अवघ्या 10 मिनिटात पोलीसांनी केले जेरबंद
गुहागर, ता.11 : फ्लॅटमध्ये सापडलेल्या वाळुंच्या कणांवरुन अवघ्या 10 मिनिटात पोलीस चोरापर्यंत पोचले. सुरवातीला आरोपी गुन्हा कबुल करत नव्हता. मात्र पोलीसी खाक्या दाखविल्यावर या चोराने लपवलेला मालही पोलीसांच्या ताब्यात दिला. पोलीसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. हे नाट्य शुक्रवारी (ता. 10) शृंगारतळीत घडले.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी रोशन मोहल्ला येथील स्टारसिटी बिल्डींगमध्ये तिसऱ्या मजल्यावर कुलसुंबी मुनाफ शिरगावंकर (वय 40) यांचे कुटुंब रहाते. या बिल्डींगमध्ये गेले तीन चार दिवस बशीर समसुद्दीन गोटे, मुळ गाव वाघिवरे तांबेवाडी, ता. चिपळूण हा आपल्या नातेवाईकांकडे रहाण्यासाठी आला होता. त्याला शृंगारतळीमध्ये काम मिळाले होते. शुक्रवारी (ता. 10) कुलसुंबी शिरगावकर घरात एकट्या असल्याचे लक्षात आल्यावर बशीरने त्यांच्या सदनिकेत शिरुन कुलसुंबी यांची पर्स चोरली. आपल्या घरात कोणीतरी येवून गेल्याची चाहुल कुलसुंबी यांना लागली. परंतु त्यांना कोणीच दिसले नाही. घरातील कोणती वस्तू चोरीला गेली का असा संशय येवून त्यांनी घराची पहाणी केली. त्यावेळी आपली पर्स जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तातडीने कुलसुंबी यांनी घडला प्रकार पोलीसांना सांगितला. Thief arrested in 10 minutes


शृंगारतळीत कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल वैभव ओहोळ, प्रितेश रहाटे यांनी कुलसुंबी यांच्याघरी जावून पहाणी केली. स्टारसिटीमध्ये रहाणाऱ्या कुटुंबांची माहिती घेतली. त्यावेळी काही दिवसांपूर्वीच इमारतीमध्ये रहाण्यास आलेल्या बशीर गोटेबद्दल त्यांना संशय आला. बशीरला बोलावून त्यांची चौकशी केली. मात्र बशीरने चोरीचे कृत्य केल्याचे नाकारले. म्हणून बशीरला घेवून पोलीस पुन्हा कुलसुंबी यांच्या घरी गेले आणि सदनिकेत पर्स ठेवलेल्या ठिकाणापर्यंत पडलेले वाळुचे कण आणि पायांचे ठसे दाखवले. त्यांच्या पायावरील वाळुशी या कणांचे साम्य असल्याचे दाखवून दिले. तरीही बशीर चोरी केल्याचे नाकारत होता. मग मात्र पोलीसांनी आपला खाक्या दाखवला. अखेर बशीरने चोरलेली पर्स त्यातील 1 हजार रुपयांसह पोलीसांच्या ताब्यात दिली. Thief arrested in 10 minutes
या घटनेचा गुन्हा गुहागर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. त्यावेळी बशीर गोटे हा सराईत चोर असून चिपळूण पोलीस ठाण्यात त्याच्यावर 2006 आणि 2017 मध्ये दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. कुलसुंबी यांनी पोलीसांना चोरीची माहिती दिल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात पोलीसांनी चोर पकडला. याबद्दल गुहागर पोलीसांचे कौतुक होत आहे. Thief arrested in 10 minutes