नवदांपत्य अद्यापही बेपत्ताच; आतेचा हृदयविकाराने मृत्यू
गुहागर, ता. 01 : चिपळूण शहरातील गांधारेश्वर पुलावरून बुधवारी सकाळी वाशिष्ठी नदीत उडी मारून बेपत्ता झालेल्या नवदांपत्याचा दुसऱ्या दिवशीही शोध लागलेला नाही. एनडीआरएफच्या पथकासोबत नातेवाईकांनी खाजगी बोटींच्या साहाय्याने स्वतंत्ररीत्या शोधमोहीम सुरू केली असून दरम्यान या दु:खद घटनेचा धक्का बसून निलेश अहिरे यांच्या आत्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. The newlyweds jumped into the river

मूळचे धुळे जिल्ह्यातील व सध्या चिपळूण शहरात वास्तव्यास असलेले निलेश रामचंद्र अहिरे (वय २५) व त्यांची पत्नी अश्विनी निलेश अहिरे (वय २३) हे दोघे बुधवारी सकाळी ११ वाजता श्री गांधारेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी अश्विनी या संतप्त झाल्या होत्या. त्यानंतर गांधारेश्वर पुलावरून त्यांनी थेट वाशिष्ठी नदीत उडी घेतली. त्यांचे प्राण वाचवण्यासाठी निलेश यांनीही लगेचच नदीत उडी मारली. हा सर्व प्रकार काही प्रत्यक्षदर्शींनी पाहिल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर नगरपरिषद कर्मचारी, अग्निशमन दल व एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. शोध मोहिमेस काल संध्याकाळपर्यंतही काही यश मिळाले नाही. गुरुवारी दिवसभर एनडीआरएफ पथकाने गांधारेश्वर पुल परिसरात शोध घेतला. The newlyweds jumped into the river

मात्र बेपत्ता दाम्पत्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही. नातेवाईकांनी खाजगी बोटींच्या साहाय्याने सकाळपासून गोडकोट, दुपारी धामणदेवी तर उद्या केतकी बीळ, कर्मवणे भागात शोध घेण्याचे नियोजन केल्याची माहिती धुळे येथील त्यांच्या नातेवाईकांनी दिली. दरम्यान, अश्विनी अहिरे यांनी बुधवारी सकाळी आत्महत्येपूर्वी त्यांच्या मामाला फोन करून मी आता आत्महत्या करणार आहे, असे सांगितले होते. त्यावर त्यांच्या मामांनी विचारणा केली असता त्या काही न बोलता फोन कट केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. नवदांपत्याचे लग्न अडीच महिन्यांपूर्वी धुळे येथे मोठ्या उत्साहात पार पडले होते. विवाहानंतर त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर, गणपतीपुळे येथे देवदर्शन करून आनंदाचे क्षण सोशल मीडियावर शेअर केले होते. अशा आनंदमय सुरुवातीनंतर अचानक अशा प्रकारची टोकाची भूमिका का घेतली, हे कोडे दोन्ही कुटुंबीयांसमोर आहे. या घटनेच्या धक्क्याने निलेश यांच्या आत्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचे दुःखद निधन झाले. त्यामुळे अहिरे कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. The newlyweds jumped into the river