गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे एमएसएस ॲण्ड सन्स कंपनीचे मुख्य संचालक मोहन संसारे यांना सकाळ माध्यम समूहातर्फे SONS OF SOIL ( उत्कृष्ट भूमीपुत्र) या पुरस्काराने आज (दि.18 जुन) कोल्हापूरमध्ये गौरविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने मोहन संसारे यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला आढावा. Sons of Soil Mohan Sansare

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे एमएसएस ॲण्ड सन्स कंपनीने गेल्या 20 वर्षात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात पाय रोवले आहेत. याची सुरवात मोहन सदाशिव संसारे यांनी 1991 मध्ये एका रिटेल व्यवसायातून सुरु केली. 64 वर्षीय उद्योजक मोहन संसारे यांच्या व्यक्तीमत्त्वाला सामाजिक आणि अध्यात्मिक कामाची जोड आहे. सर्वसामान्य जनतेबद्दल कळकळीची आस्था असलेले मोहनभाई पेशाने व्यापारी, मनाने वारकरी आणि संस्कारने संघ स्वयंसेवक आहेत. त्यांच्या कार्य, कर्तृत्वाचा प्रवास गुहागर तालुक्यातील, शृंगारतळीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जानवळ्यातून सुरु झाला हे विशेष. छोट्या खेड्यातून मोठी भरारी घेणाऱ्या मोहन संसारे यांच्या कार्य, कर्तृत्वाचा चढता आलेख. Sons of Soil Mohan Sansare

1991 मध्ये मोहन संसारे यांनी 15 ऑगस्ट 1991 ला एम.एस.एस. या नावाने 100 चौरसफुटाच्या जागेत व्यवसायाला सुरवात केली. त्याचवर्षी वडिलोपार्जित व्यवसायाची वाटणी झाली होती. या व्यवसायाला जोड म्हणून मोहनभाईनी वृत्तपत्र विक्रेत्याचेही काम केले. मंगलोरी कौलांचा व्यापार सुरु केला. मोहनभाईंना या व्यवसायांमध्ये कणखर साथ दिली ती पत्नी सौ. मंजिरी यांनी. कौलांच्या व्यापारामुळे गुहागर तालुक्यातील अनेक दुकानदार, वहातुकदार यांच्याशी संपर्क आला. या संपर्काच्या बळावर तालुक्यातील विविध दुकानदारांना माल देण्यास त्यांनी सुरवात केली. गोड बोलणे, सचोटीने आर्थिक व्यवहार, व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेणे यामुळे मोहन संसारेचा हा व्यवसायही भरभराटीला आला. बिस्कीटे, खाद्यतेल, आदी उत्पादक कंपन्यांनी मोहन संसारेंकडे तालुक्याची एजन्सी दिली. वाढलेल्या व्यापामुळे घरातील जागा कमी पडू लागल्याने मोहन संसारे यांनी शृंगारतळी बाजारपेठेत एम.एस.एस. कॉम्प्लेक्स ही 20 हजार चौरस फुटांची इमारत उभी केली. 14 डिसेंबर 2011 मध्ये एमएसएस ॲण्ड सन्स् या रिटेल, होलसेलबरोबरच अनेक नामवंत कंपन्यांचे वितरक म्हणून व्यापाराला सुरवात झाली. याचवेळी मोहनभाईंचा मुलगा सुदिप संसारेही व्यवसायात मदतीला आला. बापलेकांनी आज एजन्सी व्यवसायाचे मोठे जाळे रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग या तीन जिल्ह्यात उभे केले आहे. आज पार्ले बिस्कीट, सोसायटी चहा, राम बंधु मसाले, जिओ टेलिकॉम, डायमंड वेफर्स, सम्राट ऑईल, पितांबरी उत्पादने, घोडावत ग्रुपची आयुरस्टार उत्पादने, ससा डिटर्जंट, आदी नामवंत उत्पादक कंपन्याचे अधिकृत वितरक आणि तीन जिल्ह्याचे सुपर स्टॉकिस्ट म्हणून मोहन संसारे काम पाहतात. यासाठी शृंगारतळीबरोबरच तीन जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून चिपळूणमध्ये गोडावून उभे केले. याशिवाय पर्यावरणपुरक कागदाच्या पत्रावळी, पेले आदी उत्पादने एमएसएसमध्ये सुरु झाली. विशेष म्हणजे या सर्व व्यावसायिक प्रवासात त्यांनी कर्मचारी म्हणून स्थानिकांनाच रोजगार दिला. आज ३५ स्थानिक कर्मचारी, कामगार त्यांच्याकडे काम करत आहेत. 10 वर्षांहून अधिक काळ शृंगारतळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. Sons of Soil Mohan Sansare

