मासूतील घटना, उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होते तिन मजूर
गुहागर, ता. 06 : तालुक्यातील आबलोली मासू मार्गावर चिरे वाहून नेणारा टेम्पो डोंगर उतारावर कोसळला. या अपघातात चिरे अंगावर पडून तीन मजूर जखमी झाले आहेत. त्यापैकी दिनेश बनवासी या मजुराचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित दोन मजुरांवर उपचार सुरु आहेत. शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत आणि आबलोली शाखा प्रमुख संदिप निमुणकर अपघात झाल्यावर तातडीने पोचून मदतकार्य केले. या अपघाताची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत झाली नव्हती.


स्थानिक ग्रामस्थांकडून समजलेल्या माहितीनुसार मासु परिसरातून चिरे भरलेला टेम्पो (क्र.MH04 CU 5847) आबलोलीच्या दिशेने येत होता. चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो रस्त्यासोडून डोंगर उतारावर पलटी झाला. डोंगर उतारावर टेम्पो ७ ते ८ फूट खोल घसरत गेला. यावेळी टेम्पोत दिनेश बनवासी (वय 20), अस्लम खान (26), राधेश्याम बील (वय 22) हे चिरेखाणीवरील ३ मजूर होते. अपघातात टेम्पोतील चिरे या तिनही मजुरांच्या अंगावर पडले. चालक किरकोळ जखमी झाला. हा अपघात रविवारी (ता. 06) दुपारी घडला.
या अपघाताची माहिती रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तीकडून आबलोलीत रहाणारे शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत यांना कळली. तातडीने सचिन बाईत आणि आबलोलीचे शाखाप्रमुख संदिप निमुणकर घटनास्थळी पोचले. अपघाताची स्थिती पाहून एका जेसीबीला बोलावून घेतले. 7 ते 8 फूट खोल डोंगर उतारावर जखमी अवस्थेत पडलेल्या मजुरांना सचिन बाईत आणि संदीप निमुणकर यांनी चालकाच्या मदतीने रस्त्यावर आणले. लगेचच आबलोलीतून रुग्णवाहिका बोलावली. दिनेश बनवासी, अस्लम खान आणि राधेश्याम बील या तिघांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून दिले. जेसीबी आल्यावर डोंगर उतारावर अडकलेला अपघातग्रस्त टेम्पोदेखील बाईत आणि निमुणकरांनी रस्त्यावर आणला.
दरम्यान रविवारी (ता. 06)रात्री आठच्या दरम्यान जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेला दिनेश बनवासी (वय 20) या चिरेखाण मजुराचा मृत्यू झाला आहे. अस्लम खान (26), राधेश्याम बील (वय 22) यांच्यापैकी एकाला गंभीर दुखापत झाली आहे. तर दुसरा किरकोळ जखमी आहे. गंभीर दुखापत झालेल्या मजुराची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा रुग्णालयातील एका व्यक्तीने सांगितले आहे. सदर अपघाताची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत झाली नव्हती.