प्रत्येक ग्रामपंचायतीमधील घडामोडींबाबत गुहागर न्यूजचे वार्तांकन
गुहागर तालुक्यातील जनतेने ग्रामपंचायत सदस्य निवडीत प्रस्थापितांना धक्का दिला. ग्रामविकासाचा कौल जनतेने दाखवून दिला आहे. आता विकासाला पुढे नेण्यासाठी सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडीची प्रक्रिया 9 आणि 10 फेब्रुवारीला पार पडणार आहे. रानवी, पडवे, शिर, अडूर, कोंडकारुळ, वेळणेश्र्वर, साखरीबुद्रक, तळवली, पेवे, नरवण, कोळवली, मळण, उमराठ, शिवणे, जामसुद आणि गिमवी या 16 ग्रामपंचायतींची पहिली विशेष सभा होत आहे. या ग्रामपंचायतीपैकी उमराठ, वेळणेश्र्वर, अडूर, कोंडकारुळ, तळवलीमधील सरपंच, उपसरपंच पदासाठीचे उमेदवार जवळपास ग्राम विकास पॅनेलनी निश्चित केले आहेत. गिमवी, शिर, जामसुद या गावात सरपंच, उपसरपंच पदासाठी चुरस आहे.
शिर (सरपंच पदासाठी आरक्षण : सर्वसाधारण)
या गावातील 5 जागा बिनविरोध निवडून आल्या. त्यामध्ये ऋतुजा अमोल आंबेकर, विजय रुपाजी धोपट, अमिषा अनंत ठोंबरे, मानसी मोहन ठोंबरे, संदेश शांताराम रावणंग या ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे. तर प्रभाग क्र. १ मधून रामचंद्र पांडुरंग पवार, पूर्वजा विनायक गुरव, संजना समिर मोरे आणि प्रभाग क्र. २ मधून अमित रघुनाथ साळवी हे उमेदवार मताधिक्याने निवडून आले आहेत.
या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदावरुन चुरस निर्माण झाली आहे. निवडणुकीपूर्वी दोनजणांना सरपंच पदाचे आमिष दाखविण्यात आले होते. आरक्षण सर्वसाधारण पडल्याने आश्र्वासन दिलेल्या दोघांसोबत आणखी काही जण सरपंच, उपसरपंच पदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे सरपंच, उपसरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याची उत्सुकता सर्वांना लागून राहीली आहे.
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2021/01/adur1.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2021/01/adur1.jpg)
अडुर (सरपंच पदासाठी आरक्षण : ना.मा.प्र.स्त्री)
अडूर ग्रामपंचायतीची निवडणूक अटीतटीची झाली. यामध्ये सुरेश नारायण मांडवकर, अक्षता अनिल नितोरे, वैभव काशिराम जाधव, शैलजा हरिचंद्र गुरव, दिपाली दीपक झगडे, सुहासिनी सुधाकर देवळे, उमेश मधुसुदन आरस, अशोक नाना देवळे, ऋतुजा संजय हळये, तेजश्री वसंत देवळे आणि प्रभाकर गोविंद कावणकर हे उमेदवार विजयी झाले. माजी उपसभापती पांडुरंग कापले यांनी उभ्या केलेल्या पॅनेलला बहुमत मिळाले. त्यामुळे अडुर ग्रामपंचायतीवर पांडुरंग कापले यांची पुन्हा एकदा आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. शैलजा हरिचंद्र गुरव यांच्या गळात सरपंच पदाची माळ पडणार हे निश्चित आहे. तर उपसरपंच पद उमेश मधुसुदन आरस यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
वेळणेश्र्वर (सरपंच पदासाठी आरक्षण : ना.मा.प्र.)
गावाने एकत्र येवून ग्रामपंचायतीमधील सर्व उमेदवारांची निवड केली. त्यामध्ये सौ. संपदा सुधीर केळकर, दिपस्वी द्वारकानाथ कटनाक, चैतन्य सुधाकर धोपावकर, अमोल नारायण जामसुतकर, सुप्रिया उदय आरवलकर, नितीन दत्तात्रय पोळेकर, सिध्दकला विनायक पावरी, विलास धोंडू घाणेकर, मिनल वामन कळंबाटे, अमृता सतीश मोरे आणि नवनीत अशोक ठाकूर यांचा समावेश आहे. याच समितीच्या कोअर कमिटीने सरपंच पदासाठी चैतन्य धोपावकर आणि उपसरपंच पदासाठी अमोल जामसुतकर यांची नावे सुचविली आहेत.
