डॉ अतुल ढगे, मनोविकारतज्ञ
24 मे म्हणजे जागतिक स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) दिवस या निमित्ताने या रोगाविषयी माहिती देणारा लेख
मनिष म्हणजे नेहमीच वर्गातील प्रथम क्रमांक मिळवणारा मुलगा होता. बारावीमध्ये चांगले मार्क घेऊन त्याने चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला होता. कॉलेजमध्ये दुसर्या वर्षापासून त्याच्या वागण्यात खूप बदल दिसून येत होता. सर्वात मिळुन मिसळून राहणारा मनिष आता एकटाच राहायला लागला होता. नेहमीच टापटीप राहणाऱ्या मनिषचे लक्ष स्वतःकडे आहे असे वाटत नव्हते. मध्येच चिडचिड करून संशय असल्यासारखे वागायचा व बोलायला लागला होता व कधी कधी एकटाच पुटपुटत होता व स्वतःशीच हसायला लागला होता. या सर्व प्रकारात नक्कीच त्याच्या अभ्यासावर पण परिणाम झाला होता.
फॅमिली डॉक्टरांच्या सांगण्यावरून मनोविकारतज्ञाचा सल्ला घेतला. त्याला तपासून त्याला स्किझोफ्रेनिया झाल्याचे निदान करून त्याला औषधोपचार चालू केल्यानंतर तो हळू हळू बरा होऊन मूळ पदावर यायला लागला आहे.
स्किझोफ्रेनिया ( छिन्नमनस्कता) हा आजार खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतो . जगातील १ % लोक आयुष्यात कधी ना कधी या रोगाने ग्रस्त होतात. अशा रुग्णांना भूतबाधा, करणी, लागीर, भानामती झाली असे समजून मंत्रीकांकडे/ गुरुवांकडे/ बाबाकडे घेऊन जाण्याचे प्रमाण खूप आहे . तेथे त्यांच्यावर अमानुष उपचार केले जातात . मारहाण करून, बांधून ठेऊन हा आजार कमी होण्याऐवजी वाढतच जातो व त्यात बराच वेळ जातो व मग त्याचमुळे रुग्णाला आयुष्यभर औषधोपचार करण्याची गरज पडते . यामुळे लवकरात लवकर बरे होण्यासाठी व आजारातून पूर्णपणे बरे होण्यासाठी उपाय म्हणजे लक्षणांची सुरुवात होताच मनोविकारतज्ञांची भेट घेणे व सांगितल्याप्रमाणे उपचार पूर्ण करणे होय . आणि त्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते या आजाराबाबत माहिती मिळवणे ज्यामध्ये त्याची लक्षणे काय, तो कसा ओळखावा, त्याची कारणे काय तसेच त्यासाठी काय उपचार असतात हे माहित करून घेणे.
कारणे (Causes of schizophrenia)
१ मेंदूमधील रासायनिक घटकांचा समतोल बिघडणे (केमिकल लोचा ): यामध्ये मुख्यत डोपामीन नावच्या केमिकल चे प्रमाण किंवा परिणाम वाढतो .
2. अनुवांशिकता: अनेक रुग्णामध्ये अनुवांशिकपणे झालेला आढळतो. आई वडील किंवा जवळच्या नातेवाईकांना आजार असल्यास हा आजार होण्याची शक्यता जास्त असते .
3. बालपण/बाल अवस्थेत होणारा मानसिक आघात: बालपण कसे होते , कडक शिस्तीचे पालक, पालकातील भांडणे, एका पालकाचा मृत्यू किंवा घटस्पोट अशा परिस्थितील बालपण असेल तर. लैंगिक शोषण किंवा मानसिक छळ झाला असेल तर.
4. मानसिक ताण तणाव: सामजिक किंवा आर्थिक किंवा कुठल्याही कारणामुळे होणारा ताण तणावामुळे किंव्हा एखादी खूप आनंदाची घटना घडल्यासही ते काहीजणांना सहन न झाल्यामुळे असा आजार होऊ शकतो. –डॉ अतुल ढगे.
