जिल्हाधिकाऱ्यांनी दिले वाहतूक व्यवस्थेत बदलाचे आदेश
गुहागर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाशिष्ठी नदी व शास्त्री नदीवरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट 10, 11, 12 सप्टेंबर, 2020 या दिवशी दुपारी 12.00 ते 04.00 या वेळेत करण्यात येणार आहे. त्यामुळे या पुलांवरील वहातुक तात्पुरती बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आदेश जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दिले आहेत.
मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणातील वाशिष्ठी नदीवरच्या पुलाचे आयुष्यमान संपल्याचे पत्र ब्रिटीश सरकारने चार वर्षांपूर्वीच दिले होते. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात या नदीवर नवा पुल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे सदर पुलाकडे शासनाने दुर्लक्ष केले. मात्र नव्या पुलाचे बांधकामही तांत्रिक कारणांमुळे अर्धवट अवस्थेत आहे. संगमेश्र्वर तालुक्यातील शास्त्री नदीवरील पुलाचीही हीच कथा आहे. तेथेही चौपदरीकरणातील पुल तांत्रिक कारणांमुळे रखडला आहे.
चिपळूण
चिपळूण शहरातून जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन पुल आहेत. त्यापैकी वाशिष्ठी नदीवरील पुल क्र. 1 (कि.मी.211/770) येथील सर्वप्रकारची वाहतूक दिनांक 10 सप्टेंबर, 2020 रोजी दुपारी 12.00 ते 04.00 या वेळेत बंद रहाणार आहे.पुल क्र. 2 (कि.मी.211/960) वरील सर्वप्रकारची वाहतूक दिनांक 11 सप्टेंबर, 2020 रोजी दुपारी 12.00 ते 04.00 या वेळेत बंद करण्यात येत आहे.
हे दोन्ही पुल जवळजवळ असल्याने 10 व 11 सप्टेंबर रोजी दुपारी 12.00 ते 04.00 या वेळेत हा मार्ग पूर्णपणे बंद राहील. त्यामुळे या वेळेत ज्यांना कळंबस्ते, वालोपे, खेडकडे जायचे असेल त्यांना चिपळुण शहरातील बाजारपुल, फरशी तिठा किंवा बायपास मार्गाचा वापर करावा लागेल.
संगमेश्र्वर
संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीवरील पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट दिनांक 12 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 12.00 ते 4.00 या वेळेत होणार आहे. त्यामुळे 12 सप्टेंबरला दुपारी 12.00 ते 4.00 या वेळेत चिपळुणकडून रत्नागिरी, संगमेश्र्वरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनांना तुरळ फाट्यावरुन कडवईच्या दिशेने जावून अंत्रवली फाट्यावरुन कसबा या मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
सदर बदलांचे आदेश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले असून त्यांची कार्यवाही पोलीस यंत्रणेच्या वाहतुक शाखा व राष्ट्रीय महामार्ग विभाग, रत्नागिरी यांच्यामार्फत केली जाणार आहे.
सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व पुलांच्या बांधकामांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा महाडमधील इमारत कोसळल्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिटचा विषय ऐरणीवर आला आहे. या दोन पुलांची स्ट्रक्चरल ऑडिट होतील. त्यानंतर त्याचा अहवाल येईपर्यंत हे पुल वहातुकीसाठी वापरलेही जातील. पण या ठिकाणी अर्धवट उभे असलेले नवे पुल कधी मार्गी लागतील हा खरा प्रश्र्न आहे.