बाळासाहेब लबडे लिखित “द लास्ट फोकटेल” वाचकांच्या चर्चेत
गुहागर, ता. 28 : सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांची कादंबरी “द लास्ट फोल्कटेल” (इंग्रजी अनुवाद – डॉ. विलास साळुंखे, प्रकाशन – ऑथर्स प्रेस, नवी दिल्ली, २०२५) ही केवळ महाराष्ट्रात नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेत आली आहे. या कादंबरीची प्रस्तावना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची आहे. “The Last Folktale” novel by Labade
यूकेतील ऑस्टिन मॅकॉली पब्लिकेशनच्या संपादकीय मंडळाने या कादंबरीचे कौतुक करत ती “थ्रिलिंग, गुंतवून ठेवणारी आणि वैश्विक वाचकांना आकर्षित करणारी” असल्याचे नमूद केले. “पात्रांची उभारणी, कथानकातील पुराणकथांचा वापर व गहन मानवी भावविश्व” या कादंबरीची ताकद असल्याचे या पत्रात स्पष्ट केले आहे. नेदरलँड्समधील कला समीक्षक भास्कर हांडे यांनी या कादंबरीला “मराठी संस्कृतीच्या बोली-गायन-नाट्यपरंपरेशी संवाद साधणारी क्लासिक कादंबरी” असे संबोधले. “The Last Folktale” novel by Labade

न्यूयॉर्कमधील कवयित्री नयना निगळे यांच्या मते, “द लास्ट फोल्कटेल ही उत्तर-आधुनिक तंत्र व स्थानिक लोकपरंपरेचे अद्वितीय मिश्रण आहे. ती सहज वाचकांसाठी आव्हानात्मक ठरू शकते, परंतु मराठी कादंबरीच्या व्याख्येला नवी दिशा देते.”केरळमधील समीक्षक सिजो जोसेफ चेनलील यांनी या कादंबरीतील “जादुई वास्तववाद, अस्तित्ववादी प्रश्न व विस्कळीत मानवी नात्यांचे चित्रण” अधोरेखित करत तिला “२१व्या शतकातील साहित्यिक चमत्कार” असे गौरवले. “The Last Folktale” novel by Labade
डॉ. बाळासाहेब लबडे यांनी यापूर्वी कविता, कादंबरी व समीक्षेच्या क्षेत्रात १८ पुस्तके प्रकाशित केली असून त्यांना कुसुमाग्रज राज्य काव्य पुरस्कार, नारायण सुर्वे काव्य पुरस्कार, पद्मश्री नामदेव धसाळ काव्य प्रतिभा पुरस्कार यांसह अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. “द लास्ट फोल्कटेल” या कादंबरीमुळे मराठी साहित्यातील लोककथांना जागतिक संदर्भ मिळाला असून, मराठी साहित्य जागतिक वाचकांच्या चर्चेत आणणारे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. “The Last Folktale” novel by Labade