स्किझोफ्रेनियाचे विविध प्रकार व त्याची लक्षणे
(Types and symptoms of schizophrenia)
प्रकार 1- पॅरानॉईड स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) Paranoid schizophrenia
१. कानात आवाजाचे भास होणे – कोणतरी आपल्याशी किंवा आपल्याबद्धल बोलत आहे असे वाटणे. बहुधा ते वाईटच बोलतात किंवा आपल्याला शिवीगाळ करतात असे आवाज असतात. त्यामुळे रुग्ण चिडचिडपणा करतो किंवा आक्रमक होतो. काही वेळा हे आवाज त्यांना एखादी गोष्ट करण्यासाठी सांगतात त्यामुळे रुग्ण त्या पद्धतीने वागतात जसे कि तोडफोड करणे, एखाद्याला मारणे. काही वेळा हे आवाज त्यांना आत्महत्या करायला सांगतात व त्या भरात रुग्ण आत्महत्या करतो.
२. मनात संशय येणे – कोणीतरी आपल्याविरुद्ध आहे, कोणीतरी आपल्याला किंवा आपल्या घरच्यांना मारेल असा संशय वाटणे. सर्व लोक माझ्याबद्धल बोलतात असे वाटणे . माझ्या घरामध्ये कॅमेरा लावलेला आहे, माझ्या मागे पोलीस लावलेले आहेत. कोणीतरी आपल्यावर करणी केली आहे, काळी जादू केली आहे मूठमाती केली आहे असा संशय येतो किंवा काही वेळा आपल्या पत्नी किंवा पतीचे बाहेर संबंध आहेत असे संशय घेतो.-डॉ अतुल ढगे
प्रकार 2 – डिसऑर्गनाईज्ड स्किझोफ्रेनिया ( छिन्नमनस्कता) Disorganized schizophrenia
१) असंबद्ध बडबड करणे. रुग्ण काहीही बडबड करतो. त्याचा वास्तवाशी संबंध तुटल्यामुळे तो काहीही विचित्र बोलतो. एक प्रश्न विचारला असता दुसरेच काहीतरी उत्तर देतो. किंवा सर्व प्रश्नाला तेच तेच उत्तर देतो.एकच शब्द / वाक्य सारखा सारखा बोलतो. आपण जे विचारतो तेच तेच वाक्य परत बोलतो. नवीन नवीन शब्द बोलतो किंवा वेगळ्या भाषेत बोल्यासारखे बोलतो.
२) असंबंध वागणे / विचित्र वागणे : रुग्ण स्वतःची काळजी घेत नाहीत. आंघोळ करत नाहीत, कपडे बदलत नाहीत दाढी किंवा केस कापत नाहीत. कचरा गोळा करतात. कपडे घालत नाहीत, काढून टाकतात. लोकांत कसे बोलावे कसे वागावे हे त्यांना कळत नाही. एकटे असताना किंवा स्वताशी बडबड करतात, हातवारे किंवा विचित्र हावभाव करत राहतात. ( रस्त्यावरती अशा अवस्थेत फिरणारे बरेचशे लोक गरीब किंवा भिकारी नसून ते या आजाराचे रुग्ण असतात.)
प्रकार 3- कॅटाटोनिक स्किझोफ्रेनिया (गलितगात्र छिन्नमनस्कता) Catatonic schizophrenia
1. शारीरिक हालचाल खूप कमी होते किंवा खूप प्रमाणात वाढते. ज्यावेळी हालचाल कमी होते त्यावेळी रुग्ण स्तब्ध बसून राहतो काही हालचाल करत नाही. एखाद्या स्थितीत बराच वेळ बसून राहतो किंवा पुतळ्यासारखा थांबून राहतो . ज्यावेळी हालचाल वाढते त्यावेळी विनाकारण इकडे तिकडे पळत राहतो किंवा कृती करत राहतो.
2. रुग्ण काहीच बोलत नाही. अगदीच शांत राहतो .
