पालशेत : ग्रामस्थांनी कामाच्या दर्जाबाबत उपस्थित केले प्रश्र्न
गुहागर, ता. 02 : पेरिअर्बन स्कीममधुन पालशेतसाठी मंजुर झालेल्या पाणी योजनेची (Water Scheme) मुदतवाढ थांबत नाही. जलशुध्दीकरण प्रकल्प काम पूर्ण नाही. पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या काम पूर्ण नाही. मग या योजनेतून ग्रामस्थांना पाणी पूरवठा कधी होणार. असा प्रश्र्न पालशेतमधील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
पालशेत ग्रामस्थ प्रशांत सुर्वे, विनायक गुहागरकर, यशवंत पालकर, रविंद्र पालशेतकर, अजित साळवी, अनिल साळवी, माजी ग्रामपंचायत सदस्य रविंद्र कानिटकर, दत्तराज पाटील नव्या पाणी योजनेच्या विलंबाबाबत पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदे बोलताना रविंद्र कानिटकर म्हणाले की, गुहागर नगरपंचायत क्षेत्रालगत असलेल्या पालशेतला साडेसात कोटींची पाणी योजना पाच वर्षांपूर्वी मंजूर झाली. 2018 मध्ये काम सुरु झाले. ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण न केल्याने 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ मिळाली. मात्र आजतागायत पाणी योजनेचे कोणतेच काम पूर्ण झालेले नाही. योजनेच्या जलशुध्दीकरण (Filtration Tank) प्रकल्पाचे काम सुनील नाईक या ठेकेदाराने अननुभवी ठेकेदाराकडे दिले आहे. मुख्य वाहिनी (Main Line) ज्यांच्या जागेमधुन जाणार आहे त्यांचा जागा द्यायला विरोध आहे. नव्या पाणी योजनेसाठी बांधण्यात आलेल्या टाक्याचे बाहेरील प्लास्टर पडत आहे. जलवितरण वाहिनीचे (Water Distribution Line) काम अपूर्ण आहे. दुसऱ्यांदा दिलेली मुदतवाढ संपण्यासाठी केवळ महिनाभर शिल्लक आहे. अशा स्थितीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी योजनेची तपासणी कधी करणार. विलंबाबद्दल ठेकेदारावर कोणती कारवाई मजीप्रा करणार. असे अनेक प्रश्र्न आहेत.
ग्रामपंचायतीमधील पाणी पुरवठा कमिटीने सातत्याने या प्रश्र्नांचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. मात्र कोरोना संकट संपल्यानंतरही पाणी पुरवठा कमिटी या प्रश्र्नांचा पाठपुरावा करताना दिसत नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी या योजनेच्या कामाकडे लक्ष देत नाहीत. म्हणूनच मुदतवाढ देवूनही ठेकेदार काम करत नसल्याचे सातत्याने समोर येत आहे.
विहीरीचे कामही अपूर्णच
नवी पाणी पुरवठा योजना ज्या विहिरीवर (Old Jackwell)चालवायची त्या विहीरीचे कामाला अजून ठेकेदाराने हात लावलेला नाही. सध्या या विहीरीची खोली 10 मिटर आहे. मार्च, एप्रिल, मे, जून या कालावधीत योजनेचे पाणी पुरत नाही. त्यामुळे नव्या योजनेमध्ये जुन्या विहीरीची खोली ३ मिटरने वाढविण्याचे काम अंतर्भूत आहे. तसेच मार्च ते मे कालावधीत पुरेसे पाणी मिळण्यासाठी धरणाच्या मध्यमागी (Intake Chember) इनटेक चेम्बर बसविणे. तेथून मुख्य विहिरीत पाणी आणण्यासाठीची पंप आणि जलवाहिनीची व्यवस्था करणे. ही देखील कामे ठेकेदाराने करायची आहेत. मात्र अद्याप या कामांना ठेकेदाराने स्पर्शच केलेला नाही. लॉकडाऊननंतर पाण्याची पातळी कमी होत नसल्याने हे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्र्न आहे. आता जुन्या विहीरीजवळ 15 मिटर खोलीची नवी विहीर पाडण्याचा घाटही घातला जातोय. त्यामुळे ही योजना पूर्ण कधी होणार याची अंतिम तारीख प्राधिकरणने जाहीर करावी. अशी मागणी पालशेतचे ग्रामस्थ प्रशांत सुर्वे यांनी केली आहे.