इम्रान घारेंच्या प्रयत्नांना यश, भाजपच्या हातातून ग्रामपंचायत निसटली
गुहागर, ता. 11 : तालुक्यातील निगुंडळ ग्रामपंचायत आमच्यात ताब्यात अशी बतावणी भाजप कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध करताना इम्रान घारेंच्या प्रयत्नांना यश आले. निगुंडळ ग्रामपंचायतीवर भगवा फडकला आहे. प्रभाग १ मधून निवडून आलेल्या दिप्ती गिजे यांची सरपंचपदी आणि सुभाष गावडे यांनी उपसरपंच पदी निवड झाली आहे.
निगुंडळ ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग २ आणि ३ ची निवडणूक बिनविरोध झाली. प्रभाग २ मधून सुवर्णा हरिचंद्र गावडे आणि मनिषा मिलिंद पवार व प्रभाग ३ मधून अंकुश तुकाराम पिलवलकर आणि शालिनी आत्माराम जांगळे हे सदस्य ग्रामस्थांनी एकमुखाने निवडले.
प्रभाग १ मध्ये ग्रामपंचायत सदस्यांबाबत एकमत न झाल्याने निवडणूक झाली. ही निवडणूक इतकी अटीतटीची झाली की भाजप कार्यकर्ते मयुरेश अशोक भागवत केवळ २ मतांनी विजयी झाले. तर नुकतेच उपसरपंच झालेले सुभाष गावडे अवघ्या १ मताने निवडून आले. सरपंच पदी विराजमान झालेल्या दिप्ती गिजे सहज निवडून आल्या. मतमोजणीच्या दिवशी या तिघांचा विजय सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी गुहागरमध्ये साजरा केला.
ग्रामपंचायत कोणाची असे दावे प्रतिदावे सुरु झाले तेव्हा भाजपने निगुंडळ आमचीच असा दावा केला. परंतू हा दावा सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीपर्यंत टिकला नाही. येथील आमदार भास्कर जाधव यांचे खंदे समर्थक इम्रान घारे यांनी भाजपच्या दाव्यांचे खंडन केले नाही. मात्र निगुंडळ ग्रामपंचायतीवर भगवा फडकण्याची व्यवस्था केली. कुठेही खिंडार पडणार नाही अशी भक्कम तटबंदी इम्रान घारेंनी केली. त्यामुळे सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. शिवसेनेचा भगवा निगुंडळ ग्रामपंचायतीवर फडकविण्यात इम्रान घारेंना यश आले. सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीनंतर इम्रान घारेंनी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांना फेटे बांधले. सर्वांचा सन्मान केला. बिनविरोध निवड केल्याबद्दल आभार मानले.