जनार्दन आंबेकर ; गावातील प्रत्येक वाडीतील ग्रामस्थांशी सुसंवाद साधणार
गुहागर : तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच जनार्दन पांडुरंग आंबेकर, उपसरपंच सुरज अरुण घाडे व सदस्य यांनी उमराठ गावातील ग्रामस्थांच्या समस्या, विकासकामे, शासकीय योजना, महिला बचत गटात सक्रीय सहभाग, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा परिचय होणे, विकासकामे , गावातील समस्या व सोयी-सुविधांचा अभाव आदीबाबत ग्रामस्थांच्या सूचना स्वीकारणे, ग्रामस्थांशी चर्चा करणे व मार्गदर्शन करणे, आपला गाव आदर्श गाव ही संकल्पना पूर्ण करणे आदी कामांबाबतच्या हेतूने “सरपंच आपल्या दारी” हा उपक्रम २ मार्च पासून उमराठ गावातील दहा वाड्यांमध्ये दहा दिवसात राबविण्यात येणार आहे.
उमराठ ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी ग्रामपंचायतीतर्फे उमराठ गावात “सरपंच आपल्या दारी “या उपक्रमांतर्गत उमराठबुद्रुक व उमराठखुर्द या दोन महसूल गावातील तीन प्रभागातील दहा वाड्यांमध्ये वाडी भेट सदिच्छा कार्यक्रम नियोजित केला आहे. २ ते १५ मार्च २०२१ या कालावधीत दहा दिवस ( काही दिवस वगळून ) उमराठ गावातील प्रत्येक वाडीत सदिच्छा भेटीतून “सरपंच आपल्या दारी” हा उपक्रम राबविला जाणार आहे. २ मार्च रोजी मराठवाडी, ३ रोजी घाडेवाडी, ४ रोजी गोरिवलेवाडी, ५ रोजी धारवाडी, ६ रोजी धनावडेवाडी, ७ राजी बौद्धवाडी, ८ रोजी जालगावकरवाडी, १० रोजी आंबेकरवाडी व १५ मार्च रोजी डागवाडी व कोंडवीवाडी असा सदिच्छा वाडीभेटीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
यावेळी ग्रामस्थांच्या गैरसोयी व अडचणी जाणून घेणे, गावाच्या विकास कामांबाबत ग्रामस्थांच्या सूचना स्वीकारणे , शासकीय योजनांची ग्रामस्थांना माहिती देणे, शासकीय योजना राबविण्याबाबत मार्गदर्शन करणे, शैक्षणिक, आरोग्य व स्वच्छताविषयी मार्गदर्शन करणे, शेती, पशुपालन फलोत्पादन याविषयी माहिती देऊन स्वावलंबी होण्याबाबत मार्गदर्शन करणे, बेरोजगारांना रोजगाराबाबत मार्गदर्शन करणे, क्रीडा व हस्तकौशल्य विकासाबाबत मार्गदर्शन करणे, महिला बचत गटाचे महत्व पटवून देऊन महिलांना बचत गटात सक्रिय सहभागाबाबत प्रोत्साहन देणे व सक्षम बनविणे, ग्रामपंचायतीतर्फे शासकीय योजनांतून लघुउद्योग निर्माण करणेबाबत मार्गदर्शन करणे व सूचना स्वीकारणे, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वाड्यांमध्ये मूलभूत गरजा व सोयीसुविधा पूर्ण करण्याचा प्रयत्न करुन “आपला गाव आदर्श गाव” ही संकल्पना पूर्ण करणे, “आमचा गाव आमचा विकास ” या शासनाच्या घोषवाक्यानुसार ग्रामपंचायत क्षेत्रातील वाड्या सक्षम व समृद्ध होणेबाबत मार्गदर्शन करणे व अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणे असे हेतु व उद्दिष्ट “सरपंच आपल्या दारी “या उपक्रमाचे आहेत अशी माहिती सरपंच जनार्दन पांडुरंग आंबेकर यांनी दिली.