गुहागरातील शिवजन्मोत्सव सोहळ्याला दिमाखात प्रारंभ
गुहागर, ता. 18 : स्वराज्याचा साक्षीदार असलेल्या गोपाळगडावर शनिवारी (ता. 19) शिवजयंतीचा सोहळा (Shivjayanti in Guhagar) होणार आहे. या सोहळ्याचा प्रारंभ आज शिवपादुकांच्या आगमनाने झाला. चिखली येथून दुचाकी व चारचाकी रॅलीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत या शिवपादुका निळकंठेश्र्वर मंदिर येथे आणण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा ठेवा जतन करण्यासाठी प्रयत्नरत असलेले शिवतेज फाउंडेशन, गुहागर व तमाम शिवभक्त गुहागरवासीय यांच्यावतीने शनिवारी (दि. 19 फेब्रुवारी) शिवजयंतीनिमित्त शिवपादुकांच्या पालखी मिरवणूक, पादुकांचे किल्ले गोपाळगडावर स्वागत आणि ध्वजारोहण अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी (ता. 19 फेब्रुवारी) सकाळी 8 वाजता निळकंठेश्र्वर मंदिरात शिवपादुकांचे पूजन केले जाणार आहे. सकाळी 8.30 वा. पालखी मिरवणुकीला निळकंठेश्र्वर मंदिरातून सुरवात होईल. सकाळी 10 वा. फटाक्यांच्या आतषबाजीत, दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या साथीने शिवपादुकांचे गुहागरकडे प्रस्थान होईल. सकाळी 10.30 वा. गुहागरमधील शिवाजी चौकात पालखी मिरवणुक आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पालखी श्री व्याडेश्र्वर मंदिरात येईल. त्यानंतर वरचापाट येथील दुर्गादेवी मंदिरात शिवपादुका आणल्या जातील. येथे श्री दुर्गादेवी देवस्थानच्या वतीने वेदमंत्रांच्या उद्घोषात शिवपादुकांची पुजा करण्यात येणार आहे. (Shivjayanti in Guhagar)
शनिवारी दुपारी 12 वा. पालखी किल्ले गोपाळगडाकडे प्रस्थान करणार आहे. दुपारी 1 वाजता अंजनवेल येथील गोपाळगडावर शिवपादुका पालखीचे आगमन होईल. त्यानंतर पादुकांचे पूजन होऊन गडावर भगवा ध्वज फडकविण्यात येणार आहे. या शिव जन्मोत्सव सोहळ्यासाठी तालुक्यातील असंख्य शिवभक्त व गुहागरवासीय उपस्थित रहाणार आहेत. (Shivjayanti in Guhagar)
गोपाळगडाचा इतिहास
गोपाळगड किल्ला विजापूरच्या आदिलशहाने १६ व्या शतकात बांधला. इ.स. १६६० मध्ये शिवछत्रपतींनी तो जिंकला. शिवाजी महाराजांच्या मृत्यनंतर मोगल आक्रमणाच्या धामधुमीचा फायदा घेऊन सिद्दी खैरातखानने हा गड इ.स. १६९९ मध्ये जिंकला. या काळात सिद्दीने किल्ल्याचा विस्तार करुन त्यात सुधारणा केल्या. त्यानंतर इ.स. १७४४ मध्ये तुळाजी आंग्रेनी हा गड पुन्हा जिंकला. त्यांनीही या गडाचा विस्तार व विकास केला. इ.स. १८१८ रोजी कर्नल केनडी याने किल्ल्याचा ताबा घेतला व नंतर स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत तो ब्रिटीशांच्याच ताब्यात होता.
या किल्ल्याला गोपाळगड नाव कसे पडले?
तुळाजी आंग्रे हे कृष्णभक्त होते. त्यांनी जेव्हा हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा याचे नाव गोपाळगड करण्यात आले.
