भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष श्री. संतोष जैतापकर यांची प्रमुख उपस्थिती
गुहागर, ता. 18 : तालुक्यातील पालपेणे येथे दिनांक १७ जुलै २०२५ रोजी ग्रामपंचायत पालपेणे आणि पुणे येथील श्री विश्वासराव थोरसे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गावातील मुख्य रस्त्यालगत सावली निर्माण व्हावी या हेतूने विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. Tree plantation program at Palpene

कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष श्री. संतोष जैतापकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मार्गदर्शन करताना त्यांनी पर्यावरण रक्षणाची गरज अधोरेखित करत “एक झाड, एक जीवन” या संदेशावर भर दिला. ग्लोबल वॉर्मिंगसारख्या वाढत्या पर्यावरणीय संकटांची जाणीवही त्यांनी उपस्थितांना करून दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, श्री. जैतापकर यांनी असेही सांगितले की, कोकणातील ग्रामीण भागातूनही आयएएससारखे उच्चपदस्थ अधिकारी घडावेत, यासाठी अभ्यास, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. Tree plantation program at Palpene

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात मा. रघुनाथ घाणेकर (माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ग्रामपंचायत सदस्य, गावकरी, महिला मंडळ, युवक मंडळ आणि शालेय विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. श्री विश्वासराव थोरसे यांच्या पुणे येथील संस्थेच्या वतीने कार्यक्रमासाठी झाडांची सुविधा करण्यात आली. गावाच्या विकासासाठी त्यांचे योगदान आदर्शवत असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत पालपेणे, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मेहनत घेतली. शेवटी, लावलेल्या झाडांची नियमित देखभाल करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. Tree plantation program at Palpene