3. एकाच कृती वारंवार करतो. विशिष्ठ लकब, विशिष्ट पद्धतीची हालचाल किंवा कृती विनाकारण व सतत करत राहतो. चेहऱ्यावर विशिष्ट हावभाव करतो.
4. समोरचा जे बोलेल तेच वारंवार बोलतो किंवा कृती करेल तीच कृती वारंवार करतो.
उपचार (Treatment of schizophrenia)
१ . औषधोपचार: विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज अनेक चांगली औषधे उपलब्ध आहेत . लवकरात लवकर, वेळीच व सल्ल्याप्रमाणे उपचार पूर्ण केल्यास रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात किंवा त्यांचा आजार पूर्णपणे काबूत राहू शकतो .
२ . विद्युत लहरी उपचार (शॉक / ECT) : तीव्र प्रकारच्या आजारामध्ये जेंव्हा पेशंट मारामारी करत असेल , स्वतःला किंवा दुसर्याला अपाय करत असेल, आत्महत्या करायचा प्रयत्न करत असेल किंवा औषधोपचाराने बरा होत नसल्यास विद्युत लहरी उपचार केला जातो . ही एक अतिशय सुरक्षित व प्रभावी उपचार पद्धती आहे.
३ . मानसोपचार / समुपदेशन: औषधोपचाराने रुग्ण बरा झाल्यानंतर रुग्ण पूर्ववत होण्यासाठी मानसोपचार व समुपदेशन केले जाते . कुटुंबाचे समुपदेशन करणेही तेवढेच महत्वाचे असते . तसेच रुग्ण पूर्ववत व्हावा व त्याने चांगले आयुष्य जगावे म्हणून त्याचे व्यावसायिक पुनर्वसन करणे आवश्यक असते .- डॉ अतुल ढगे.
स्किझोफ्रेनिया व गैरसमज (Schizophrenia and misunderstandings)
एका सर्वे मध्ये असे निदर्शनात आले आहे की ९०% लोकांना स्किझोफ्रेनिया बद्धल चुकीची माहिती आहे किंवा धारणा आहेत किंवा गैरसमज आहेत. त्यांना सत्य माहिती नसून अजूनही त्यांचा अनेक गैरसमजावर ठाम विश्वास आहे. हे गैरसमज दूर होणे खूप महत्वाचे आहे. काय आहेत ते गैरसमज चला पाहुयात.
1. स्किझोफ्रेनिया म्हणजे स्प्लिट पर्सनॅलिटी / दुभंगलेले व्यक्तिमत्व होय.
तथ्य :हा एक खूप मोठा गैरसमज आहे. ‘ स्किझो ‘ या शब्दाचा शब्दशः अर्थ जरी स्प्लिट माईंड असला तरी त्यांचे व्यक्तिमत्व दुभंगलेले नसते. त्या व्यक्तीत दोन व्यक्तिमत्व नसतात. खरे म्हणजे त्या व्यक्ती अस्तित्वापासून दुभंगलेले असतात. बऱ्याच वेळी त्यांना अस्तित्वात नसलेल्या गोष्टी खऱ्या वाटतात. काहीवेळा वास्तव व अवास्तव यातला फरक त्यांना करता येत नाही एवढेच! ज्या आजारामध्ये पर्सनॅलिटी स्प्लिट होते तो स्किझोफ्रेनिया नसून त्यास ‘ डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर ’ किंवा ‘ मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर ’ म्हणतात. ( भुलभुलैय्या व त्या मधली अवनी व मंजुलिका आठवतेय ?)
2. स्किझोफ्रेनिया झालेला रुग्ण कधीहि पूर्णपणे बरा होऊ शकत नाही.
