकाऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. कोकणाला न्याय द्यायचा असेल तर या उपक्रमाबरोबरच स्वतंत्र प्रस्ताव तयार करावा लागेल.
महाराष्ट्राला केंद्र सरकाच्या अर्थसंकल्पातून, निती आयोगातून निधी कमी मिळतो कारण आपल्याकडे थकबाकी नाही. सर्वाधिक महसुल महाराष्ट्रातून मिळतो. तीच परिस्थिती कोकणाची. आमच्याकडे वीजेची, कर्जाची थकबाकी नाही. म्हणून आमच्याकडे विकासाबाबत दुर्लक्ष केले जाते. हा विषय आकडेवारीनिशी सरकारकडे मांडावा. आम्ही वसुली करतो म्हणून आम्हाला प्रोत्साहन निधी मिळावा अशी मागणी केली पाहिजे. माझीही कोकणासाठी हीच मागणी राहील.
निसर्ग वादळसारख्या आपत्तीत महावितरणने खूप चांगले काम केले आहे. फयान वादळाचा अनुभव गाठीशी असल्याने राज्यातील अन्य ठिकाणाहून काम करणाऱ्या टीम आणणे, त्यांना क्वारंटाईन न करता तातडीने काम करण्याची परवानगी देणे ही कामे केल्यानेच गुहागरमध्ये निसर्ग वादळात झालेले नुकसानीनंतरही कमी कालावधीत वीजपुरवठा सुरुळीत झाला.
रस्त्याच्या कडेला ॲकेशीयासारखी या मातीत न रुजणारी झाडे तुटून पोल आणि वाहिन्या तुटतात. कोकणात स्थानिक प्रजातीची झाडे रस्त्याच्या दुर्तफा लावली तर ती तुटणार नाहीत. या विषयाचा पाठपुरावा गेली काही वर्ष मी करतोय. हा विषय मीच मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरही मांडला. आता संपूर्ण राज्यात त्या त्या विभागातील स्थानिक प्रजातीची झाडे लावावीत असा निर्णय झाला आहे. माझ्या प्रयत्नांना यश आले आहे. एकेकाळी गुहागरात वीज गेली की 8 दिवस येत नसे. मंत्री असताना वेगवेगळ्या ठिकाणाहून वीज मिळण्याची उपलब्धता केल्याने तोही विषय मार्गी लावलाय. अशी लोकांच्या लक्षात येणार नाही अशी वीज वितरणासंदर्भातील विविध कामे मी मार्गी लावली आहेत.
एक गाव एक दिवस या उपक्रमामधुन
कंपनी लोकांपर्यंत पोचविण्याचे काम होईल. हा उपक्रम ग्राहकांना जोडायला उपयोगी पडेल. वीज हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असल्याने तुमच्या समस्या सोडविण्यासाठी मी नक्कीच सर्वोतोपरी मदत करेन. अशी ग्वाही यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी दिली.
यावेळी सभापती सौ. विभावरी मुळे, उपसभापती सुनील पवार, अतिरिक्त गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, पंचायत समिती सदस्य पांडुरंग कापले, सिताराम ठोंबरे, महावितरणचे गलांडे, नगरसेविका निलीमा गुरव, मृणाल गोयथळे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता गणेश गलांडे, आबलोलीच्या सहाय्यक अभियंता सौ. जयश्री माळकर, रानवीचे सहाय्यक अभियंता बसवराज कलशेट्टी, गुहागरच्या कनिष्ठ अभियंता प्रियांका वाठोरे, शृंगारतळीतील सहाय्यक अभियंता सनी पवार, तळवलीचे कनिष्ठ अभियंता रोहित दाबेराव, वरिष्ठ यंत्रचालक कोल्हापूरे, पालशेतच्या सहाय्यक अभियंता सौ. सुमित्रा सपकाळ, ज्येष्ठे कार्यकर्ते विनायक मुळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कोल्हापूरे यांनी केले. तर प्रास्ताविक सौ. जयश्री माळकर यांनी केले.
सध्याचे शिक्षण न समजणारे सुत्रसंचालन करणारे वरिष्ठ यंत्रचालक कोल्हापुरे यांचा आवाज ऐकून आमदार जाधव म्हणाले की, तुमचा आवाज ऐकून तुमच्या वडिलांची आठवण झाली. तुमचे वडिल मला इतिहास आणि गणित शिकवायला होते. त्यांनी शिकवलेले विषय आजही लक्षात आहेत. आज त्यांची आठवण झाली. त्या काळातील शिक्षक आम्ही विसरुच शकत नाही. आजचं शिक्षण मात्र आम्हाला न समजणारेच आहे.