वेळणेश्र्वर मधील घटना, वडिल रागावल्याने संपवले जीवन
गुहागर, ता. 29 : शाळेत जाण्यावरुन वडिल रागावले म्हणून वेळणेश्र्वर भाटीतील एका विद्यार्थ्यांने आपले जीवन संपवले. ही घटना मंगळवारी (ता. 28) रात्री घडली. बुधवारी (ता. 29) हेदवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर या मुलाचा मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला. Student suicide
गुहागर पोलीस ठाण्यात विकास भाग्या पालशेतकर (वय 48), रा. वेळणेश्र्वर भाटी यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांचा मुलगा पारस विकास पालशेतकर (वय 15) सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल वेळणेश्र्वर मध्ये इयत्ता 9 वी ला शिकत होता. तो शाळेत जाण्यास तयार नव्हता. मी शाळेत जाणार नाही. मला शिकायचे नाही असे त्याचे म्हणणे होते. या मुद्द्यावर विकास पालशेतकर मंगळवारी (ता. 28) सायंकाळी पारसला रागावले. त्याचा राग येवून पारस घराच्या माळावरील एका खोलीत जावून बसला. रुसलेला पारस थोड्यावेळाने खाली येईल, असे समजून घराच्यांनी दुर्लक्ष केले. बराच वेळ झाला तरी पारस माळ्यावरुन खाली आला नाही, म्हणून समजूत काढून त्याला घरात बोलवण्यासाठी वडिल विकास माळ्यावरील खोलीत गेले. तेथील दृष्य पाहून विकासला धक्का बसला. पारसने खोलीतील लोखंडी अँगलला नायलॉनची दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. वडिलांनी तातडीने दोरीच्या विळख्यांमधून पारसला सोडवले. त्याला उपचाकरीता हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून गेले. मात्र तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी पारसला मृत असल्याचे घोषित केले. आत्महत्येची घटना असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राने या घटनेची माहिती गुहागर पोलीस ठाण्यात दिली. पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांनी सहकाऱ्यांसह हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून पंचनामा आदी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. बुधवारी सकाळी शवविच्छेदन करुन पारसचा मृतदेह पालशेतकर कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. Student suicide

