हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन ; अनेक ठिकाणी शिवपादुकांचे पूजन
गुहागर, ता. 19 : जय भवानी जय शिवाजी.., छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा घोषणांनी शिवजयंती निमित्ताने मिरवणुक काढण्यात आली. शिव पादुकांच्या रथाचे शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात स्वागत आणि पूजन करण्यात आले. या रथाचे शृंगारतळी व गुहागर शहरातील मुस्लीम समाजाने जोरदार स्वागत केले. तसेच मिरवणुकीत सहभागी होऊन हिंदू – मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले. Shiv Jayanti in Gopalgad

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा ठेवा जतन करणाऱ्या शिवतेज फाउंडेशन, गुहागर व तमाम शिवभक्त गुहागरवासीय यांच्यावतीने शिवजयंतीनिमित्त भव्य शिव पादुकांच्या रथाची शृंगारतळी ते अंजनवेल येथील किल्ले गोपाळगडावर रॅली काढण्यात आली. सकाळी शृंगारतळी येथील श्री नीळकंटेश्वर मंदिरातून मोठ्या दिमाखात असंख नागरिकांच्या उपस्थितीत छ. शिवाजी महाराजांच्या पादुकांची पालखीतून रॅली काढण्यात आली. शृंगारतळी बाजारपेठेतून गगनभेदी घोषणा देत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. या रॅली मध्ये दुचाकी, चारचाकी वाहने मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाली होती. यावेळी मुस्लीम बांधवांनी शिवरायांच्या पादुकांना पुष्पहार अर्पण करून रॅली मध्ये सहभागी झाले. त्यांनी शिव प्रेमींना पाणी बॉटल, बिस्किटे, थंड पेये याचे वाटप केले. त्यानंतर गुहागरकडे शिवरथ मार्गस्थ झाला. Shiv Jayanti in Gopalgad

शहरातील शिवाजी चौक येथील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शिवपालखीचे स्वागत करून पूजन केले. यावेळी महिलांनी शिवाजी महाराजांचे गाणे म्हटले. तेथून श्री देव व्याडेश्वर मंदिरात पालखी शंभू महादेवाच्या भेटीला नेण्यात आली. नंतर वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिरात पादुकांचे ब्रह्मवृंदाच्या मंत्रोघोषात पूजन व जगदंबेची भेट झाली. मार्गावर ठीकठिकाणी पादुकांचे महिलांनी औक्षण केले. गुहागर वरचापाट मोहल्ल्यात पालखीचे पुष्प उडवून जंगी स्वागत करत मिरवणुकीतील नागरिकांना पाणी, खाद्यपदार्थाचे वाटप केले. Shiv Jayanti in Gopalgad

दुपारी 3 वा. शिवरथ अंजनवेल येथे दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांनी जोरदारपणे स्वागत केले. यावेळी गोपाळगड किल्ला ज्या जागेत आहे त्या जागेचे मालक युनूस मणियार यांच्या घरी जाऊन अंजनवेल ग्रामस्थ व शिवतेज फाऊंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला. या सत्काराने कुटुंबीय भारावून गेले. तसेच येथील ग्रामस्थांनी बनवलेली किल्ल्याची प्रतिकृती आकर्षणात्मक ठरली. बाजार पुल येथून अंजनवेल, वेलदुर गावातील ग्रामस्थांनी रथ किल्ले गोपाळगडाकडे मोठ्या उत्साहाने घेऊन गेले. गडावर जाऊन पादुकांचे पूजन करून भगवा ध्वज फडकविण्यात आला. यानिमित्त गडावर लहान विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनावरील गाण्यावर नृत्य सादर केली. या शिव जन्मोत्सव सोहळ्यात तालुक्यातील असंख्य शिवभक्त व गुहागरवासीय सहभागी झाले होते. Shiv Jayanti in Gopalgad

