बांधकामावर पाणीच नसल्याचे उघड, ठेकेदाराच्या कामावर गुहागरकर नाराज
गुहागर, ता. 10 : शृंगारतळी येथे तीन पदरीकरणाचे कामापूर्वी दोन्ही बाजुने गटारे बांधण्याचे काम मनिषा कन्स्ट्रक्शन करत आहे. मात्र या बांधकामावर पाणीच मारले जात नाही. परिणामी आज बाजारपेठतील गटाराची भिंत एका ठिकाणी कोसळली आहे. त्यामुळे शृंगारतळीतील ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी कामाच्या दर्जाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या शृंगारतळीमध्ये सध्या दुतर्फा गटार बांधण्याचे जवळपास पूर्ण होत आले आहे. आता रस्त्याच्या कामाला मनिषा कन्स्ट्रक्शनने सुरवात केली आहे. मात्र बांधलेल्या गटारांवर आवश्यक प्रमाणात पाणी मारण्याचे काम ठेकेदाराच्या माणसांनी केलेच नाही. याबाबत अनेकवेळा ठेकेदाराच्या माणसांना सरपंच संजय पवार यांच्यासह स्थानिक व्यापाऱ्यांनी, ग्रामस्थांनी सूचना केल्या. मात्र त्या सुचनांकडे दुर्लक्षच झाले. परिणामी बुधवारी (ता. 10) बाजारपेठेतील बांधलेल्या गटाराची भिंत एकेठिकाणी ठासळली आहे. याबाबत बोलताना पाटपन्हाळेचे सरपंच संजय पवार म्हणाले की, आमचाही मुळ व्यवसाय बांधकाम असल्याने नव्या सिमेंट कामाला 21 दिवस पाणी द्यावे लागते हे आम्हाला माहिती आहे. सर्वसामान्य ग्रामस्थांना देखील हे कळते. मात्र ठेकेदाराच्या अभियंत्यांना सांगूनही ही गोष्ट कळत नाही ही दुर्दैवाची बाब आहे.
तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या शृंगारतळीमध्ये व्यापारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, आणि ठेकेदार यांची बैठक झाली. या बैठकीत फेब्रुवारी अखेर बाजारपेठेतील काम पूर्ण करु असे आश्र्वासन मनिषा कन्स्ट्रक्शनने दिले होते. श्रृंगारतळीवासीयांनी सहकार्याची भूमिका घेत ठेकेदाराला काम करण्यास पूर्ण सहकार्य केले. मात्र ठेकेदाराने या सहकार्याचा फायदा उचलत बाजारपेठेतील संपूर्ण रस्ता उखडून टाकला. गेले महिनाभर बाजारपेठेत येणारे ग्राहक, व्यापारी, वहातुकदार यांना मनस्ताप सहन करावा लागला. आता गटाराची भिंत ढासळल्याने येथील ग्रामस्थांनी ठेकेदाराच्या कामाबाबत प्रश्र्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मनिषा कन्स्ट्रक्शनने राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला श्रृंगारतळीत गुहागर दरम्यान सुरवात केली. तेव्हापासून या कामावर गुहागरवासीय वेगवेगळ्या कारणांनी नाराज आहेत. ठेकेदार आणि त्याचे अभियंते, कर्मचारी यांनी मोडकाआगर धरणात दुर्गंधीयुक्त मातीसह प्लास्टीक व अन्य कचरा टाकून पाणी दुषित केले. रस्ता रुंदिकरणात खोदून काढलेली झाडांची मुळे, फांद्या, सोटमुळे आदी कचराही धरणात टाकला. हा विषय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोचला. त्यांच्या सूचनांनाही ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखवली.
रस्ता रुंदीकरणाचे काम करताना ठेकेदाराने पर्यायी मार्गावरील वहातूक सुरळीत ठेवणे बंधनकारक आहे. मात्र मोडकाआगरच्या धरणातून अमर्याद उपसा करुनही पर्यायी मार्गावर योग्य पध्दतीने पाणी मारले जात नाही. त्यामुळे उसळणाऱ्या धुळीचा त्रास दुचाकीचालकांना सहन करावा लागत आहे. अनेकवेळा दुचाकी चालकांसह लोकप्रतिनिधींनी ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना या त्रासाची जाणिव करुन दिली. मात्र त्याकडेही ठेकेदाराने दुर्लक्ष केले.
झोंबडीत मनिषा कन्स्ट्रक्शनचा प्रकल्प आहे. तीन पदरीकरणाच्या कामाला लागणारे तयार क्रॉक्रिट येथे काही टनात तयार करण्यात येते. त्यासाठी आवश्यक सिमेंट, खडी, वाळू आदी साहित्याचा साठा येथे करुन ठेवण्यात आला आहे. दररोज तयार झालेले क्रॉक्रिट, मोठी खडी आदी साहित्याची वहातूक अनेक अवजड वाहनांद्वारे गिमवी, झोंबडी रस्त्यावरुन होते. त्यामुळे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. मात्र दररोज स्वत:च्या वाहनांच्या शेकडो फेऱ्या होणाऱ्या रस्त्याची डागडूजी करण्याचे औचित्यही ठेकेदाराने दाखविलेले नाही.
त्यामुळे गुहागर चिपळूण तीनपदरीकरणाचे काम गुहागरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत आहे.