त्रांगड्यात अडकले ग्रामीण मुलांचे शिक्षण, विद्यार्थी व शाळेचे नाते धोक्यात
शिक्षण (Education) विभागाने कोरोना संक्रमणाची काळजी घेत शाळा (School) सुरु केल्या. शाळांनी वेळेचे नियोजन केले. परंतु या वेळा आणि एस.टी. (MSRTC) च्या फेऱ्या यांची वेळ जमत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी (Student) आजही शिक्षणापासून वंचित राहात आहेत. या त्रांगड्यात सध्या ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षण अडकले आहे.
शाळांच्या बदललेल्या वेळा
दिवाळीनंतर माध्यमिक, मग प्राथमिक, कनिष्ठ महाविद्यालये, वरिष्ठ महाविद्यालये अशी शिक्षणाची दालने हळुहळु सुरु होत आहेत. राज्यस्तरावरुन कोरोनानंतरच्या काळात शाळेसाठी मार्गदर्शक सूचना आल्या. त्यामध्ये प्रत्येक वर्गात 50 % मुलांना बोलावण्याची व अर्ध वेळ शाळा भरविण्याची सूचना होती. त्याप्रमाणे शाळांनी नियोजन केले. त्यामध्ये प्रत्येक वर्गातील निम्म्या मुलांनाच चार तासिकांसाठी शाळेत बोलावले जाते. हा कालावधी केवळ तीन तासांचा असतो. त्यामुळे कोरोनापूर्वी दोन सत्रात भरणाऱ्या शाळा देखील एका सत्रातच होत आहेत.
वेळेवर एस.टी. नाही
शाळेने बदललेल्या या वेळापत्रकामुळे ग्रामीण भागातून एस.टी.ने येणाऱ्या मुलांची पंचाईत झाली आहे. शाळा भरण्याच्या वेळी गावातून शाळेत पोचण्यासाठी एस.टी. नाही. तर शाळा सुटल्यावर गावात परतण्यासाठी एस.टी. नाही. म्हणून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आजही नियमितपणे शाळेत जातच नाहीत.
विद्यार्थी पास घटले
५० टक्के उपस्थितीमुळे एका विद्यार्थ्याला आठवड्यातील केवळ तीन दिवस शाळेत जावे लागते. म्हणजे महिनाभरातील सुमारे 12 दिवसांची शाळा होते. त्यातही सुट्टी असली, स्वत:हून सुट्टी घेतली की तेही दिवस कमी होतात. मग 10 दिवसांसाठी 30 दिवसांचा पास का काढायचा हा व्यावहारीक प्रश्र्न निर्माण होतो. महिनाभरातील शाळेच्या 10 दिवसांपैकी एक दोन दिवस गावातील, वाडीतील वाहनचालक विद्यार्थ्यांना सोडतातच. उरलेल्या वेळी खिशात १० रुपये ठेवले की मिळेल त्या वाहनाने शाळेपर्यंत जाता येते. या परिस्थितीमुळे एस.टी.ला विद्यार्थी पासांमधुन मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे.
अशा त्रांगड्यात सध्या ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षण (Education)अडकले आहे. मार्च 2020 मध्ये सलग दोन महिने लॉकडाऊन आणि त्यानंतरही पाच महिने शाळाच झालेली नसल्याने विद्यार्थ्यांची शाळेची सवय सुटली आहे. एक आड एक दिवस शाळा असल्याने विद्यार्थी भावनिकदृष्ट्या शाळेशी जोडला गेलेला नाही. म्हणूनच शाळा सुरु होऊनही ग्रामीण भागातील विद्यार्थी (Student) आज अभ्यासाविनाच आहे. आजच्या परिस्थितीत हे चालायचेच असे म्हटले तरी यातून गंभीर प्रश्र्न निर्माण होणार आहेत. शाळेमध्ये अभ्यासासोबत समाजात कसे जगायचे याचेही अप्रत्यक्ष शिक्षण विद्यार्थ्याला मिळत असते. आज मोबाईल मुळे मुले एकलकोंडी होत आहेत. आता शाळा नसल्याने सामुहिक जीवनापासूनही ती दूर जात आहेत. याला जबाबदार कोण हा प्रश्र्न उपस्थित करण्याऐवजी शाळा (School), पालक आणि एस.टी. (MSRTC) व्यवस्थापनाने प्रत्येक विद्यार्थी शाळेत पोचेल हा आग्रह धरुन नियोजन करण्याची गरज आहे.
फेब्रुवारी 2020 मध्ये विद्यार्थी पासांतून एस.टी.ला सुमारे 40 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. फेब्रुवारी 2021 मध्ये केवळ 10 हजाराचे उत्पन्न आहे. शाळांनी फेब्रुवारी 2020 मधील वेळापत्रकाची रचना केली तर आम्ही 9 गाड्यांच्या 142 फेऱ्या पूर्ववत सुरु करु शकतो. त्यातून प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेपर्यंत नेणे आणि शाळेतून सोडणे सहज शक्य होईल.
वैभव कांबळे, आगार व्यवस्थापक, गुहागर डेपो.