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2021/01/ratghu041-1024x768.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2021/01/ratghu041-1024x768.jpg)
कोंडकारुळ (सरपंच पदासाठी आरक्षण : सर्वसाधारण)
या गावातील तीन प्रभागांमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये संदिप दगडू ढोर्लेकर, दत्ताराम विठोबा पालशेतकर, रविंद्र येशा पावरी हे निवडून आले. उर्वरित 8 ग्रामपंचायत सदस्य गावातून बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये निता हरेश ढोर्लेकर, विनायक कमळाकर पोळेकर, निलिमा प्रताप अडूरकर, अमिता ज्ञानेश्र्वर जागकर, सुषमा भिकाजी भाटकर, अशोक सोमा अडूरकर, वैष्णवी वैभव पाटील व वंदना पाम्या पावसकर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या सरपंच पदासाठी बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांमधील निलिमा प्रताप अडूरकर या महिलेचे नाव नक्की करण्यात आले आहे. तर उपसरपंच म्हणून अशोक सोमा अडूरकर यांचे नाव नक्की झाल्याचे समजते.
तळवली (सरपंच पदासाठी आरक्षण : ना.मा.प्र.स्त्री)
तळवली ग्रामपंचायतीची निवडणूक तालुक्यात गाजली. आमदार भास्कर जाधव यांचे कट्टर समर्थक, ज्येष्ठ राजकारणी विनायक मुळे यांच्या पॅनेलचा पराभव गाव पॅनेलने केला. विनायक मुळे देखील या निवडणूकीत पराभूत झाले. या निवडणूकीत सचिन गंगाराम कळंबटे, अनंत गंगाराम डावल, सविता सदानंद शिंदे, संतोष पांडुरंग जोशी, पुर्वा सुमेश पवार, प्रतिक्षा सुदिप जाधव, सुनिल धोंडु मते, मयुरी महेश शिगवण, मानसी विलास पोफळे हे गाव पॅनेलचे उमेदवार निवडून आले. येथील सरपंच पदासाठी मयुरी महेश शिगवण आणि उपसरपंच पदासाठी अनंत गंगाराम डावल हे इच्छुक आहेत. गाव पॅनेल सर्वांबरोबर चर्चा करुन अंतिम निर्णय घोषित करणार आहे.
उमराठ (सरपंच पदासाठी आरक्षण : सर्वसाधारण)
या गावात ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा आहे. यावेळी अर्चिता अनंत गावणंग, जनार्दन पांडुरंग आंबेकर, शशीकांत सिताराम आंबेकर, सुरज अरुण घाडे, प्रज्ञा प्रकाश पवार, गुलाब विजय गावणंग आणि साधना संदिप गावणंग हे उमेदवार गावाने बिनविरोध निवडून दिले. यामधील जनार्दन पांडुरंग आंबेकर यांच्याकडे सरपंच पदाची तर सुरज अरुण घाडे यांच्याकडे उपसरपंच पदाची जबाबदारी गावाने सोपविली आहे.
मळण (सरपंच पदासाठी आरक्षण : सर्वसाधारण)
मळण गावातील 8 ग्रामपंचायत सदस्यांपैकी 7 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये मीरा महेंद्र कोतवडेकर, नारायण पांडुरंग गुरव, रमाकांत गंगाराम सोलकर, लतिका लक्ष्मण सोलकर, मोहन गंगाराम आग्रे, अमृता विश्र्वनाथ जाधव, संध्या कृष्णा सोलकर या ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे. तर प्रभाग तीन मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी झालेल्या मतदानात विरेंद्र वसंत नाटुस्कर हे निवडून आले. सरपंच पदासाठी गावाचा कौल विरेंद्र वसंत नाटुस्कर यांच्या बाजुने आहे. मात्र नारायण पांडुरंग गुरव आणि अमृता विश्र्वनाथ जाधव हे दोन उमेदवार सरपंच पदासाठी इच्छुक आहेत. तीन्ही उमेदवार शिवसेनेचे असल्याने वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा निर्णय ज्याच्या पारड्यात पडेल त्या उमेदवाराच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडेल. तर उपसरपंच पदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रमाकांत गंगाराम सोलकर यांचे नाव निश्चित झाले आहे.