मोहनभाई सामाजिक उपक्रमातही सहभागी असतात. लहानपणापासून संघ स्वयंसेवक असलेल्या मोहनभाईंकडे आज गुहागर, चिपळूण, खेड दापोली व मंडणगड अशा ५ शासकीय तालुक्यांच्या उत्तर रत्नागिरी जिल्हयाचे मा. जिल्हा संघचालक अशी जबाबदारी आहे. शृंगारतळीला लोकनेते माजी आमदार कै. डॉ. तात्या नातू यांनी उभ्या केलेल्या पाटपन्हाळे एज्यूकेशन सोसायटीतही मोहनभाई आहेतच. शृंगारतळीतील निळकंठेश्र्वर मंदिराच्या स्थापनेपासून देवस्थानचे ते विश्र्वस्त आहे. सप्ताह, महाशिवरात्र उत्सव, हनुमान जयंती, त्रिपुरारी पौर्णिमा, मंदिराचा वर्धापन दिन, श्रावणात शिवलिलामृत पारायण अशा धार्मिक कार्यक्रम सर्वांना सोबत घेवून यशस्वी करतात. बाजारपेठेत नवरात्र मंडळाच्या स्थापनेपासून ते क्रियाशील आहेत. आपल्या व्यवसायातील कामगारांच्या सुखदु:खात सहभागी होतात. याशिवाय एम.एस.एस. द्वारे दरवर्षी या कामगारांची सहल आयोजीत केली जाते. कामगारांचे वाढदिवस साजरे केले जातात. त्यांच्या माध्यमातून गावात वाडीत होणाऱ्या उपक्रम, कार्यक्रमांना मदत केली जाते. यामुळे कामगारांची प्रतिष्ठा वाढते. त्यांना समाजात सन्मान मिळतो. Sons of Soil Mohan Sansare
शृंगारतळीमधील मित्र डॉ. भाई जावकर यांच्यामुळे भाईंनी गळ्यात माळ घातली. वर्षातून एकदा डॉ. जावकर यांच्या घरी होणाऱ्या नामजप सप्ताहात दरवर्षी ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या किर्तनाचे आयोजन मोहनभाईंचा करीत. वारकरी संप्रदायाच्या प्रसारासाठी मोहन संसारे यांनी काही वारकऱ्यांसोबत वारी आपल्या गावी हा उपक्रमही सुरु केला. यामध्ये वारकरी एका गावी जाऊन सायंकाळी गावकऱ्यांबरोबर भोजन करतात. त्यानंतर किर्तन होते. गेली २५ वर्ष मोहनभाई आषाढी वारी करतात त्या कोकण दिंडी समाज संस्थेचा मठ पंढरपुरात असून ते या मठाचे विश्र्वस्त आहेत. Sons of Soil Mohan Sansare

या प्रवासात पत्नी सौ. मंजिरी संसारे यांचेसह मुलगा सुदिप संसारे, सुन सौ. देवकी संसारे यांचीही साथ त्यांना मिळत आहे. त्यामुळेच हा व्यावसायिक, आध्यामिक, सामाजिक अशा त्रिवेळी यात्रेचा प्रवास दीर्घ पल्ल्यावरही मोठ्या दिमाखाने सुरू आहे. Sons of Soil Mohan Sansare
