संतोष जैतापकर : राममंदिराच्या निर्मितीत माझाही खारीचा वाटा
गुहागर, ता. 06 : अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातर्फे राममंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरु आहे. भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हा ओबीसी सेलचे संयोजक संतोष जैतापकर यांनी मंदिर उभारणीसाठी 51 हजार रुपयांचा निधी समर्पित केला आहे. या राममंदिराच्या निर्मितीमध्ये आपलाही खारीचा वाटा असावा या भावनेतून हा निधी देत असल्याची प्रतिक्रिया संतोष जैतापकर यांनी व्यक्त केली.
संतोष जैतापकर निर्मलक्ष फाऊंडेशन आणि भाजपाच्या माध्यमातून विविध सामाजिक धार्मिक, शैक्षणिक, आरोग्यविषयी, लोककलांना प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवित असतात. कोरोना काळात त्यांनी गुहागर तालुक्यात गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. प्रधानमंत्री फंडालाही आर्थिक साह्य केले आहे. गुहागर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी उत्तर रत्नागिरी भाजपा ओबीसी सेल जिल्हा संयोजक आणि निर्मलक्ष फाऊंडेशनचे संस्थापक संतोष लक्ष्मण जैतापकर, नरवण यांची भेट घेतली. त्यावेळी 51 हजार रुपयांचा धनादेश संतोष जैतापकर यांनी कार्यकर्त्यांकडे सुपूर्त केला.
याबाबत संतोष जैतापकर म्हणाले की, भारतीयांनी सुमारे 450 वर्ष अयोध्येत राममंदिर होण्यासाठी लढा दिला. आता येथे भव्यदिव्य असे श्रीराममंदिर होणार आहे. आपल्या मनात, मुखात कायम असलेल्या रामाचे मंदिर त्यांच्या जन्मस्थानी उभे रहाताना पहाणे हे आपले सर्वांचे भाग्य आहे. मंदिर निर्मितीचे काम देशातील काही धनाढ्य मंडळींच्या मदतीने होऊ शकले असते. मात्र सामान्यातील सामान्य रामभक्तालाही मंदिर निर्मितीच्या कामात सहभागी करुन घेण्याचा निर्णय श्रीराम जन्मतीर्थ न्यासाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. त्यासाठी खेडोपाडी जाण्याऱ्या कार्यकर्त्यांचे नियोजन केले. त्यामुळेच प्रत्येकाला प्रभु रामचंद्रांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे.
यावेळी श्री राम मंदिर निधी समर्पण अभियानाचे तालुका संयोजक सुमंत भिडे, तालुक्याचे निधी संकलन प्रमुख विनोद पटेल, तालुका संघचालक डॉक्टर मंदार आठवले, रुग्ण कल्याण समितीच्या सौ मधुरा वैद्य, विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री बबन कुंभार, अनिल ओक, संजय आरेकर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.