जामसूद (सरपंच पदासाठी आरक्षण : सर्वसाधारण)
या गावातील निवडणूक अखेरच्या क्षणी बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश आले. त्यामध्ये महेश यशवंत जामसुतकर, प्रज्ञा प्रभाकर कुंभार, संतोष यशवंत सावंत, स्नेहा नरेंद्र देवळेकर, सुचिता सुनिल गमरे, सृष्टी वैभव रेवाळे आणि शैलेंद्र चंद्रकांत साळवी या ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे. परंतु सरपंच पदासाठी सर्वसाधारण हे आरक्षण पडल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. ग्रामस्थांनी सभा घेवून सरपंच पद एका वाडीला तर उपसरपंच पद दुसऱ्या वाडीला देण्याचा प्रयत्न केला. मात्र हा निर्णय देखील अनेकांना मान्य नव्हता. त्यामुळे अखेर बिनविरोध निवडून दिलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच, उपसरपंच ठरवावा. असा एक मतप्रवाह सुरु झाला. त्यातून इच्छुक उमेदवारांनी आपल्या निवडीसाठी वेगवेगळ्या मार्गानी ग्रामपंचायत सदस्यांना पटविण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे येथे सरपंच, उपसरपंच पदाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार याचा उलगडा निवडणुकीनंतरच होणार आहे. निवडणुक झाल्यावर ही पदे नेमकी कशी मिळवली गेली याची चर्चा रंगेल असा अंदाज आहे.
गिमवी (सरपंच पदासाठी आरक्षण : सर्वसाधारण स्त्री)
सरपंच, उपसरपंच पदाचा तिढा
या गावात 9 जागांसाठी चुरशीची निवडणूक झाली. प्रभाग क्र. १ मधून महेंद्र दत्ताराम गावडे, प्रसाद सुभाष सोमण, नेत्रा संदिप कदम, प्रभाग क्र. २ मधून वैभवी विजय जाधव, निवेदिता देवजी सकपाळ, प्रतिभा अनंत महाडिक आणि प्रभाग क्र. ३ मधून सतिश अशोक इंदुलकर, सीमा दत्ताराम घाणेकर, दिपाली दिपक सकपाळ हे ग्रामपंचायत सदस्य निवडून आले. यापैकी 5 सदस्य शिवसेना पुरस्कृत पॅनेलचे तर तर 4 सदस्य गावपॅनेलचे आहेत.
येथील सरपंच पद सर्वसाधारण स्त्रीसाठी आरक्षित असल्याने वैभवी विजय जाधव यांनी सरपंच पदावर दावा सांगितला आहे. सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून मी निवडून आल्याने सरपंच पद मलाच मिळाले पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. तर शिवसेना पुरस्कृत पॅनेलने प्रतिभा महाडिक यांना सरपंच पद देण्याचे आश्र्वासन दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे बहुमताने निवडून आलेल्या शिवसेना पुरस्कृत पॅनेलसमोर सरपंच पद कोणाला द्यायचे याचा निर्णय घेण्याचे आव्हान आहे. हा तिढा सोडविण्यात शिवसेना पुरस्कृत पॅनेलची मंडळी यशस्वी झाली तर उपसरपंच पदाची माळ प्रसाद सोमण यांच्या गळ्यात पडेल.
परंतू शिवसेना पुरस्कृत पॅनेलची ही अडचण लक्षात घेवून गाव पॅनेलने ‘‘येईल त्याचा सन्मान होईल’’ अशी भूमिका घेवून सरपंच पद त्या महिलेला देण्याचा डाव टाकला आहे. अशा परिस्थितीत शिवसेना पॅनेलमधील इच्छुक दोन उमेदवारांपैकी एक महिला उमेदवार गाव पॅनेल सोबत जावून सरपंच पदाची माळ आपल्या गळात टाकू शकते. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सरपंच आणि उपसरपंच पद गावपॅनेल स्वत:कडे राखू शकते. या परिस्थितीत महेंद्र गावडे उपसरपंच होवू शकतात. किंवा गावपॅनेलचा सरपंच आणि शिवसेना पुरस्कृत पॅनेलचा उपसरपंच विजयी होवू शकतो.
कोळवली (सरपंच पदासाठी आरक्षण : सर्वसाधारण स्त्री)
येथे जयश्री जीणू हुमणे, अजित बालका भुवड, प्रणिता प्रदीप वाघे, संतोष वसंत सावरकर, अमोल शांताराम वाघे आणि रुशाली वसंत डिंगणकर हे ग्रामपंचायत सदस्य गावाने बिनविरोध निवडून आणले.
