पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी, माध्यमांवर निषेधाच्या चर्चा
गुहागर, ता. 10 : मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसमधील प्रवाश्याला प्रथम शृंगारतळी येथे नंतर बोऱ्या फाटा येथे मारहाण (Travels Owner Beat The Passenger) करण्यात आली. ही घटना 7 जुनला रात्री घडली. 8 जुनला समाज माध्यमांवर याबद्दलची माहिती वेगाने पसरली. माध्यमांवर निषेधाच्या चर्चा सुरु झाली आहे. 8 जुनला बसचालक आणि क्लिनरने पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर 9 जूनला संबंधित प्रवाश्याने चिपळूण पोलीस ठाण्यात मारहाणीबाबत तक्रार केली आहे. त्यामुळे मारहाणीचे प्रकरण आता चांगलेच तापणार आहे.
डिंगणकर यांनी नोंदवली तक्रार
8 जूनला मुंबईला गेलेल्या डिंगणकर यांनी 9 जूनला गुहागरला परत येत चिपळूण पोलीस ठाण्यात पद्मावती बसमध्ये झालेल्या मारहाणीची तक्रार नोंदवली आहे. सौ. अंजली डिंगणकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, पद्मावती ट्रॅव्हल्सने आबलोली ते गोरेगाव असा प्रवास करताना बसमधील क्लिनरने आंबा पेटीचे पैसे मागितले. ते पैसे देणार नाही सांगितल्यावर ट्रव्हल्सचा मालक आशिष गजानन चव्हाण यांनी शृंगारतळी येथे शिविगाळ केली. त्यानंतर बोऱ्या फाटा येथे गाडी थांबवली. त्यावेळी मालक आणि इतर 8 ते 10 लोकांनी गाडीत चढून अंजली डिंगणकर यांना काठीने डोक्याला मारहाण केली. इतर कुटुंबियांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. (Travels Owner Beat The Passenger)
काय घडले
7 जूनला सायंकाळी आबलोली येथून राकेश डिंगणकर त्यांची आई, पत्नी, दोन लहान मुले, काका-काकी आणि आजोबा हे पद्मावती या खासगी प्रवासी वहातूक करणाऱ्या बसने मुंबईला निघाले होते. त्यांच्या सामानामध्ये 4 आंब्याच्या पेट्या होत्या. शृंगारतळी येथे बस आल्यावर पद्मावतीमधील कर्मचाऱ्यांनी सदर आंब्याच्या पेट्यांचे स्वतंत्र भाडे द्यावे म्हणून राकेश डिंगणकर यांच्याकडे मागणी केली. त्यावेळी पेट्यांचे भाडे देण्यास राकेश डिंगणकर यांनी नकार दिला. या विषयावरुन भांडण सुरु झाले. त्याचवेळी पद्मावतीचे मालक चव्हाण तेथे आले. बसचालक आणि क्लिनर यांनी डिंगणकर पैसे देत नसल्याचे मालकांना सांगितले.
इथेच वादाची पहिली ठिणगी पडली. पद्मावती बसमधील अन्य प्रवाशांनी दिलेल्या माहितीवरुन मालक आणि डिंगणकर यांच्यात शृंगारतळी येथे पहिली झटापट झाली. त्यानंतर बस मार्गस्थ झाली. त्यामुळे सर्वांना वाटले वाद संपला.
मात्र राकेश डिंगणकर यांनी लिहिलेल्या पोस्ट प्रमाणे तसेच चिपळूण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी प्रमाणे पद्मावती बस मार्गताम्हान्याजवळ बोऱ्या फाटा परिसरात थांबविण्यात आली. याठिकाणी आणखी काही मंडळी जमली होती. त्यांनी राकेश डिंगणकरला पुन्हा मारहाण केली. मारहाण थांबविण्यासाठी राकेश डिंगणकर यांची आई, मुले, काका-काकी, पत्नी मध्ये पडली. मात्र झटापटीत त्यांच्यापैकी काहीजण जखमी झाले. Travels Owner Beat The Passenger
माध्यमांमधुन घटनेचा निषेध
प्रवासातील झालेल्या मारहाणीबाबत राकेश डिंगणकर यांनी 8 जूनला माध्यमांवर (व्हॉटसॲप) माहिती टाकली. ही पोस्ट वेगाने पसरली. त्यातून पद्मावतीचे बसमालक, बससेवा यांचा निषेध करणाऱ्या पोस्टही फिरु लागल्या. प्रत्येकजण या घटनेचा निषेध करत होता. या पोस्टचे प्रमाण इतक्या वेगाने वाढु लागले की अखेरीस पद्मावतीच्या मालकांना प्रत्युत्तर देणे भाग पडले.Travels Owner Beat The Passenger
बसमालकाचे प्रत्युत्तर
पद्मावतीचे मालक आशिष चव्हाण यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की, शृंगारतळी येथे नेहमीप्रमाणे गाडीत काही अडचण नाही ना असे विचारण्यासाठी गेलो असताना क्लिनरने एक प्रवासी आंब्याच्या पेट्यांचे पैसे देत नसल्याचे सांगितले. त्यांचे प्रवासी जास्त असल्याने अन्य सामानाचे पैसे नकोत मात्र आंब्याच्या पेट्याचे पैसे समजून द्या अशी विनंती केली. मात्र संबंधित व्यक्तीने, आम्ही काही देणार नाही तुमची गाडी आमच्या गावातून सुटते आणि तूम्ही आमच्याकडून कसले पैसे घेता आणि घेतलात तर या पुढे गावातून गाडी पुढे जाऊ देणार नाही. असे सांगत शिवीगाळ सुरु केली. कॉलर पकडून ढकलून दिले. आमच्या व्यवसायाबाबत चुकीच्या पध्दतीने बोलु लागला. तो दारुच्या नशेत होता. हे लक्षात आल्यावर सामानाचे पैसे घेऊ नका असे सांगून आम्ही गाडी सोडली. चालक आणि क्लिनरला गणेशखिंडीत यासंदर्भात तक्रार करण्यास सांगितले. मात्र त्या ठिकाणी त्या व्यक्तीने आपली कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले. 8 जूनला सकाळी पहाटे बस गोरेगाव (विरवानी) इथे पोहचली असता त्यांनी त्यांच्या जवळील 12 ते 15 लोकांना स्टॉप येथे बोलवून माझ्या ड्राइवर व क्लिनरला धमकावू लागले. याबाबत बसचालक आणि क्लिनर यांनी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली आहे.Travels Owner Beat The Passenger
खासगी बस व्यवसायाबाबत नाराजी
आता डिंगणकर आणि पद्मावती यांच्यातील वादावादीचे पडसाद माध्यमांवर अधिक वेगाने पसरु लागले आहेत. त्यामध्ये खासगी बस व्यावसायिकांकडून होणाऱ्या अन्यायालाही तोंड फुटले. विशेषत: गणपती उत्सवामध्ये रांगेत उभे राहूनही तिकीट मिळत नाही. तिकीट मिळाले तरी हे तिकीट आमचे नसल्याचे सांगणे. दर वाढविणे. वेळेवर गाडी न येणे. सामानासाठी मनमानी दर आकारणे. असे अनेक अनुभव सांगणाऱ्या पोस्ट माध्यमांवर येवू लागल्या. गेल्या दोन दिवसात पद्मावती या खासगी बसमधुन कोणीही प्रवास करु नये. अशी मोहिमच काही जणांनी हाती घेतली आहे. या बस व्यावसायिकांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही करण्यात येत होते.