तथ्य : हाही एक खूप मोठा गैरसमज आहे. यामध्ये एक त्रितीयांश हा नियम आहे. एक त्रितीयांश म्हणजे ३३% रुग्ण योग्य औषधोपचार पूर्ण केल्यानंतर पूर्णपणे बरे होतात व नंतर त्यांना कधीही त्रास होत नाही. दुसरे एक त्रितीयांश म्हणजे ३३% रुग्णांना मात्र शक्यतो कायमस्वरूपी उपचार घ्यावे लागतात परंतु औषधोपचार चालू असताना मात्र त्यांना कधीही त्रास न होता तुमच्या आमच्या सारखे नॉर्मल आयुष्य जगू शकतात. मात्र उर्वरित ३३% किंवा एक त्रितीयांश रुग्णाला मात्र औषध-गोळ्या चालू असताना देखील मध्ये मध्ये त्रास होऊ शकतो व ऍडमिट करण्याची गरज भासू शकते. वेळीच, लवकरात-लवकर योग्य व पूर्ण उपचाराने व मानसिक तणाव कमी करता आला तर मात्र दुसऱ्या व तिसऱ्या त्रितीयांश रुग्णाचे प्रमाण कमी करता येऊ शकेल.
3. स्किझोफ्रेनियाचे रुग्ण नॉर्मल जीवन जगू शकत नाहीत व कुटुंबियांना आयुष्यभर त्यांची काळजी घ्यावी लागते.
तथ्य : वेळीच, लवकरात लवकर उपचार केल्यास व पूर्ण व व्यवस्थित उपचार झाल्यास बरेच रुग्ण पूर्णपणे नॉर्मल होऊ शकतात व स्वतः किंवा व्यवस्थित आधाराने एक आनंदी, अर्थपूर्ण व सामाजिक आयुष्य जगू शकतात. व्यवस्थित काम व अर्थार्जन करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घेऊ शकतात.
4. स्किझोफ्रेनियाचे रुग्ण धोकादायक असतात, त्यांचा स्वतःवर कंट्रोल नसतो.
तथ्य : सगळेच रुग्ण धोकादायक असतात व मारामारी करतात हा खूप मोठा गैरसमज आहे. वस्तुस्थिती मध्ये खूपच कमी रुग्ण असे असतात जे मारामारी करतात किंवा त्यांचा स्वतःवर कंट्रोल नसतो. तेही जेंव्हा रुग्णांना बरेच दिवस उपचार न मिळाल्यास किंवा उपचार बंद केल्यास तो आजार तीव्र स्वरूपाचा झाल्यासच रुग्ण तसे वागतात.
5. स्किझोफ्रेनिया झाल्यास रुग्णास ऍडमिट करावे लागते व शॉक द्यावा लागतो.
तथ्य : ९०% रुग्ण फक्त औषधगोळ्याने किंवा इंजेकशन ने व्यवस्थित होतात. फक्त उर्वरित १० % रुग्णांना ऍडमिट करण्याची गरज भासू शकते. ऍडमिट केल्यास देखील देखरेखीखाली औषधगोळ्या देऊनही जर कधी काही रुग्णात फरक नाही पडला व रुग्ण मारामारी करत असेल , स्वतःला धोका करत असेल किंवा स्वतःकडे दुर्लक्ष करत असेल तरच शॉक ट्रेंटमेंटची गरज पडू शकते. म्हणजे एकदंरीतच १०० पैकी फक्त २-३ रुग्णास शॉक ट्रीटमेंट द्यावी लागू शकते. – डॉ अतुल ढगे
6. स्किझोफ्रेनीया या आजारावरती उपचार उपलब्ध नाहीत.
तथ्य : जुन्या काळामध्ये स्किझोफ्रेनिया वरती पुरेशे उपचार उपलब्ध नव्हते. त्यावेळी साखळदंडाने बांधून ठेवणे, खोली मध्ये कोंडून ठेवणे किंवा झोपवून ठेवणे अशा पद्धतीने त्यांच्यावर उपचार केला जायचा. परंतु आता विज्ञानाने खूप प्रगती केली असून त्यामुळे खूप चांगले औषधोपचार आज उपलब्ध आहेत.
