गुहागर, ता. 16 : तालुक्यातील वरवेली गावची ग्रामदेवता श्री हसलाई देवी व काळकाई देवी या देवतांचा शिमगा उत्सव आज पासून म्हणजे बुधवार (दि. १६ मार्च) पासून विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. Commencement of Shimgotsava of Varveli Shri Haslai Devi


नवसाला पावणारी देवी म्हणून सर्वत्र श्री हसलाईदेवीची ख्याती आहे. फाक पंचमीच्या दिवशी देवीच्या मंदिरा जवळ लहान होळी पेटविली जाते. त्यानंतर खऱ्या अर्थाने शिमगा उत्सवाला गावात सुरुवात होते. प्रत्येक वाडीमध्ये ग्रामस्थ लहान मोठ्या होळ्या पेटवितात. दुसऱ्या होळीच्या दिवशी वरवेली गावचे नमन मंडळी श्री हसलाई देवीचा आशीर्वाद घेऊन गाव भोवणीसाठी बाहेर पडतात. ते नमन मंडळी निवोशी, पालशेत, असगोली, गुहागर अशी गावे करून परत पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आपल्या गावी परततात. त्यानंतर प्रमुख मान असलेल्या ठिकाणी ते नमन करतात. त्याच दिवशी तेलीवाडी व मराठवाडी यांच्या वतीने मराठवाडीतील सुबोध विचारे यांच्या घराजवळ काकड होळी सजविण्यात येते. सुवासिनी यांच्या हस्ते काकड होळीचे पूजन झाल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात काकड होळीची मिरवणूक काढण्यात येते. मराठवाडीत काकड होळीचे दिमाखात स्वागत व पूजन करण्यात येते. त्यानंतर ती पेटविण्यात येते. Commencement of Shimgotsava of Varveli Shri Haslai Devi


गुरुवार दि. १७ मार्च रोजी पौर्णिमेच्या दिवशी श्री हसलाईदेवी मंदिरांमध्ये प्रमुख नागरिकांच्या उपस्थितीत देवीला रुपे लावले जातात. यावेळी पालखीमध्ये देवतांची रूपे लावून त्यांची स्थापना करून पालखी सजवली जाते. या पालखीमध्ये खेम बावा, श्री हसलाई देवी, कालकाई देवी, मानाई देवी, वाघजाई देवी, चंडकाईदेवी अशा सहा देवतांची स्थापना करून पालखी सजविली जाते. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत देवीच्या सहान या ठिकाणी आणली जाते. त्याठिकाणी राणे महापुरुष गादीवर पालखी विश्रांतीसाठी विराजमान केली जाते. तिथून पालखी देवीचे पहिले मानकरी असणारे राजेश शांताराम विचारे व देवीचे दुसरे मानकरी सुरेन्द्र नारायण विचारे यांच्या निवासस्थानी पालखीचे पूजन करण्यात येते. पालखी पुन्हा सहानेवर विराजमान करण्यात आल्यानंतर देवीची माड होळी आणण्यासाठी वरवेली गावातील सर्व ग्रामस्थ व मुंबईकर पालशेत येथे जाऊन माड तोडून त्याची होळी वाजत गाजत व नाचवत आणतात. अनेक ठिकाणी माड होळीचे पूजन व नवस बोलले व फेडले जातात. देवीच्या सहाने जवळ माड होळी उभी करतात. Commencement of Shimgotsava of Varveli Shri Haslai Devi
शुक्रवारी दि.१८ मार्च रोजी धुलिवंदनाच्या दिवशी देवीच्या होमाची व माड होळीची विधिवत पूजन पाच मानकरी यांच्या हस्ते करण्यात येते. देवीचा जयघोष करत गावकरी होमाभोवती पाच प्रदक्षिणा घालून नंतर सूर्यकांत किर्वे या मानकरी यांच्या हस्ते होम प्रज्वलित करण्यात येतो. यावेळी देवीची पालखी होमाच्या भोवती प्रदक्षिणा घालत व नाचवली जाते. धुळीवंदनाच्या दिवशी दुपारनंतर सहान भरणे या कार्यक्रमात संकासुर नृत्य सादर केले जाते. यामध्ये संकासुर देवीचे रूप असते अशी आख्यायिका आहे. यावेळी नवस बोलले व फेडले जातात. Commencement of Shimgotsava of Varveli Shri Haslai Devi
शनिवार दि. १९ मार्च रोजी सायंकाळी ३ वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी रात्री भजन कार्यक्रम तसेच राजहंस नमन मंडळ वरवेली रांजणवाडी गट क्रमांक १ यांचा बहुरंगी नमन आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून देवीची पालखी गावातील भाविकांच्या घर भेटीला जाणार आहे. या घर भेटीमध्ये घरोघरी श्री हसलाई देवीच्या पालखीचे स्वागत उत्साहात ग्रामस्थ करतात. रात्री देवीचा समा उत्सव साजरा केला जातो. गेली शेकडो वर्षाची परंपरा आजही तेवढ्याच उत्साहाने आनंदाने पार पाडली जाते. Commencement of Shimgotsava of Varveli Shri Haslai Devi

