नाटेकरांचा गट महिलांसाठी, तर ओकांचा गट नामप्रसाठी आरक्षित
गुहागर, ता. 28 : विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण आरक्षण पडले. तर सौ. नेत्रा ठाकूर यांचा वेळणेश्र्वर जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला. त्यामुळे हे दोघेही नशिबवान ठरले आहेत. मात्र जि.प. माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर यांचे कार्यक्षेत्र असलेला पडवे गट महिलांसाठी आरक्षित झाला आहे. (ZP Reservation)
ZP Reservation
गुहागर तालुक्यात नव्या रचनेत 5 जिल्हा परिषद गट आहेत. या गटांचे आरक्षण पुढील प्रमाणे 28 असगोली : सर्वसाधारण, 29 शृंगारतळी : सर्वसाधारण महिला, 30 कोंडकारूळ : नागरिकांचा मागास प्रवर्ग, 31 वेळणेश्वर : सर्वसाधारण महिला, 32 पडवे : सर्वसाधारण महिला.
महेश नाटेकर (Mahesh Natekar) यांनी शिवसेनेचे तालुकाप्रमुख असताना दोन पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद गटातून स्वत: निवडून येण्याची किमया साधली. युती नसताना स्वबळावर मिळवलेल्या यशाने त्यांचे नेतृत्त्व आणि कर्तृत्व सिध्द झाले. पुढे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाचा मानही महेश नाटेकर यांना मिळाला. स्वाभाविकपणे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेत जाण्यासाठी ते इच्छुक होते. परंतू यावेळी पडवे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला. त्यामुळे महेश नाटेकर यांची मोठी अडचण झाली आहे. (ZP Reservation)
जि.प. सदस्य प्रविण ओक (Pravin Oak) यांचा वेळंब जिल्हा परिषद गट नव्या रचनेत शृंगारतळी आणि कोंडकारुळ या दोन जिल्हा परिषद गटात विभागला गेला आहे. कोंडकारुळ गट नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी तर शृंगारतळी गट महिलांसाठी आरक्षित झाला आहे. नव्या जि.प. गटातील आरक्षणाने प्रविण ओक यांची संधी हिरावून नेली आहे. (ZP Reservation)
वेळणेश्र्वर जिल्हा परिषद गटामधुन भाजपचे जिल्हा ओबीसी अध्यक्ष संतोष जैतापकर इच्छुक होते. गेल्यावेळी झालेल्या पराभवानंतर याच गटात पुन्हा निवडून येण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली होती. कोरोना काळातील आरोग्य सेवा, मुंबईसह स्थानिकांच्या संपर्कात रहाणे असे अनेक प्रयत्न त्यांनी केले. मात्र यावर्षी आरक्षणाने त्यांना फसवले. वेळणेश्र्वर गट पुन्हा महिलांसाठी आरक्षित झाला. हे विद्यमान जि.प. सदस्या सौ. नेत्रा ठाकुर (Netra Thakur) यांच्या पथ्यावर पडले आहे. आमदार भास्कर जाधव यांनी यापूर्वीच सौ. नेत्रा ठाकुर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. जिल्हा परिषद गटाची पुर्नरचना झाल्यावर त्यांनी नव्या मतदारसंघातही आधी पासुनच मोर्चेबांधणी सुरु केली होती. त्यामुळे सौ. नेत्रा ठाकुर यांचे या गटातून विजयी होणे जवळपास निश्चित आहे. (ZP Reservation)
जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव (Vikrant Jadhav) यांनी तरुण वयात आणि अवघ्या वर्षभराच्या कालावधीत अध्यक्ष या नात्याने जिल्ह्यात सर्वत्र काम केले आहे. संधीचे सोनं हा कार्य अहवाल प्रसिध्द करणारा पहिला जिल्हा परिषद अध्यक्ष अशी त्यांची ओळख बनली आहे. हे काम करताना अंजनवेल जिल्हा परिषद गटातही त्यांनी संपर्क ठेवला. आज नव्या रचनेतील त्यांच्या जिल्हा परिषद गटाचे नाव असगोली झाले आहे. काही गावे बदलली आहेत. पण तरीही या गटाचे आरक्षण सर्वसाधारण असेच आहे. ही विक्रांत जाधव यांच्यासाठी मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे विक्रांत जाधव यांचाही जिल्हा परिषदेचा मार्ग मोकळा झाला आहे. (ZP Reservation)