शिवणे (सरपंच पदासाठी आरक्षण : सर्वसाधारण स्त्री)
शिवणे ग्रामपंचायतीमध्ये शारदा गोविंद जोशी, सानिका संतोष जोशी, मनस्वी महेंद्र ठोंबरे, सुषमा रामचंद्र रायकर, संदीप सदाशिव ठोंबरे आणि सदानंद रामचंद्र जोशी हे ६ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
पेवे (सरपंच पदासाठी आरक्षण : सर्वसाधारण स्त्री)
येथील ग्रामस्थांनी यावर्षी बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला. गावाने किशोर चिवेलकर, फरहत निसारखान सरगुरो, वैशाली विजय सैतवडेकर, सुदेश शिवराम कदम, प्रिती सुरज हरचीलकर, नुरीण मुबीन पेवेकर, भारती भिकाजी सावरटकर, वैभव सिताराम साळवी आणि संजय नारायण सावरटकर यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून निश्चित केले. माजी सरपंच निसारखान सरगुरो यांची पत्नी फरहत सरगुरो यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
साखरी बुद्रुक (सरपंच पदासाठी आरक्षण : सर्वसाधारण स्त्री)
या ग्रामपंचायतीमध्ये राजेंद्र रमेश हरचिलकर, प्राची वैभव पवार, दिपिका दिपक पवार, रेश्मा रमेश शितप, निकिता नंदकुमार शितप हे पाच सदस्य बिनविरोध निवडून आले. तर प्रभाग क.२ मधील सर्वसाधारण प्रवर्गाच्या दोन जागांसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये संतोष काशिनाथ पवार, समिर प्रमोद पेडणेकर निवडून आले. यावेळी सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होईल असा येथील ग्रामस्थांचा कयास होता. परंतू ते सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी आरक्षित झाले. त्यामुळे निवडून आल्यानंतरही संतोष पवार आणि समीर पेडणेकर यांना सरपंच पदाने हुलकावणीच दिली आहे. आता बिनविरोध निवडून आलेल्या चार महिलांपैकी सरपंच पद कोणाला मिळणार याबद्दल कुतुहल आहे. प्राची पवार, दिपिका पवार आणि निकिता शितप या महिला सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून निवडून आल्या आहेत.
रानवी सर्वसाधारण स्त्री
रानवीची निवडणूक बिनविरोध झाली. वैष्णवी विजय बारगाडे, मनाली महेंद्र कदम, मानसी दिलीप बने, दिनेश सदानंद बारगोडे, प्रणय प्रकाश बारगोडे, विनोद गोविंद चौगुले आणि मयुरी मंगेश चौगुले हे सदस्य निवडून आले आहेत.
पडवे (सरपंच पदासाठी आरक्षण : ना. मा. प्र.)
या ग्रामपंचायतीच्या 11 सदस्यांपैकी प्रभाग १ मधून कौसर रज्जाक चिपळूणकर आणि प्रभाग 4 मधून मानसी विनायक सुर्वे हे दोन सदस्य बिनविरोध निवडून आले. उर्वरित 9 सदस्य – शहनाज अली खले, मुजीब हुसेन जांभारकर, फारुक इक्बाल गुहागरकर, शमा जावेद माखजनकर, शौकत अल्लाउद्दीन जांभारकर, रफिक अ. लतिफ सारंग, नादिया इक्बाल इब्जी, लिना शरद गडदे, राजेंद्र शंकर खातू मताधिक्याने निवडून आले. येथे सरपंच पदासाठी मुजीब हुसेन जांभारकर हे प्रबळ दावेदार आहेत.
नरवण (सरपंच पदासाठी आरक्षण : ना.मा.प्र.)
यावेळी नरवण ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात गावकऱ्यांना यश आले. गावाने संयुक्ता विशाल मोरे, सुहासिनी दत्ताराम पडवेकर, चंद्रकांत काशिनाथ आगरे, प्रविण विश्र्वनाथ वेल्हाळ, अपर्णा विनायक नाटुस्कर, गंगाराम लक्ष्मण बारगोडे, शुभांगी बाळ गोताड, ज्योती प्रकाश नाटुस्कर आणि संतोष हरी मोरे यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून दिले आहे. येथील सरपंच पद नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी आरक्षित आहे.
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2021/01/ratghu182-Padave-1024x768.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2021/01/ratghu182-Padave-1024x768.jpg)