सावरकर राष्ट्रीय स्मारक; २२ मे रोजी फडणवीस यांच्या हस्ते वितरण
रत्नागिरी, ता. 17 : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने देण्यात येणारा उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था पुरस्कार 2021 हा रत्नागिरी मधील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स, रत्नागिरी Ratnadurg Mountaineers या संस्थेला जाहीर झाला. 22 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर येथे या पुरस्काराचे वितरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. (Shikhar Savarkar Award to Ratnadurg Mountaineers)

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी शौर्य, विज्ञान आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार तसेच शिखर सावरकर पुरस्कार दिले जातात. सन 2021 मधील शिखर सावरकर पुरस्कार कोरोनामुळे प्रलंबित होते. या पुरस्कारांचे वितरण 22 मे रोजी होणार आहे.

Shikhar Savarkar Award to Ratnadurg Mountaineers
सन 2021 मधील शिखर सावरकर जीवनगौरव पुरस्कार एव्हरेस्ट वीर पद्मश्री सोनम वांग्याल, शिखर सावरकर युवा पुरस्कार सुशांत अणवेकर, मुंबई यांना तर शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था पुरस्कार रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स, रत्नागिरी यांना प्रदान करण्यात येईल. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने देण्यात येणारा शौर्य पुरस्कार (एक लाख एक हजार रुपये आणि मानचिन्ह, मानपत्र) कीर्तिचक्र विजेते नायब सुभेदार संतोष राळे यांना तर विज्ञान पुरस्कार (एकावन्न हजार रुपये आणि मानचिन्ह, मानपत्र) डी. आर. डी. ओ. चे संचालक अतुल राणे आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार (पंचवीस हजार रुपये आणि मानचिन्ह- मानपत्र) बडोदरा येथील वीर सावरकर स्मृती केंद्र यांना प्रदान करण्यात येणार आहे.

22 मे 2022 रोजी सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, वीर सावरकर मार्ग, छत्रपति शिवाजी महाराज उद्यान, दादर (प.) मुंबई २८ येथे हा समारंभ होणार आहे. यावेळी स्मारकाने तयार केलेला समाजक्रांतिकारक सावरकर या लघुपटाचे लोकार्पणही करण्यात येणार आहे. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) आणि आमदार अतुल भातखळकर हे उपस्थित राहाणार आहेत. अशी माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्षा मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि सहकार्यवाह स्वप्निल सावरकर यांनी दिली.
लघुपटातून रत्नागिरी पर्वाला उजाळा
स्वा. वि. दा. सावरकर यांनी रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध झाल्यानंतर तेथे समाजसुधारणेचे एक अतिशय मोलाचे आणि सर्व देशाला ही अनुसरण करण्यास वाटावे, असे समाजक्रांतिचे दिशादर्शक काम केले होते. या समाजक्रांतिकारक सावरकरांना आणि त्यांच्या कार्याला लोकांसमोर मांडणारा लघुपट स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने तयार केला आहे. त्या लघुपटाचे या समारंभात लोकार्पण करण्यात येणार आहे. हिंदु धर्मातील त्या सात बेड्यांना तोडून आणि ज्यांना मंदिर प्रवेशही निषिद्ध केला, अशा समाजातील आपल्या बंधूंना पतितपावन मंदिरात प्रवेश देणे, सहभोजनातून आपण सारे हिंदु बंधू बंधू आहोत, ही जाणीव करून देत सावरकरांनी साधलेल्या त्यावेळच्या समाजक्रांतिला नव्या पिढीपुढे मांडणारा हा लघुपट आहे.
