बागेश्री आणि गुहा असे केले नामकरण
गुहागर, ता. 22 : गेल्यावर्षी 5 कासवांना Satellite Tagging to Turtle in Guhagar समुद्रात सोडण्यात आले होते. हे सॅटेलाईट ट्रान्समीटर मध्येच काम बंद पडले. त्यामुळे वर्षभराच्या प्रवासाची माहिती आपल्याकडे संकलीत झालेली नाही. म्हणून यावर्षी पुन्हा दोन कासवांना सॅटेलाईट ट्रान्समिटर लावून समुद्रात सोडण्यात आले आहे. अशी माहिती भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. सुरेशकुमार यांनी दिली.
गेल्यावर्षी आंजर्ले, वेळास येथील प्रत्येकी आणि गुहागरमधील 3 कासवांना सॅटेलाईट ट्रान्समिटर लावण्यात आला होता. या पाचही कासवांचा प्रवास गुजराथ ते तामिळनाडू दरम्यान सुरु होता. सॅटेलाईट ट्रान्समिटरने काम बंद दिल्याने पूर्ण वर्षभराचा त्याचा प्रवास अभ्यासता आलेला नाही. एका ट्रान्समिटरची क्षमता 700 दिवस काम करण्याची असते. त्यामुळे किमान वर्षभर ट्रान्समिटरकडून सिग्नल मिळावेत ही अपेक्षा असते. मात्र हे पाचही सॅटेलाईट ट्रान्समिटर त्यापूर्वीच काम करेनासे झाले. म्हणून पुन्हा एकदा दोन कासवांना सॅटेलाईट ट्रान्समिटर लावण्याचा प्रयोग गुहागरमध्ये करण्यात आला. गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही दोन्ही कासवांचे नामकरण करण्यात आले. बाग समुद्र परिसरात मिळालेल्या कासवाचा बागेश्री तर गुहागरच्या समुद्रावर मिळालेल्या मादी कासवाला गुहा असे नाव देण्यात आले आहे. बुधवारी सकाळी ट्रान्समिटर लावून या कासवांना समुद्रात सोडण्यात आले. Satellite Tagging to Turtle in Guhagar

संदेशवहनाबाबत बोलताना डॉ. सुरेशकुमार म्हणाले की, कासवाच्या पाठीवर लावलेल्या उपकरणामध्ये दोन वर्ष चालेल एवढ्या क्षमतेची बॅटरी आहे. सॅटेलाईटच्या कक्षात हा ट्रान्समिटर आल्यानंतर कासवाच्या पाठीवरुन संदेश अमेरीकेतील ओशोनिक ॲण्ड ॲटमोस्फीअरिक ऑर्गनायझेशन या संस्थेकडे जातो. तेथून तो आमच्यापर्यंत पोचतो. ही सर्व प्रक्रिया स्वयंचलीत असते. 2022 मध्ये वेळास (ता. मंडणगड) आणि आंजर्ला (ता. दापोली) येथे प्रत्येकी 1 आणि गुहागरमध्ये 3 अशा 5 कासवांना सॅटेलाईट टॅगिंग केले होते. अपेक्षा होती की, या पाच कासवांकडून किमान 365 दिवस संदेश मिळत रहातील. परंतु तसे घडले नाही. त्यामुळे अपेक्षित संशोधन करता आले नाही. म्हणूनच पुन्हा दोन कासवांना सॅटेलाईट ट्रान्समिटर लावण्यात आले आहेत. Satellite Tagging to Turtle in Guhagar
यावेळी वन खात्याच्या परीक्षेत्र अधिकारी राजेश्री कीर, कांदळवन प्रतिष्ठानचे मानससर, मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट चिपळूण, कासवमित्र संजय भोसले व हृषिकेश पालकर गुहागर आदी उपस्थित होते.
मृत समुद्रामुळे कासवांच्या प्रवासावर मर्यादा
अरबी समुद्रामध्ये भारताची पश्चिम किनारपट्टी, पाकिस्तान, कतार, ओमान यांच्यामध्ये समुद्रात सर्वांत मोठा डेड झोन आहे. येथील ऑक्सिजनची पातळी अत्यंत कमी असल्याने पश्चिम किनारपट्टीवरील कासवे किनाऱ्यापासून खोल समुद्रात जात नाहीत. ती किनारपट्टीललगत उत्तर ते दक्षिण प्रवास करतात. त्यांचा हा प्रवास दक्षिणेकडे लक्षद्विपपर्यंत येवून थांबत असावा. त्यानंतर ही कासवे पुन्हा उत्तरेकडे प्रवास करत असावीत. असा अंदाज आहे. या प्रयोगानंतर त्याबाबत निश्चित बोलता येईल. अशी माहिती यावेळी डॉ. सुरेश कुमार यांनी दिली. Satellite Tagging to Turtle in Guhagar

