शृंगारतळी, रानवी, गुहागर मार्गावर मोकाट गुरांचा हैदोस
गुहागर, ता. 10 : गुहागर शहरासह शृंगारतळी, रानवी मार्गावरील मोकाट गुरांनी ठिय्या मांडलेला दिसून येत आहे. जणू काही त्यांचे येथील बसण्याचे हक्काचे ठिकाण असून सर्व एकत्र गुरे येथे ठाण मांडून असतात. मात्र, याचा त्रास वाहनचालकांना होत असून हा भाग अपघात प्रवण क्षेत्र बनले आहे. काही दिवसांपूर्वी अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. Stray cattle cause trouble for drivers

गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या शृंगारतळी बाजारपेठेत मोकाट गुरांचा प्रश्न उभा ठाकला आहे. स्थानिक प्रशासनानेही यावर अनेक उपाययोजना राबविल्या. मात्र, ते अयशस्वी ठरलेल्या आहेत. कोंडवाडे, गुरे मालकांना दंड असे उपायही करुन पाहिले मात्र, दिवसेंदिवस मोकाट गुरांचा उपद्रव सुरुच आहे. नोटीसा बजावूनही गुरे मालक दाद देत नाहीत. शृंगारतळी-गुहागर हा नेहमीचा वर्दळीचा मार्ग आहे. भरधाव वाहने ये-जा करत असतात. अशावेळी दाटीवाटीने रस्त्यावर ठाण मांडून बसलेली मोकाट गुरे दिसून येतात. कधी कधी गुरांच्या पायाचे खूर, किंवा इतर भागाला वाहनाच्या धडकेने जखमही झालेली दिसून येते. गुरांना वाचविण्यात नादात तात्काळ ब्रेक दाबल्याने कधी कधी वाहनेही आदळतात किंवा पडतात. Stray cattle cause trouble for drivers

शृंगारतळी आठवडा बाजारात तर मोकाट गुरांचा मोठा उपद्रव सुरु असतो. गुरे मालक आपल्या गुरांना घेऊन जात नाहीत. वास्तविक त्यांनी याची खबरदारी घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र, तसे होत नसल्याने स्थानिक प्रशासनही फारसे कारवाई करताना दिसून येत नाहीत. दिवसेंदिवस हा मोकाट गुरांचा उपद्रव पाटपन्हाळे व शृंगारतळीवासियांसाठी डोकेदुखी बनलेला दिसून येत आहे. गुहागर शहरात मोकाट गुरांचा बागायतदारानाही मोठा त्रास सहन करावा लागतं आहे. रानवी येथे रात्रीच्या वेळी मोठया प्रमाणात गुरांचा कळप रस्त्याच्या मध्यभागी बसलेला असल्याने वाहने चालवणे कठीण होऊन जात आहे. या गुरांच्या मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होतं आहे. Stray cattle cause trouble for drivers