7. स्किझोफ्रेनिया म्हणजे करणी किंवा भानामती किंवा काली जादू केल्यामुळे होतो, त्यामुळे भगत किंवा बाबा बुवा कडे घेऊन जावे लागते.
तथ्य : जसे मधुमेह (डायबेटीस ) हा आजार शरीरातील इन्सुलिन नावाचे केमिकल कमी झाल्यामुळे होतो तसेच स्किझोफ्रेनिया हा आजार मेंदूतील डोपामिन केमिकल वाढल्यामुळे होतो. करणी, भानामती असा प्रकार अस्तित्वातच नाही. आणि त्यामुळेच गुरव, बाबा, बुवा कडे जाऊन हा आजार कमी होण्याच्या ऐवजी वेळेवर औषधोपचार न मिळाल्याने आजार वाढतो व कायम स्वरूपाचाही होऊ शकतो. काही वेळा रुग्णात फरक पडलेला जाणवतो कारण रुग्ण तेथील अघोरीपद्धतीला घाबरतो मात्र तेही तात्पुरतेच, तो आजार मात्र कमी झालेला नसतो. थोड्या दिवसात मात्र परत तो पहिल्यासारखा वागायला लागतो. तरीही ज्या लोकांचा या गोष्टीवर विश्वास असल्यास दवा सोबत दुवा करायला हरकत नाही. त्यासोबत औषधोपचार मात्र व्यवस्थित करणे गरजेचे असते. कारण दुआ काम करेल नाही करेल माहित नाही परंतु औषधे मात्र नक्कीच काम करतील.
8. स्किझोफ्रेनिया फक्त गरीब लोकांनाच होतो.
तथ्य : हा आजार कोणालाही होऊ शकतो. मग तो गरीब असो वा श्रीमंत, स्त्री असो वा पुरुष, कुठल्याही देशाचा असो किंवा कुठल्याही वंशाचा. इतर शारीरिक आजाराप्रमाणेच स्किझोफ्रेनिया कोणालाही होऊ शकतो.
9. स्किझोफ्रेनिया असणाऱ्या रुग्णाचे शारीरिक आरोग्य इतर लोकांप्रमाणेच चांगले असते.
तथ्य : हा गैरसमज असून कायमस्वरूपी स्किझोफ्रेनियाचा रुग्णाच्या शारीरिक आरोग्यावर हळू हळू परंतु दूरगामी परिणाम होत असतात. मानसिक अवस्थेमुळे शरीरावर होणारा परिणाम, त्यांचे स्वतःकडे लक्ष देण्याची कमी झालेली क्षमता किंवा स्वतःकडे होणारे दुर्लक्ष व त्यांची बदलेली जीवनशैली यामुळे त्यांचे आयुष्य २० वर्षांनी कमी होऊ शकते असे आढळून आले आहे. त्यामुळे अशा कायमस्वरूपी आजार असलेल्या रुग्णाची कुटुंबीयांनी व्यवस्थित काळजी घेणे गरजेचे असते.
10. या आजाराची औषधे खाल्यास रुग्ण ‘झोंबी’ होतात व नेहमी गुंगीत राहतात.
तथ्य : स्किझोफ्रेनिया किंबहुना सर्वच मानसिक आजारांच्या औषधांच्या बाबतीत सर्वसामान्यांमध्ये खूप गैरसमज आहेत त्यातला सर्वात मोठा गैरसमज म्हणजे ही औषधे म्हणजे फक्त झोपेच्या गोळ्या असतात आणि ते दिल्यास पेशंट नेहमी झोपून राहतो. १९४० च्या दरम्यान किंवा त्याअगोदर रुग्णास झोपेची औषधे दिली जायची किंवा त्यावेळी सुरुवातीची जी औषधे होती त्याचा झोप लागणे हा मोठा साईड इफेक्ट होता परंतु जसा जसा नवीन औषधांचा शोध लागत गेला तशी झोप लागणे हा साईड इफेक्ट नसलेली नवीन औषधें बाजारात आली. आज झोपेचा साईड इफेक्ट नसलेली किंवा इतर साईड इफेक्ट कमीत कमी असलेली चांगल्या दर्जाची औषधे उपलब्ध आहेत. काही वेळा मात्र जाणून बुजून सुरुवातीला रुग्णास झोपेची औषधे द्यावी लागू शकतात किंवा एवढे दिवस झोप न झालेले रुग्ण औषधे काम करू लागताच रुग्णाचे शरीर अपुरी झोप पूर्ण करायचा प्रयत्न केल्यामुळे सुरुवातीचे काही दिवस जास्त झोपू शकतात.
