ठाकूर दाम्पत्य : वेळणेश्र्वरच्या यशस्वी कार्यक्रमाचे सुत्रधार
वेळणेश्र्वरमधील पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या सभेसाठी निवडलेले ठिकाण, तेथील सर्व व्यवस्था, शिवसैनिकांची उपस्थिती या सर्व गोष्टींचे आरेखन, नियोजन यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्रा ठाकूर, माजी सरपंच नवनीत ठाकूर यांनी अपार कष्ट घेतले. अर्थात जिल्हा परिषदचे अध्यक्ष विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख सचिन बाईत या दोघांची साथ त्यांना मिळाली. त्यामुळेच ही सभा भव्य दिव्य अशी ठरली. या कार्यक्रमातील पडद्यामागचे हे कलाकार दाम्पत्य मात्र अनेकांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहण्यात धन्य झाले होते.


वेळणेश्र्वरमध्ये पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजनासाठी येणार हे निश्चित झाल्यावर अवघे चार दिवस नियोजनासाठी हातात होते. तीन मंत्री येणार असल्याने स्वाभाविकच जिल्हा स्तरावरील प्रमुख शासकीय अधिकारी, पोलीस, असा मोठा लवाजमा वेळणेश्र्वर मध्ये येणार होता. अशा वेळी वेळणेश्र्वर मधील दाटीवाटीने वसलेल्या खारवीवाडीत भूमिपूजन आणि अन्य ठिकाणी सभा घेणे व्यावहारिक नव्हते. म्हणून खारवीवाडीतील समुद्रकिनाऱ्यावरच दोन्ही कार्यक्रम एकत्र घेण्याचे ठरले. परंतु धोका होता भरतीच्या पाण्याचा. नेत्याची वेळ चुकली तरी भरती वेळ चुकणार नव्हती. त्यामुळे सभा स्थानाच्या बाजुने भरतीचे पाणी सभेत घुसणार नाही याची दक्षता घ्यायला हवी होती. कार्यक्रम संपल्यावर मंडप, प्रकाश आदी व्यवस्था तातडीने दूर कराव्या लागणार होत्या. गावाच्या एका बाजुला असलेल्या सभास्थानी कार्यक्रमाला येणाऱ्या जनतेला किमान 10 मिनिटांची पायपीट करावी लागणार होती. अशा परिस्थितीतही समोर संख्या दिसणे आवश्यक होते. शिवाय 15 ते 20 वाहने कार्यक्रम स्थळापर्यंत येणे आणि पुन्हा जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता हवा. एवढ्या गाड्या वळतील एवढी जागा हवी. अशा प्राथमिक गोष्टींची तयारीच आव्हानात्मक होती.


याशिवाय ठाकरे कुटुंबातील सदस्य येणार असल्याने भव्य सजावट, सायंकाळी कार्यक्रम असल्याने प्रकाश व्यवस्था, जाहीर कार्यक्रमासाठी उत्तम ध्वनी व्यवस्था, मंत्री, आमदार, अधिकारी यांची व्यासपीठावरील आसन व्यवस्था. जाहीर सभा समुद्रावर असल्याने शिवसैनिकांसाठी, पत्रकारांसाठी खुर्च्यांची व्यवस्था. ही कामे देखील करावी लागणार होती. अवघ्या चार दिवसांच्या कालावधीत या सर्व गोष्टी जमवून आणण्याचे शिवधनुष्य नवनीत व सौ. नेत्रा ठाकूर यांनी पेलले.


मंडप, सजावट, ध्वनी यासाठी तालुक्याबाहेरील व्यावसायिकांना आणावे लागले. व्यासपीठाच्या मागे भलामोठा एलईडी स्क्रीन लावण्यात आला होता. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण या स्क्रीनवरुन दाखवले जाते होते. ड्रोनद्वारे कार्यक्रमाचे छायाचित्रीकरण करण्यात आले. या नव्या तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी प्रयत्न केले. तीन दिवस विक्रांत जाधव आणि सचिन बाईत वेळणेश्र्वरला तयारीसाठी येत होते.
ठाकूर दांपत्याने वेळणेश्र्वर जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातून माणसे आणण्याची रचना केली. वेळणेश्र्वर गावातून 700 – 800 माणसे, तर गटातून 700-800 माणसे अशी 1500 माणसे केवळ वेळणेश्र्वर गटातून कार्यक्रमाला उपस्थित होती. भरतीचे पाणी सभास्थानी येवून नये म्हणून तीन दिवस आहोटीच्या वेळी जेसीबीने सभेला संरक्षण देणारी छोटी वाळुची भिंत घालण्यात आली. तसेच भरतीचे पाणी बाजुने जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.


नवनीत आणि सौ. नेत्रा ठाकूर दोघेही तीन दिवस कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र मेहनत करत होते. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी मात्र पुलंच्या कथाकथनामधील नारायणासारखी त्यांची स्थिती होती. त्या दिवशी आदित्य ठाकरे, अनील परब आदी मंडळी गुहागरमध्येच मुक्कामाला होती. त्यामुळे आपल्या पक्षाची वरिष्ठ मंडळी दोन मिनिटे घरी यावीत. त्यांचे सहकुटुंब स्वागत करण्याची त्यांची इच्छा होती. पण या इच्छा कार्यक्रमांच्या गर्दीत मनातच विरुन गेल्या. वेळ कमी असल्याने व्यासपीठावरुन बोलण्याची संधी देखील हुकली. मात्र या सर्व गोष्टी मनापासून स्विकारुन कार्यक्रम झाल्यावर पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना, पत्रकारांना आपण सुखरुप पोचलात ना अशी विचारणा करायला हे दांपत्य विसरले नाही. भव्य दिव्य कार्यक्रमातील पडद्यामागचे हे कलाकार अनेकांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहण्यात धन्य झाले होते.