11. स्किझोफ्रेनियाच्या रुग्णातील वागणूकीतील बदल म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वातील दुर्गुण असून ती व्यक्ती जाणून बुजून तशी वागते.
तथ्य : स्किझोफ्रेनिया एक आजार आहे. ज्यात मेंदूमधील केमिकल मध्ये बदल झालेले असतात. त्या केमिकल बदलामुळे रुग्ण तसा वागतो. तो रुग्ण हा जाणूनबुजून तसा वागत नाही. ते केमिकल बदल व त्यामुळे होणारा वागणुकीत बदल हे रुग्णाच्या हातात नसून तो आजाराचा भाग असतो हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे. किंबहुना आपण आजारी आहोत याची पुसटशी जाणीव ही त्यांना नसते. आपल्याला आजार आहे असे मान्य करायलाही तो रुग्ण तयार नसतो.
12. स्किझोफ्रेनियाचे रुग्ण आयुष्यात काहीही करू शकत नाहीत.
तथ्य : व्यवस्थित औषधोपचार, समुपदेशन व व्यवसायोपचार या सर्वांच्या मदतीने रुग्ण पूर्णपणे व्यवस्थित होऊन त्याचे पुनर्वसन करता येऊ शकते.
13. स्किझोफ्रेनियाची लक्षणे म्हणजे फक्त भास होणे व संशय येणे किंवा वेड्यासारखे वागणे होय.
तथ्य : हि लक्षणे जरी प्रामुख्याने दिसून येणारी लक्षणे असली तरी सुरुवातीच्या काळामध्ये त्याचे विचार, भावना, निर्णयक्षमता, हुशारी यावर परिणाम दिसून यायला सुरुवात होते ज्यावरून काहीतरी बिघडते आहे हे लक्षात येऊ शकते व ही स्किझोफ्रेनियाच्या आजाराची सुरुवात आहे असे डॉक्टरांना जाणवू शकते. नंतर मात्र उपचार न भेटल्यास या सगळ्या गोष्टीवरती खूप मोठा परिणाम होऊन त्याच्या वागण्यात खूप मोठा बदल होऊन ती व्यक्ती मग वेड्यासारखी वागू शकते. प्रत्येकच स्किझोफ्रेनियाचा रुग्ण वेड्यासारखा वागेल असेही नसते.
स्किझोफ्रेनियाचे रूग्ण हे पण तुमच्या आमच्या सारखीच माणसे आहेत. त्यांना सन्मानाची वागणूक द्या. फक्त मानसिक आजार आहे म्हणून त्यांना ‘मेंटल ‘ म्हणून संबोधू नका, हिणवू नका. मनोरुग्णाला त्याच्या गरजेनुसार उपचार व आधार द्या. त्यांचे कोणीही मानसिक , शारीरिक , लैंगिक शोषण करणार नाही याची काळजी घ्या. समाजात सन्मानाने जगण्यासाठी त्यांना योग्य व्यवसायोपचार मार्गदर्शन व आधार देऊन स्वताची ओळख निर्माण करायला मदत करा, स्वतच्या पायावर उभे राहायला व समाधानी , आशादायक आयुष्य जगायला मदत करा.
डॉ अतुल ढगे
मनोविकारतज्ञ, व्यसनमुक्तीतज्ञ व लैंगिकसमस्यातज्ञ आहेत. रत्नागिरी, माईंड केअर हॉस्पिटल, सर्टिफाईड सायकोथेरपीस्ट व कौन्सेलर.